Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Odisha Train Accident : रेल्वेरुळांच्या देखभाल खर्चात कपात, सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

Odisha Train Accident : रेल्वेरुळांच्या देखभाल खर्चात कपात, सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

Subscribe

मुंबई : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातावरून (Odisha Train Accident) विरोधक आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच अपघात झाला असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका सरकारी अहवालाचा दाखला देत, केंद्र सरकारबाबत (Union government) प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केंद्र सरकारने रेल्वेरुळांच्या देखभालीच्या खर्चात कपात केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या शनिवारी 288 झाली, तर जखमींचा आकडा 900वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांपासून सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. पण त्याचबरोबर या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांची आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी ट्वीट करून रेल्वेच्या रुळांवरून घसरण्याच्या घटनांसंदर्भातील ऑडिट रिपोर्टचा (Performance Audit Report on Derailment in Indian Railways (Report No.22, 2022)) हवाला दिला आहे. या अहवालाद्वारे ट्रॅकशी संबंधित समस्या आणि अपघाताच्या विश्लेषणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. धक्कादायक म्हणजे, केंद्र सरकारने रेल्वेरुळांच्या देखभालीच्या खर्चात कपात केली आहे. याचा परिणाम म्हणून, बालासोर येथील अपघातासह, गेल्या चार वर्षांतील बहुतांश भीषण रेल्वेअपघात हे गाडी रुळावरून घसरल्यामुळे झाले. या सर्व घटना कॅगच्या अहवालाची (CAG report) आठवण करून देतात. त्यामुळे चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. या घटनांना जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, हे पाहणे आपले कर्तव्य आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यकर्त्यांनी योग्य वाटत असेल तसे करावे – शरद पवार
ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी सर्वांकडून केली जात आहे. त्यामधून सत्यता समोर येईलच. त्यानंतर पुढील काही गोष्टी सुचवता येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सांगितले. लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना रेल्वे अपघात झाला होता. लालबहादूर शास्त्रींनी, ही माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी या पदावर राहू इच्छित नाही असं म्हणत राजीनामा दिला होता. आता हे एक उदाहरण देशाच्या समोर आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटत असेल तसं करावं, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisment -