काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी अशक्य; जयराम रमेश यांचा ममता आणि अखिलेश यादव यांना टोला

Jairam Ramesh

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) (टीएमसी) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) (एसपी) या दोघांनीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपा पक्षापासून दूर राहून इतर प्रादेशिक पक्षांशी संभाव्य चर्चा करतील, अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या दोघांनाही टोला लगावला आहे.

जयराम रमेश म्हणाले की, भाजपशी लढण्यासाठी कोणतीही विरोधी आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी युती झाली तर पक्ष त्यात मध्यवर्ती भूमिका बजावेल, अशी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, या सर्व गोष्टींबद्दल आताच बोलणे खूप घाईचे आहे, कारण काँग्रेसचे पहिले प्राधान्य कर्नाटकमधील आगामी निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राज्याच्या निवडणुका हे आहे.

हेही वाचा – राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या? नोटीसला उत्तर न दिल्याने दिल्ली पोलीस घरी धडकले

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना विचारले की, टीएमसी आणि सपाच्या या चर्चा विरोधी ऐक्याला धक्का देऊ शकतात? यावर ते म्हणाले की, टीएमसी आणि समाजवादी पक्षाचे लोक एकमेकांना भेटत असतात त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. तिसरी आघाडी, चौथी आघाडी भविष्यातही होत राहतील, मात्र विरोधी आघाडी झाली तर त्यात काँग्रेस मध्यवर्ती भूमिका बजावेल, कारण काँग्रेसशिवाय आघाडी शक्य नाही, असे ते म्हणाले.

जयराम रमेश यानी सांगितले की, यावर्षी आम्ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्यस्त राहू. आधी कर्नाटकात आणि नंतर तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरामसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकत्र यायचे की नाही हे नंतर बघू. कोणत्याही विरोधी आघाडीसाठी काँग्रेस पक्ष आवश्यक आहे, परंतु काँग्रेस पक्षाचे प्राधान्य कर्नाटकच्या निवडणुका आणि त्यानंतर इतर राज्यांतील निवडणुकांना आहे.

हेही वाचा – “न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल