घरदेश-विदेशखासगीकरणाविरोधात पुन्हा आयुध निर्माण कर्मचाऱ्यांचा एल्गार

खासगीकरणाविरोधात पुन्हा आयुध निर्माण कर्मचाऱ्यांचा एल्गार

Subscribe
देशभक्तीचा नारा देत मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली देशातील 41 आयुध निर्माण कारखान्यांचे (ऑर्डिनन्स फॅक्टरी) खासगीकरण करण्याचा डाव रचला जात आहे.  या कारखान्यांमधील तब्बल २७५ उत्पादने खासगी कंपन्यानाकडे बनवण्यास देऊन कारखाने डबघाईला आणले जात आहेत. त्यामुळे खासगीकरणाविरोधात ४१ आयुध निर्माण कारखान्यातील ८२ हजार कर्मचाऱ्यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ४१ कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी अनिश्चितकालीन संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे.
 
डोळ्यात तेल ओतून सीमेवर देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना आवश्यक असलेली युद्ध सामग्री बनवून देण्यासाठी देशामध्ये तब्बल ४१ आयुध निर्माण कारखाने सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक संकटावेळी कारखान्यातील कर्मचार्‍यांनी दिवसरात्र मेहनत करून सैनिकांना आवश्यक असलेली युद्धसामग्री पुरवण्याचे काम केले आहे. कारखान्यांमध्ये रणगाडे, बंदुका, एके 47, एके 57, रिव्हॉल्हर, पॅराशूट, बॉम्ब, तोफा, तोफगोळे, जवानांचे बूट, बुलेटप्रुफ जॅकेट, जवानांचे यूनिफॉर्म असे तब्बल 650 प्रकारची युद्धसामग्री बनवण्यात येत होती. कोणत्याही युद्धावेळी जवानांना आवश्यक युद्धसामग्री तातडीने  पुरवली जाते. हे कारखाने देशाच्या तिन्ही दलाच्या जवानांची गरज भागवून दरवर्षी पाच हजार कोटीची युद्धसामग्री निर्यात करत होती. त्यामुळे देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होत होती.  मात्र मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली कारखाने बनवत असलेली युद्ध सामग्री खासगी कंपन्यांना बनवण्यास दिली. त्यानंतर कारखान्यांचे उत्पादन नाही असे सांगत कारखान्यांचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात २०१९ मध्ये आयुध निर्माण कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या असलेल्या एआयडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस या तिन्ही संघटनांनी एकत्र येत अनिश्चितकालीन संप पुकारला होता. त्यावेळी सरकारने कारखान्यांना उत्पादनाचे लक्ष्य दिले. मात्र आता पुन्हा सरकारने कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठवण्यासाठी  ४१ कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी ८ ते १७ जूनदरम्यान मतदान घेतले. यामध्ये देशातील ४१ कारखान्यांमधील ९९ टक्के कर्मचाऱ्यांनी सहभागी होत अनिश्चितकालीन संपाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चितकालीन संप पुकारण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.
 

कोरोनामध्येही उल्लेखनीय कामगिरी 

सीमेवर लढणाऱ्या जवानांना आयुधे पुरवण्याबरोबरच कोरोना योद्ध्यांनाही आयुध निर्माण कारखान्यातून आयुधे पुरवली आहेत. कोरोनाकाळात पीपीई किटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. वाढती मागणी आणि पीपीई किटच्या दर्जाला मान्यता देणाऱ्या दोनच संस्था देशात होत्या. त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालयाने पीपीई किटच्या दर्जाला मान्यता देण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील अंबरनाथ आयुध निर्माण कारखाना, उत्तर प्रदेशमधील कानपूर स्मॉल आर्म्स फॅक्टरी, मुरादनगर आयुध निर्माण  फॅक्टरी, कानपूर आयुध निर्माण फॅक्टरी यांच्यावर सोपवली. त्याचबरोबर या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात  निर्मितीही करण्यात आल्याने कोरोना योद्ध्यांना पीपीई किट मिळण्यास मदत झाली.
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -