Extortion case: परमबीर सिंह कुठे आहेत ते सांगा? तोवर संरक्षण नाहीच, SC चा पवित्रा

Parambir singh and Supreme Court

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना खडे बोले सुनावले आहेत. परमबीर सिंह हे भारतात आहेत की भारताबाहेर आहेत याबाबतचा तपशील द्यावा, मगच त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. परबीर सिंह यांची बाजू मांडणाऱ्या वकिलालाही सर्वोच्च न्यायालयाने विचारले की याचिकाकर्ते असलेले परमबीर सिंह हे सध्या कुठे आहेत ? या प्रकरणातील पुढील सुनावणी ही २२ नोव्हेंबरला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी फरार म्हणून घोषित केले. परमबीर सिंह यांच्यावर खंडणी प्रकरणातील आरोप होते. तसेच परबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांना संपुर्ण प्रकरणात ईडीकडून चौकशीनंतर अटक झाली होती. तसेच देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पण परमबीर सिंह यांचा भारतातला कोणताच वास्तव्याचा पुरावा समोर न आल्याने विविध यंत्रणांकडून त्यांना समन्स गेला होता. तपास यंत्रणांनी पाठवलेल्या अनेक समन्सला उत्तर न दिल्यानेच अखेर परमबीर सिंह फरार घोषित करण्यात आले आहे.

तपास यंत्रणांनीच परमबीर सिंह हे बनावट पासपोर्टच्या माध्यमातून भारताबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी परमबीर सिंह यांना भारतातून पळवून लावण्यात भाजपचा हात असल्याचा दावा केला होता. परमबीर सिंह हे नेपाळमार्गे युरोपियन देशात पळून गेल्याचीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. आता खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच परमबीर सिंह यांच्या ठिकाणाबाबत सवाल केला आहे. त्यामुळेच परमबीर सिंह यांच्या ठिकाणाबाबत जोवर माहित देत नाही, तोवर सुनावणी घेणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर एकुणच परमबीर सिंह यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.


परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं म्हणजे काय?, कोणत्या गुन्ह्यांमध्ये फरार घोषित करतात?