घरट्रेंडिंगसासू-सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी जावयानं लढवली शक्कल; पण घडली जन्माची अद्दल!

सासू-सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी जावयानं लढवली शक्कल; पण घडली जन्माची अद्दल!

Subscribe

सासू-सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी अनेक जावईमंडळी अनेक प्रकारचे उपदव्याप करताना दिसतात. त्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. पण इंदोरमधल्या या महाभागाने जे केलं, ते वाचून सगळेच जावई चाट पडतील हे नक्की! आपल्या होणाऱ्या बायकोच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी स्पेशल करण्याच्या नादात हे महाशय आधी लष्कराच्या आणि नंतर थेट पोलिसांच्या तावडीत सापडले. आता पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून त्याच्या या कारणावर तपास करणाऱ्या पोलिसांचा देखील विश्वास बसत नाहीये. त्यामुळे त्याची चांगलीच गोची झाली आहे. सासू-सासऱ्यांना खूश करण्याच्या नादात त्याला जन्माची अद्दल घडलीये! एएनआयने याविषयी वृत्त दिलं आहे.

हा सगळा प्रकार आहे इंदौरचा!

तर त्याचं झालं असं, की मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्याच्या बाएओराचा रहिवासी असलेला मिथून वर्माचं काही दिवसांत लग्न होणार आहे. आपल्या होणाऱ्या बायकोला आणि तिच्या सासू-सासऱ्यांना अभिमान वाटावा, त्यांना आपण इम्प्रेस करावं, या आशेपोटी मिथुननं एक भन्नाट प्लान तयार केला. यावेळी त्याला सुतराम कल्पना नव्हती की त्याचा हाच प्लान त्याला भयंकर संकटात अडकवू शकतो.

- Advertisement -

काय होता प्लान?

मिथुन वर्मा हा मध्य प्रदेशच्या पिथमपूरमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. पण सासू-सासऱ्यांना हे सांगणं त्याला कमीपणाचं वाटलं. शिवाय, त्यांच्यालेखी आपला मान वाढावा, म्हणून मिथुननं आपण लष्करामध्ये असल्याची बतावणी केली. त्यासाठी त्यानं स्वत:चा नाव आणि फोटो असलेलं लष्कराचं बनावट ओळखपत्र देखील बनवून घेतलं. स्वत:च्या मापाचा लष्कराचा गणवेश देखील शिवून घेतला. पण आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ होती!

Mithun Varma (Photo - ANI)
मिथुन वर्मा (फोटो सौजन्य – एएनआय)

पठ्ठ्या थेट कँटोनमेंटमध्ये पोहोचला!

मिथुननं आपण लष्करात आहोत, हे भासवण्यासाठी थेट इंदोरच्या मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर (MHOW) कँटोनमेंटमध्ये हजेरी लावली. तीही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी! आता तिथे सगळेच खरे खुरे आर्मीमन असल्यामुळे मिथुनचा ‘लष्करी अवतार’ तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही खटकला. त्याची लष्करी पेहेराव घालण्याची पद्धत अगदीच गबाळी होती. याच पेहेरावानं त्याचा घात केला!

- Advertisement -

…लष्करी अधिकारीच ते!

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कँटोनमेंट परिसरातूनच त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं सुरुवातीला आपण बिहार रेजिमेंटचे असल्याचं सांगितलं. पण लष्करी अधिकारीच ते! याचा सगळा फसवा प्रकार त्यांच्या लगेचच लक्षात आला. त्यांनी मिथुनला सरळ पोलिसांच्या हवाली केलं.

खरं सांगूनही मिथुनची गोची!

पोलिसांनी मिथुनकडून त्याचा गणवेश आणि बनावट ओळखपत्र ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर सगळा प्रकार उघड झाला. हे सगळं आपण का केलं, हे मिथुननं पोलिसांना सांगितलं. पण आता पोलिसांना त्याच्या या कारणावर विश्वास बसेना. त्यामुळे त्यांनी ‘पोलिसी’ खाक्याने त्याची चौकशी सुरूच ठेवली आहे! त्यामुळे बायकोच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्याची हौस मिथुनच्या चांगलीच अंगलट आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -