घरदेश-विदेशSwachh Bharat Mission 2.0: पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'स्वच्छ भारत मिशन २.०' चा...

Swachh Bharat Mission 2.0: पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘स्वच्छ भारत मिशन २.०’ चा शुभारंभ, पाच वर्षात गावं, शहर होणार कचरामुक्त

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऐतिहासिक उपक्रमांचा भाग म्हणून दोन मोठ्या मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत पीएम मोदी स्वच्छ भारत मिशन- अर्बन २.० (SBM-U 2.0) आणि अटल मिशन २.० कायाकल्प तसेच शहरी सुधारणा (AMRUT 2.0) मोहिम सुरु केल्या आहेत. या दोन्ही मोहिमांचा शुभारंभ आज डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडला. सर्व शहरे कचरामुक्त आणि पाणी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एसबीएम-यू 2.0 आणि अमृत 2.0 तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक गावं आणि शहरं कचरामुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तसेच देशात खुले शौचालय बंद करण्याचे देखील ध्येय ठेवले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात दहा कोटी शौचालय बनवून पूर्ण केले जाणार आहेत. तसेच शहरांना कचरामुक्त केले जाईल. याशिवाय सांडपाण्यावर उत्तम व्यवस्थापन आणि प्रक्रिया करत स्वच्छ करुन त्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. या मोहिमेतील सर्वात मोठे सहयोगी ते लोक आहेत जे दुर्गंधी सहन करत कचरा साफ करतात. कोरोना काळातही त्यांनी मोठं योगदान दिले. यावेळी बोलताना त्यांनी हे देखील सांगितले की, ही मोहिम महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून पुढे आली आहे. त्यामुळे या मोहिमेचे यश महात्मा गांधी यांना समर्पित आहे. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील उल्लेख केला.

- Advertisement -

मोदी पुढे म्हणाले की, गावांमधून शहरांकडे येणाऱ्या लोकांना येथे काम मिळते पण ते ज्या शहरात राहतात ते अतिशय दयनीय आहे. स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा म्हणजे बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. ते म्हणाले की, ही मोहिम सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयासवर आधारित आहे. आता सर्व वयोगटातील लोक या मोहिमेशी जोडले जात आहेत. कारण आता प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना स्वच्छता क्रमवारीत आपले शहर रँकिंगमध्ये आणायचे आहे.

पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, आदिवासी भागातील लोक अतिशय कमी संसाधनांचा वापर करत आपले काम पूर्ण करतात. तेथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही अनेक लोकांना या मोहिमेशी जोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यासोबतच गुजरातमध्ये पर्यटनही वाढले. त्यामुळे गुजरातमध्ये आधी आणि आतामध्ये खूप फरक जाणवतोय. आता प्रत्येक घरांमधून कचरा उचलला जातो आणि त्याची शास्त्रीय आधारावर विल्हेवाट लावली जाते. लोक अॅपवरून कचरा विघटनाबद्दलची माहिती देतात. आता लोकांच्या विचारात बदल झाला आहे.

स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत २०३० साठी निर्धारित शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ही योजना प्रामुख्याने ट्रिपल आरशी संबंधित आहे. यामध्ये रिड्यूज, रियूज आणि रिसायकल समाविष्ठ आहे. यामुळे कचऱ्याचे शास्त्रीय आधारावर विघटन केल्यास हे ध्येय साध्य करण्यात यश मिळू शकते. हे मिशन पूर्णपणे पेपरलेस आहे आणि देशातील सर्व राज्ये आणि स्थानिक शहरी संस्थांनी डिजिटल आधारावर मंजूर केले आहे.

स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच वर्षांत शहरांमधून निघणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन केले जाईल, जेणेकरून मोठी महानगर आणि शहरांबाहेर कचऱ्यांचे डोंगर तयार होण्याचे संकट कमी होईल. त्याचप्रमाणे अमृत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व शहरांमधील प्रत्येक घर नळाला जोडले जाईल. याशिवाय सांडपाण्याचे पाणी स्वच्छ आणि पुन्हा वापरण्यायोग्य बनवले जाईल.

या मोहिमेअंतर्गत सुमारे ४७०० स्थानिक संस्थांना स्वच्छ पाण्याचा पुरवठाही सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशातील शहरांमधून निर्माण होणारा कचरा आणि कचऱ्याचे डोंगर कमी करण्यास मदत होईल. देशातील विविध लहान -मोठी शहरे कचऱ्यापासून तयार झालेले डोंगर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे अडचणींना सामोरे जात आहेत.

पीएम मोदींनी आज सुरू केलेल्या योजनांबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार देशात सुमारे २.६८ कोटी स्वच्छ पाण्याचे नळ कनेक्शन सुरु करेल, ज्याअंतर्गत लोकांना स्वच्छ पाणी मिळू शकेल. याअंतर्गत, सुमारे ५०० शहरांमध्ये २.६४ कोटी सीवर कनेक्शन देखील दिले जातील. सुमारे १०.५ कोटी लोकांना याचा लाभ होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -