काय सांगता, ६५ तासात २४ बैठका, मोदी है तो सबकुछ मुमकिन है

PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तीन दिवसीय अमेरिकेचा दौरा पार पडला. बऱ्याच महिन्यानंतर पंतप्रधान मोदी परदेशातील दौऱ्यावर गेले. मोदी अमेरिकेला जाण्यासाठी अगदी विमानात बसल्यापासून ते पुन्हा मायदेशी परतेपर्यंत हा दौरा चर्चेत राहिला. दरम्यान, मोदींनी या दौऱ्यात ६५ तासांमध्ये तब्बल २४ बैठका घेतल्या आहेत. मोदींच्या याच टाईम मॅनेजमेंटची चर्चा आता सुरु आहे.

पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात एकूण २० बैठकांमध्ये सहभागी झाले होते. तसंच, वॉशिंग्टनपर्यंतच्या लांबच्या प्रवासादरम्यान नरेंद्र मोदींनी विमानातच चार बैठका घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या सगळ्या बैठककांची गोळाबेरीज केल्यास पंतप्रधान मोदींनी ६५ तासांमध्ये तब्बल २४ बैठका घेतल्या असं म्हणावं लागेल.

मोदींचं टाईम मॅनेजमेंट

पंतप्रधान मोदी २२ सप्टेंबरला अमेरिकेला जाण्यासाठी विमानात बसले. यानंतर पुढील कार्यक्रमाची रुपरेषा कळताच मोदींनी विमानात दोन बैठका घेतल्या. पुढे मोदी वॉशिंग्टनमध्ये उतरल्यानंतर हॉटेलमध्ये असताना त्यांनी तीन बैठकांमध्ये सहभागी झाले. यानंतर २३ सप्टेंबरला मोदींनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली.

या भेटींनंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची भेट घेतली. यानंतर मोदी यांनी त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांसोबत तीन बैठका घेतल्या. तर २४ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते. त्यानंतर क्वाड देशांच्या परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय अधिकाऱ्यांसोबत आणखी चार बैठका घेतल्या.

२५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेहून नवी दिल्लीला परतताना आणखी दोन बैठका घेतल्या. या बैठकाही बराच काळ चालल्या. या दोन्ही बैठकांमध्ये अमेरिका दौऱ्याचा आढावा घेण्यात आला.