घरदेश-विदेश'भारतातली लोकशाही मेली'; राहुल गांधींचा कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधींचा कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या तिन्ही कायद्यांना शेतकरी विरोध करत असून शेतकऱ्यांचं देशभर आंदोलन सुरु आहे. हे विधेयक संसदेत सादर केलं तेव्हापासूनच विरोधक आक्रमक आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी विरोधक जागेवर बसले नव्हते असं म्हटलं होतं. उपसभापतींच्या दाव्याचं खंडन करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

- Advertisement -

दरम्यान, ही विधेयकं मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ होता. प्रचंड गोंधळातच ही विधेयकं मंजूर झाली. यावर भूमिका मांडताना राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी असा दावा केला होता की, विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाहीत. मात्र, या संदर्भात इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने राज्यसभा टिव्हीच्या चित्रफितीवरून वृत्त प्रसिद्ध केलं. यामध्ये उपसभापतींच्या दाव्याच्या उलट दिसत आहे. या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही दाबला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी वृत्त ट्विट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -