नवा गोंधळ! वसईहून गोरखपूरसाठी सुटलेली श्रमिक ट्रेन चक्क ओडिसात पोहोचली!

vasai gorakhpur train reaches odisha
श्रमिक विशेष रेल्वे

सतत सुरू असलेल्या भारतीय रेल्वेचा गोंधळ काही थांबेनासा झालेला आहे. गोरखपूरकरता सुटलेली एक श्रमिक ट्रेन शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूरला न पोहोचता चक्क शनिवारी सकाळी ओडिशाच्या रुरकेला स्थानकात पोहोचल्याने श्रमिक प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. यावरून आता रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. मात्र या घटनेवर पश्चिम रेल्वेकडून खुलासा करण्यात आलेला आहे. ज्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या मार्गात बदल केला असल्याचं स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिलं आहे.

लोको पायलट रस्ता चुकल्याचा आरोप!

लॉकडाऊनमुळे देशभरात विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी भारतीय रेल्वेने १ मेपासून श्रमिक ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेनमधून देशातील विविध रेल्वे स्थानकांतून लाखो मजूर आपापल्या गावी परत जात आहेत. तसेच गुरूवारी सुटलेल्या वसई ते गोरखपूर ट्रेनमधले प्रवासी शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूर स्थानकात पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही ट्रेन ओडिशाच्या रुरकेला स्थानकावर पोहोचल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुमारे ३६ तास प्रवास केल्यानंतर आपण उत्तर प्रदेशमध्ये नसून ओडिशामध्ये पोहोचल्याचे कळताच प्रवासी गोंधळले. भेदरलेल्या प्रवाशांनी ट्रेनचा लोको पायलट रस्ता चुकल्याचा आरोप केला.

८० टक्के प्रवासी युपी-बिहारचे!

दरम्यान, याबाबत माहिती देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले, ‘रेल्वे बोर्डाने इटासरी-जबलपुर-पंडीत दीनदयाल नगर या मार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या गाड्यांच्या मार्गात बदल केला’. त्यामुळे ही ट्रेन रुरकेला स्थानकात पोहोचल्याचे भाकर यांनी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. ही श्रमिक ट्रेन वसई-गोरखपूर-कल्याण-जळगाव-भुसावळ-खंडवा-इटासरी-जबलपूर-माणिकपूर मार्गे जाणार होती. देशातून सर्वाधिक म्हणजेच ८० टक्के श्रमिक ट्रेन युपी, बिहारकरता धावत आहेत. त्यामुळे इटासरी-जबलपूर-पंडीत दीनदयाल नगर मार्गावर ट्रेनच्या एकामागोमाग एक रांगा लागल्या. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे या गाडीला बिलासपूर, झारसुंगडा, रुरकेला, अद्र, आसनसोल मार्गे गोरखपूरला रवाना करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र यात ट्रेन ४०-५० तास उशिराने धावत असल्यामुळे मजुरांचे अतोनात हाल होत आहेत.