राजकीय निवृत्तीच्या बातम्यांवर सोनिया गांधींनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या…

सोनिया गांधींची अध्यक्षपदाची कारकीर्द नुकतीच संपली आहे. त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच राष्ट्रीय अधिवेशनात सोनियांच्या राजकीय संन्यासाची चर्चा सुरु झाली.

Sonia Gandhi

Sonia Gandhi Retirement रायपूर (छत्तीसगड) – सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यासाचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्या म्हणाल्या, याआधी कधी राजकीय निवृत्ती घेतली, ना यापुढे कधी घेणार आहे. सोनिया गांधींनी राजकीय संन्यासाचे वृत्त सपशेल फेटाळले आहे.

काँग्रेसचे 85वे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार) सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे दरम्यान माझी अध्यक्षपदाची इनिंग संपली, ही फार समाधानाची बाब ठरली, असे त्या म्हणाल्या.

मार्गदर्शक म्हणून काम करणार
अलका लांबा म्हणाल्या, जेव्हा मी सोनिया गांधींशी माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांनी राजकीय संन्यासाचे वृत्त फेटाळून लावले आहे. लांबा म्हणाल्या, अधिवेशनादरम्यान मला त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. मी त्यांना म्हणाले, ‘मॅडम तुमच्या कालच्या वक्तव्याने तुम्ही राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.’ तेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘मी संन्यास घेणार नाही. मी पक्षाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत राहाणार आहे.’

सोनियांच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय निवृत्तीची चर्चा
सोनिया गांधी म्हणाल्या, 1998मध्ये मी पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाले. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे गेल्या 25 वर्षांत अनेक चढ-उतार बघितले. अनेक चांगले तर, काही वाईट अनुभव आले. 2004 आणि 2009 मधील पक्षाची कामगिरी असो किंवा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचा माझा निर्णय असो, वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हे समाधानकारक होते. या सर्वांत मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. मला सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. पक्षासाठी हा टर्निंग पॉइंट आहे, असे त्या म्हणाल्या.

सोनिया गांधींच्या या वक्तव्यावरुन त्या राजकीय संन्यास घेणार असल्याची माध्यमांत चर्चा सुरु झाली. दरम्यान काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी सोनिया गांधींशी यावर चर्चा केली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

हेही वाचा : ५२ वर्षांपासून माझ्याकडे घर नाही, १९७७ सालच्या घटनेमुळे राहुल गांधी भावूक

भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधींचे कौतुक
सोनिया गांधी यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, यात्रा काँग्रेससाठी महत्त्वाची ठरली आहे. यात्रेने दाखवून दिले की भारतीय नागरिकांना एकमेकांबद्दल आदर, सद्भाव, आणि समानतेची आपेक्षा आहे. यात्रेसाठी कठोर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे सोनियांनी अभिनंदन केले आणि राहुल यांच्या कामाचे कौतुक केले. यात्रेत सहभागी देशवासियांनाही त्यांनी धन्यवाद दिले.

हेही वाचा : मोदी सरकारचा कारभार केवळ आपल्या मित्रांसाठी, सोनिया गांधींचे जोरदार टीकास्त्र