शाळेला सुट्टी मिळावी यासाठी विद्यार्थ्याची हत्या

गुजरातच्या वडोदरामध्ये रागाच्या भरात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. गृहपाठ न केल्याने या विद्यार्थ्याला शिक्षक रागवले. त्यामुळे रागात येऊन या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Gujrat murder case
गुजरातच्या वडोदरामध्ये विद्यार्थ्याची हत्या

शाळेला सुट्टी मिळावी म्हणून गुजरातच्या वडोदरातील एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वडोदरा शहरातील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. गृहपाठ न केल्याने या विद्यार्थ्याला शिक्षक रागवले होते. याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या हत्या प्रकरणाने हरियाणाच्या प्रद्युम्न हत्याप्रकरणाची आठवण करुन दिली.

चाकूने भोसकून केली हत्या

वडोदरा शहराच्या बरानपुरा भागातील श्री भारती शाळेत ही घटना घडली आहे. २२ जून रोजी सकाळी नववीमध्ये शिकणाऱ्या देव तवडी या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या टॉयलेटमध्ये सापडला. या विद्यार्थ्याच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करण्यात आले होते. तसंच भिंतीवर डोकं आपटून त्याची हत्या करण्यात आली होती. शाळेजवळच्या एका मंदिराच्या छतावर पोलिसांना बॅग सापडली त्यामध्ये दोन चाकू सापडले होते.

शिक्षक ओरडल्यामुळे रागात येऊन उचलले पाऊल

शाळेतील शिक्षकांनी गृहपाठ दिला होता. आरोपी विद्यार्थ्याने गृहपाठ न केल्याने शिक्षक त्याला ओरडले. याचा राग मनात धरुन त्याने शाळा बंद पाडण्याची योजना आखली. दुसऱ्या दिवशी हा विद्यार्थी दोन चाकू घेऊन शाळेत आला. त्यानंतर त्याने शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला टॉयलेटमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने त्याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. आरोपी विद्यार्थ्याच्या वडीलांचा नारळ पाण्याचा व्यवसाय असल्याने त्याचा चाकू उपलब्ध झाला. आरोपी विद्यार्थ्याला लगेच राग येतो. तसंच तो हिंसक असल्याचे शाळेतील शिक्षक आणि या विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले. दरम्यान आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली.

मृत विद्यार्थी आणि आरोपीची ओळख नव्हती

मृत विद्यार्थी वडोदराच्या गाजरावाडी परिसरात मावशीच्या घरी राहत होता. त्याचे आई-वडील आनंद जिल्ह्यातील बाकरोल गावात राहतात. काही दिवसांपूर्वीच हा विद्यार्थी त्याच्या मावशीकडे रहायला आला होता. श्री भारती शाळेत काही दिवसापूर्वीच या विद्यार्थ्याने अॅडमिशन घेतले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत विद्यार्थी आणि आरोपी विद्यार्थ्याची ओळखही नव्हती.

प्रद्युम्न हत्या प्रकरण

काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या गुरुग्राम येथे दुसरीमध्ये शिकणाऱ्या प्रद्युम्न याची शाळेत हत्या करण्यात आली होती. रेयान इंटरनॅशनल शाळेत ही घटना घडली होती शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या भितीने शाळा बंद करण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.