राज्यसभेतील चर्चेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा राजीनामा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉंग्रेसला (टीएमसी) आणखी एक मोठा झटका बसला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बंगालमधील हिंसाचार पाहून माझी घुसमट आहे, अशी भावना यावेळी दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केली. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेश त्रिवेदी येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

राज्यसभेत बोलताना दिनेश त्रिवेदी यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा उल्लेख केला. यावेळी प्रतिक्रिया देत असताना ‘मी आज राज्यसभेचा राजीनामा देत आहे. माझ्या राज्यात हिंसाचार होत आहे आणि आम्ही येथे काहीही बोलू शकत नाही, काहीच करु शकत नाही तर मग राजीनमा दिला पाहिजे असे माझे मन सांगत आहे. बंगालच्या लोकांसाठी मी काम करतच राहीन ‘, असेही ते पुढे म्हणाले.

यासह “प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी आज राज्यसभेतून राजीनामा देत आहे. मला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. पण राज्यात हिंसाचार सुरु असतानाही आपण काही करत नाही यामुळे माझी घुसमट होत आहे,” असेही त्यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. अशा परिस्थितीत तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे आणखी काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पक्षाचे आणखी काही खासदार राजीनामा देऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. बंगालमधील निवडणुका होण्यापूर्वी अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये एण्ट्री केली असून आता दिनेश त्रिवेदी यांचेही नावही चर्चेत आहे.