वाराणसीत आज मोदींचा मेगा रोड शो; उद्या भरणार उमेदवारी अर्ज

बिहारच्या दरभंगा येथे सभा संपल्यानंतर दुपारी मोदी वाराणसी येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर ३ वाजता मोदींच्या रोड शोची सुरुवात होणार आहे.

narendra modi to hold varanasi road show
मोदींचा आज वाराणसीत रोड शो

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशमध्ये दोन दिवसीय दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी पंतप्रधान आज उत्तरप्रदेशमध्ये दाखल होणार आहेत. २६ एप्रिल म्हणजे शुक्रवारी मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी २५ एप्रिल म्हणजे आज उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये मोदी भव्य रोड-शो करत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. वाराणसीमध्ये मोदींच्या रोडशो आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपने २०१४ पेक्षा ही मोठी जय्यत तयारी केली आहे.

असा असणार रोड शो

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार तयारी सुरु होती. बिहारच्या दरभंगा येथे सभा संपल्यानंतर दुपारी मोदी वाराणसी येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर ३ वाजता मोदींच्या रोड शोची सुरुवात होणार आहे. लंकामध्ये असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून मोदी रोडशोची सुरुवात करणार आहेत. लंका, अस्सी, सोनापुरा मदनपुरा, गोदौलिया असा करत या रोड शोची समाप्ती दशाश्वमेध घाटावर होणार आहे. जवळपास ७ किलोमीटर लांब आणि ४ तासाचा हा रोड शो असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता मोदी दशाश्वमेध घाटावर गंगेचे पूजन करुन आरती करणार आहेत.

भाजपचे हे नेते राहणार उपस्थित

मोदींच्या रोडशो आणि उद्या उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे सर्व वरिष्ठ नेता आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित असणार आहेत. त्याचसोबत अनेक राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, एनडीएचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या २६ एप्रिलला मोदी सकाळी भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे. त्यानंतर ते काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोदींसोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, निर्मला सीतारमण, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, जेपी नड्डा, हेमामालिनी, मनोज तिवारी, रविकिशन हे सहभागी होणार आहेत.