घरदिवाळी २०२१Diwali 2021 : दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व; धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशीमागील परंपरा

Diwali 2021 : दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व; धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशीमागील परंपरा

Subscribe

दिवाळी म्हणजे प्रकाशमय दिव्यांचा सण. देशभरात दिवाळी म्हणजे दीपावली हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा होतो. यंदाही २ नोव्हेंबरपासून देशात दीपोत्सवाला प्रारंभ होईल. दिवाळीत पाच दिवस अधिक महत्त्वाचे असतात. पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस या दिवसांपासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होतो. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दर्शी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे पाच वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या धर्माप्रमाणे साजरे केले जातात.

दसऱ्याची सांगता होतात दिवाळी सणाची लगबग सुरु होते, यात दिवाळीचा फराळ, खरेदी, सजावट यांचे नियोजन केले जाते. साधारणपणे वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र दिवाळीतील या प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्व आहे? त्यामुळे धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी या दिवसांमागे नेमक्या काय परंपरा आहेत ते आपण जाणून घेऊ.

- Advertisement -

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सणाचा मुहूर्त येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवाळी सणामागे किमान तीन हजार वर्षे जुना इतिहास असल्याचे सांगितले जाते.

चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यानिमित्ताने दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला जातो अशी दंतकथा सांगितली जाते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारे दीप मांगल्याचे प्रतीक म्हणून दिवाळी सणाकडे पाहिले जाते. यातून दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो असेही सांगितले जाते.

- Advertisement -

वसुबारस

वसुबारस पासून दिवाळीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होते. यंदा ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी वसुबारस साजरा होणार आहे. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाचा विशेष महत्त्व आहे. या दिवशी गाईची पाडसासह पूजा केली जाते. तर घराघरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

धनत्रयोदशी

यानंतर धनत्रयोदशीचा दिवस येतो. यंदा २ नोव्हेबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने या दिवसाला धन्वंतरी जयंती म्हटले जाते. तर जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ असं म्हणतात. या दिवशी विशेष कुबेर, विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या देवांची पूजा करून त्यांना पायसाचा नैवेद्य दाखविला जातो.

नरक चतुर्दशी

धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा ४ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी साजरी होणार आहे. या दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने दिवाळी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. नरक चतुर्दशीच्या पहाटे अभ्यांग स्नान करुन फटकड्यांची आतिषबाजी सुरु होते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमधील कथांनुसार, आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. असं म्हटले जाते.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन या दिवाळीतील सर्वांत महत्वाचा दिवस मानला जातो. यंदा ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन साजरा केलं जाणारं आहे. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी देवी-देवता आणि घरातील सोनं, धन-धान्याची पूजन केली जाते. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापाऱ्यांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धतही आहे.

बलिप्रतिपदा

यानंतर बलिप्रतिपदा हा सण येतो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून देखील ओळखला जातो. यंदा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे सोनं खरेदीला या दिवशी विशेष महत्त्व आहे. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात.

भाऊबीज

दिवाळीचा शेवटच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम त्याची  बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” या नावाने देखील ओळखले जाते. बहिण-भावाच्या प्रेमसंवर्धानचा हा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा ६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊजीब साजरी होणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते.


सुभाष घई यांचा ‘विजेता’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला, सुबोध भावे मुख्य भूमिकेत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -