घरसंपादकीयअग्रलेखभाजपसोबत व्हॅलेंटाईन्स डे!

भाजपसोबत व्हॅलेंटाईन्स डे!

Subscribe

भाजपसोबत सध्या विविध पक्षीयांना व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणे हितावह वाटत आहे. त्याला तशीच विविध कारणे आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक शंकरराव चव्हाण यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन भाजपसोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला. एकेकाळी देशात ‘सब कुछ काँग्रेस’ राहिलेला हा पक्ष गटांगळ्या खात असताना अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता पक्षाला रामराम करतो हा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग करणारा आहे.

काँग्रेस पक्ष कमालीचा अडचणीत सापडलेला असताना अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा कार्यकर्त्यांसाठी क्लेशकारक नक्कीच ठरला असेल. अपेक्षेप्रमाणे, नव्हे ठरल्याप्रमाणे अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश भाजपला बळ देणारा आहे. त्यांच्या पाठोपाठ कुंपणावर असलेले आणखी कितीजण भाजपमध्ये प्रवेश करणार हा औत्सुक्याचा भाग आहे. चव्हाण यांच्यासोबत काही आमदारही भाजपवासी होणार असल्याचे म्हटले जाते. अशोक चव्हाण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज होते. त्यामुळे भाजपचे बडे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते.

- Advertisement -

काँग्रेस सोडल्यानंतर दोन दिवसांत पुढील दिशा ठरवू, या चव्हाण यांच्या वक्तव्यात काहीच तथ्य नव्हते. अवघ्या चोवीस तासांच्या आत त्यांनी कमळ हाती घेत स्वत:ला पावन करून घेतले. या राजकीय घडामोडींकडे सामान्य जनता आता उद्विग्न होऊन पाहत आहे. कालपर्यंत एका पक्षात आणि दुसर्‍या दिवशी अचानक दुसर्‍या पक्षात हा प्रकारच डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. नेत्यांच्या बेडूक उड्या सुरू असताना त्यांच्यासोबत खरोखर किती कार्यकर्ते आहेत, हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून पळपुट्या नेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत, मात्र भाजपमध्ये गेलेले बहुतांश नेते कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात, भानगडीत अडकले आहेत. चौकशी यंत्रणांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्याच्या भीतीने अनेकजण भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेत. ज्या अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मोठे केले त्याच पक्षाला लाथ मारून त्यांनी भाजपचे उपरणे खांद्यावर घेतलेले पाहून काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्यांना वाईट वाटल्यावाचून राहणार नाही, तर काहींना हा प्रकार पाहून शिसारीही आली असेल! एका पक्षात राजकीयदृष्ट्या सदृढ व्हायचे आणि स्वार्थ आला की दुसर्‍या पक्षाच्या वळचणीला जायचे हाच प्रकार आता किळसवाणा वाटू लागला आहे. राजकारणातील नीतीमत्ता हा शब्द अलीकडे झपाट्याने रसातळाला गेला आहे.

- Advertisement -

स्वार्थासाठी सौदेबाजी करणार्‍या नेत्यांना, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, खड्यासारखे दूर ठेवले पाहिजे. आपल्याकडे लोकशाही आहे, पण ती अद्याप प्रगल्भ झाली नसल्याने संधीसाधू नेत्यांची पंढरी पिकली आहे. राजकारण हा धंदा झाला असल्याने लांडीलबाडी करून अनेक नेते त्यात स्वत:च्या तुंबड्या भरून घेत आहेत. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची दुसरी जनसंपर्क यात्रा देशात सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरी धरण्याची गरज आहे, परंतु चौकशी यंत्रणांकडून कारवाईची भीती आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यातून काँग्रेससह वेगवेगळ्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, प्रमुख कार्यकर्ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वतःला धुवून स्वच्छ करून घेत आहेत. ही वॉशिंग मशीन डागाळलेल्या नेत्यांना खरंच स्वच्छ करणार का, याचे उत्तर मिळण्यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.

केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसकडून अनेकजण तिकडे गेले. यात राणे पिता-पुत्र आहेत, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, पेणचे रवी पाटील, पनवेलचे प्रशांत ठाकूर, कालिदास कोळंबकर यांच्यापासून मिलिंद देवरा अशांचा समावेश आहे. काँग्रेसचे बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळाले आहेत. अजूनही काही बड्या नेत्यांची, विशेषत: सत्तेच्या खुर्चीची ऊब मिळाल्याशिवाय बेचैन असणार्‍यांची यात नावे घेतली जात आहेत, पण सध्यातरी काँग्रेसमध्ये फार मोठी स्थित्यंतरे घडतील अशी परिस्थिती दिसत नाही, तसेच काँग्रेसमधील परिस्थिती गंभीर नाही असेही छातीठोकपणे कुणी म्हणणार नाही.

यातून काँग्रेस नेतृत्त्व काही बोध घेईल असेही वाटत नाही. तब्बल दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्र विधानसभेत जुलै २०२२ मध्ये झालेल्या बहुमत चाचणीच्यावेळीच पक्ष नेतृत्त्वावर नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यासोबत इतर पाच आमदारही त्यावेळी उशिरा आल्याने चाचणीच्या वेळी त्यांना मतदान करता आले नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मदतीला अदृश्य हात आल्याची बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. खरंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वाला भविष्यातील घडामोडींची ही नांदी असल्याचे लक्षात यायला पाहिजे होते. गेले वर्षभर चव्हाण नाराज होते.

अनेकदा काँग्रेसच्या व्यासपीठावरील त्यांची देहबोली बरेच काही सांगून जात होती. त्यांच्या सत्ता काळात काही घोटाळ्यांशी त्यांचा संबंध जोडला गेल्याने भाजपने खुबीने त्यांच्यावर दबाव वाढवला होता. नुकतीच भाजपने लोकसभेत जी श्वेतपत्रिका आणली त्यात मुंबईतील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी चव्हाणांनी भाजपच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधानांनी जाहीर सभेत केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीतून सटकले आणि भाजपला जाऊन मिळाले. तसेच मोदी सरकारने श्वेतपत्रिकेतून आदर्श घोटाळ्याचा मारलेला खडा अशोक चव्हाण यांना बरोबर लागला असावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -