नटसम्राट…

संपादकीय

मागील ३ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंगमंचावर सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी नेमलेल्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावत अध्यक्षपदी पवारच राहतील असा ठराव केला. तो शरद पवारांनी मान्य केला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल असे एक-दोन अपवाद वगळता राष्ट्रवादीचे तमाम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सूर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडेच रहावे हा होता. त्यानुसारच हा निर्णय झाला आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मागील तीन दिवस प्रत्येकाच्या ओठी एकच वाक्य होते ते म्हणजे पक्षात शरद पवारांना पर्याय नाही. खरे तर या राजीनामा नाट्याचा अखेर असाच व्हायचा होता. कारण त्याची स्क्रीप्ट दस्तुरखुद्द पवारांनीच लिहिली होती. या राजीनामा नाट्यातून नेमके काय साध्य झाले? यावर आता चर्चा झडू लागल्या आहेत. त्यातून अनेक अर्थ आणि अन्वयार्थ काढले जातील. या नाट्याचा दुसरा, तिसरा, अंक रंगेल की नाही, हेही ठामपणे सांगता येणार नाही, परंतु या नाट्याचा थेट इफेक्ट म्हणजे वय झाले तरी आजही या रंगमंचावरील खरे हिरो किंबहुना खरे सूत्रदार आपणच आहोत, हे पवारांनी दाखवून दिले. तसा संदेशही पक्षाच्या नेत्यांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला गेला आहे. देशाच्या राजकारणातील मोस्ट अनप्रेडिक्टेबल नेता अशी शरद पवारांची ओळख आहे, त्याचा प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा आणून दिली आहे.

‘लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना शरद पवारांनी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याआधी भाकरी फिरवण्याची वेळी आलीय, असे म्हणत पक्षात मोठी उलथापालथ घडवण्याचे संकेत पवारांनी आधीच दिले होते. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करण्याआधी राज्यात एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि पवारांचे पुतणे अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी करण्याची. अजित पवारांना पक्षातील काही अस्वस्थ आमदारांचा पाठिंबा असल्याचेही म्हटले जात होते. अजित पवारांनी अनेकदा याबाबत खुलासे करूनही ही चर्चा थांबत नव्हती. सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेत पवारांनी याबाबतची स्पष्ट कल्पना ठाकरेंना दिली होती.

सोबतच पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही, ज्याला वैयक्तिक निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतात, असेही पवारांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरच पवारांनी अचूक टायमिंग साधत राजीनामा देण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेमुळे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वच जण बुचकाळ्यात पडले. अनेकजण अनपेक्षित धक्क्यामुळे धाय मोकलून रडू लागले, तर काही जणांनी साहेब जोपर्यंत निर्णय मागे घेणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. ही बातमी वार्‍यासारखी देशभर पसरली आणि एकच हल्लकल्लोळ उडाला. शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीतील प्रमुख नेते असल्याने ते सक्रिय राजकारणाबाहेर गेले, तर या आघाडीलाही फटका बसू शकतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडूनही शरद पवारांच्या मनधरणीसाठी फोन येऊ लागले.

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शरद पवारांचा २०१५ पासून ते आतापर्यंतचा राजकीय पट मांडण्यात आला आहे. यामध्ये अर्थातच महाविकास आघाडीमागच्या घडामोडींचा पवारांनी उहापोह केला आहे. भाजपचे लक्ष्य शिवसेना नसून राष्ट्रवादीच आहे. हे आम्हालाही ठावूक असून आम्ही सावध असल्याचे पवारांनी या पुस्तकात नमूद केले आहे. एकनाथ शिंदेंचे बंड घडवून आणत शिवसेनेला खिंडार पाडल्यावर भाजपचा मोर्चा राष्ट्रवादीकडेच वळणार हे शरद पवारांना पक्के ठावूक आहे. त्याचप्रमाणे आपली दुखरी नसही ते जाणून आहेत. त्यामुळे पक्षातील अस्वस्थ आमदारांचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकवटून भाजपसोबतच्या त्यांच्या हालचाली वाढू लागताच शरद पवारांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले. आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव, उलटफेर करण्याची ताकद वापरत शरद पवारांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहोत हे पुन्हा दाखवून दिले.

एकाच झटक्यात संपूर्ण पक्षाला चार्ज केले आणि अस्वस्थ आमदारांना वेसण घातले. जी चूक उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाबतीत गाफील राहून केली, ती चूक टाळण्याचा प्रयत्न शरद पवारांनी या कृतीतून केल्याचे दिसते. याउपर जर अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अस्वस्थ आमदारांना वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल, तर ती त्यांची राजकीय आत्महत्याच ठरेल, इतपत सहानुभूती पवारांनी एक डाव टाकून मिळवली आहे. भाजपने केलेल्या छुप्या हल्ल्यांमुळे उद्धव ठाकरे गलितगात्र होण्याऐवजी त्यांना मिळणारी सहानुभूती आणि लोकप्रियता सतत वाढतच आहेत. मागील ३ वज्रमूठ सभांमधून हेच दिसून आले आहे. हे सुरूच राहिल्यास त्यातून राष्ट्रवादीची पीछेहाट होऊ शकेल, असा विचार करतही पवारांनी राजीनामा अस्त्राची वेळ निवडल्याचे दिसत आहे. काही का असेना मागील ३ दिवसांमध्ये अजित पवारांच्या तथाकथित बंडाच्या चर्चा, वज्रमूठ सभेला मिळणारा प्रतिसाद आणि उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेचे गोडवे यावरून सार्‍यांचे लक्ष शरद पवार या नटसम्राटाने स्वत:कडे खेचून घेतले.