अब मजा आयेगा!

Subscribe

अमरावतीत भाजपने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ आणि अपक्ष बच्चू कडू यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. बच्चू कडू यांनी तर राणा यांच्या उमेदवारीवरून अब मजा आयेगा असे म्हणत थेट भाजपला आव्हान दिले आहे. महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या असंतोषाला कडू यांनी वाट मोकळी करून दिली आहे. येत्या काही दिवसात त्याचा उद्रेक झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपला नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी बसवायचे आहे. त्यासाठी देशभरात भाजपने फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू केले आहे.

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप काँग्रेसजनांना भाजपमध्ये घेत त्यांना थेट उमेदवारी देत आहे. त्यामुळे भाजपमधील काही नाराज वरिष्ठ नेते, मंत्री निवडणुकीपासून दूर होऊ लागले आहेत. काही विद्यमान मंत्री आणि खासदारांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णयही घेतला आहे, पण त्याची भाजप श्रेष्ठींना काही फिकीर नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदावर बसवतानाच चारशेहून अधिक खासदार निवडून आणण्याचेही भाजपचे स्वप्न आहे.

- Advertisement -

चारशेहून अधिक खासदार निवडून आणण्याचा विक्रम राजीव गांधी यांनी केला होता. त्यावेळी एकट्या काँग्रेसचे ४१४ खासदार निवडून आले होते. तो विक्रम आतापर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही. भाजपने अबकी बार चारसौ पारचा नारा दिला असला तरी एनडीएशिवाय हा आकडा पार करणे भाजपला सोपे नाही. म्हणूनच भाजपकडून स्वबळावर चारशेहून अधिक खासदार निवडून आणू, असे म्हटले जात नाही. हे गणित जुळवून आणण्यासाठी भाजप सर्वशक्तींचा वापर करून विरोधकांना जेरीस आणताना दिसत आहे.

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारे भाजपचे नेते विविध राज्यात काँग्रेसच्या नेत्यांनाच आपल्या छत्रछायेखाली घेऊ लागले आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण हरयाणा राज्यातील देता येईल. याठिकाणी लोकसभेच्या फक्त दहा जागा आहेत. त्यातील सहा जागांवर भाजपच्या कमळ चिन्हावर काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या प्रत्येकी एकेका खासदाराला भाजपने आपल्याकडे घेऊन लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताकदीवर फारसा भरवसा नसल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेसमधून आलेल्या आमदार राजू पारवे यांना रामटेकमधून लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी शिंदेंसोबत आलेले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांचा मात्र बळी देण्यात आला आहे.

शिंदे गट भाजपच चालवत असल्याचे दिसू लागल्याने शिंदेंसोबत आलेल्या खासदारांसोबत भविष्यातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेऊन असलेल्या आमदारांचीही धाकधूक वाढली आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जाऊन गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपकडून त्यांना कडवा विरोध केला होता. प्रारंभी भाजपने या जागेवर दावा केला होता. आता राष्ट्रवादी आणि मनसेकडून दावा केला जात आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाचे आंदोलन पेटवले होते, तेव्हा भाजपची कुणबी वोटबँक धोक्यात येण्याची भीती होती. त्यावेळी एकमेव छगन भुजबळ जरांगे-पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरले होते. मराठा समाजाचा रोष पत्करत भुजबळ महाराष्ट्रभर फिरले होते. तेव्हा भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाच्या नेत्यांची मराठा आंदोलनाविरोधात बोलायची हिंमत झाली नव्हती. ती हिंमत दाखवलेल्या छगन भुजबळ यांना बक्षिसी म्हणून भाजप राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीने सातार्‍यावर दावा केला असून त्याबदल्यात नाशिकची जागा सोडली, असे सांगून शिंदे गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला देताना सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्याची अट घालून भाजपने पवार कुटुंबात संघर्षाची ठिणगी पेटवली आहे. बारामतीमधील शरद पवारांचे साम्राज्य उलथवून टाकण्याचा भाजपचा गेल्या अनेक वर्षांपासूनच प्लान असून अजित पवारांच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात आणण्याची भाजपची रणनीती आहे. याचबरोबर बारामतीच्या जागेवरून शिंदे आणि पवार गटातच वादाची पेरणी करण्याचे कामही झाले आहे. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन हा निसर्गाचा नियमच आहे.

स्वपक्षीयच नव्हे, तर शिंदे-पवार गटाला दाबण्याची भाजपची रणनीती त्यांच्याच अंगलट येऊ शकते, हे अमरावतीत विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपमध्ये घेऊन थेट उमेदवारी दिल्यावरून सुरू झालेल्या नाराजी नाट्याने समोर आले आहे. अभिजित अडसूळ यांनी विरोध सुरू केला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपला आव्हान दिले आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात तो अजूनही प्रलंबित आहे. त्यावरही कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालय नव्हे पक्षालय असा आरोप करतानाच लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पक्ष कार्यालय फोडणार्‍यांनाच उमेदवारी देण्याची लाचारी भाजपवर आली असून हे दुर्दैवी असल्याचेही कडू यांनी म्हटले आहे. त्याचवेळी राणांविरोधातच काम करणार, असा इशारा देत अब मजा आयेगा, असा इशारा भाजपला दिला आहे. भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात कडू यांच्या बंडाची ठिणगी वणव्यात रूपांतरित झाली, तर भाजपला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -