घरसंपादकीयअग्रलेखजाऊ द्या ना बाळासाहेब

जाऊ द्या ना बाळासाहेब

Subscribe

हो नाही करता करता अखेर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या युतीचे घोडे गंगेत न्हाहले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात या युतीची अधिकृत घोषणा केली. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महान समाजसुधारकांचे हे दोन्ही नातू एकाच व्यासपीठावर आले होते. खरंतर तेव्हापासूनच वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत होते, परंतु ही युती नेमकी कधी होणार याबाबत कुणीही जाहीरपणे भाष्य करायला तयार नव्हते.

अपवाद फक्त प्रकाश आंबेडकर यांचा. रोकठोक बोलणे हाच प्रकाश आंबेडकर यांचा स्थायी भाव. त्यामुळे ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात आमची चर्चा झाली असून केवळ त्याची जाहीर घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच करतील, असे ते अधूनमधून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते, परंतु ठाकरे गटातील एकाही नेत्याकडून त्यांच्या वक्तव्याला दुजोरा मिळत नसल्याने थोडेफार संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही भेटीगाठी घेतल्याने आंबेडकर ठाकरे गट सोडून शिंदे गटासोबत युती करणार अशा वावड्यादेखील होत्या. वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाल्याने अफवांचा हा बाजार तात्पुरता तरी थांबला आहे.

- Advertisement -

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देऊन शिंदे गट शिवसेनेतून फुटून बाहेर पडला. यामुळे शिवसेनेला भलेमोठे भगदाड पडले. ठाकरे गट-शिंदे गट अशी शिवसेनेची दोन शकले झाली. तरीदेखील भाजपशी दोन हात करायचे असल्यास किंवा त्यांना सत्तेत जाण्यापासून रोखायचे असेल, तर आपले अर्धेमुर्धे बळ काही कामाचे नाही हे ठाकरे गटाला चांगलेच समजलेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासोबतच भाजपचा वारू रोखण्यासाठी का होईना ठाकरे गटाने अजूनही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडलेली नाही. सत्तेतून पायउतार होऊनही महाविकास आघाडी बरखास्त झालेली नाही. उलट कितीही वैचारिक मतभेद असले तरी या दोन्ही साथीदारांचे हात घट्ट पकडून ठेवत ठाकरे गट वंचितच्या रुपाने नवा भिडू महाविकास आघाडीत आणू पाहत आहेत.

जेणेकरून निवडणुकीच्या वेळेस होणारी मतविभागणी टाळून भाजपला एकसंधपणे उत्तर देता येईल, मात्र वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत त्यातही खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात विस्तवही जात नसल्याने हे चर्चेचे घोडे जागीच पेंढ खात असल्याचे म्हटले जात होते. आजही ठाकरे गट आणि वंचितमध्ये युती झाली असली तरी वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग बनलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठाकरे-वंचित युतीमध्ये घेऊन यायचे की वंचितला महाविकास आघाडीत घेऊन जायचे याचे वकीलपत्र आम्ही उद्धव ठाकरेंना दिले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणतात. सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीला आमचा विरोध नसून ते आमच्या युतीसोबत आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू. सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत असल्याने या युतीच्या माध्यमातून आम्ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन भाजपच्या एकाधिकारशाहीविरोधात लढू. कारण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर जाहीरपणे मांडतात, तर दुसर्‍याच दिवशी शरद पवार अजूनही भाजपसोबतच असल्याचा दावा करत अद्याप न झालेल्या आघाडीत बिघाडीची बिजे सोडतात हे अनाकलनीय ठरते.

- Advertisement -

राज्याच्या राजकारणातील एक बुद्धिवादी आणि सडेतोडपणे मते मांडणारा नेता म्हणून प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्राला नव्हे, तर संपूर्ण देशाला ओळख आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मनुवादाचे पुरस्कर्ते असून आधी धर्म त्यानंतर राष्ट्र या मांडणीतून ते मतांचे ध्रुवीकरण करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे. भाजपला प्रमुख विरोधी पक्षांसोबतच प्रत्येक राज्यातील सक्षम प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत करून देशात एकपक्षीय एकाधिकारशाही आणायची आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापले मतभेद विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि या राजकीय गरजेतूनच नामांतर लढा असो वा रिडल्सप्रकरणी शिवसेनेसोबत भूतकाळात दोन हात केलेले असूनही युती केल्याचे आंबेडकर म्हणतात. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे कडवट असले तरी त्यांची भूमिका अधिक मतदारकेंद्रित होती, तर उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे मनुस्मृतीला, जातीय उतरंडीला मोडीत काढणार्‍या प्रबोधनकारांच्या वाटेवरचे असल्याचे प्रकाश आंबेडकरांना वाटते. हे खरे मानल्यास वंचितसोबतच पुढील राजकीय वाटचालीतील आपला साथीदार असलेल्या ठाकरे गटाला पूरक आणि पोषक ठरेल अशा भूमिकांकडे आता प्रकाश आंबेडकर यांना अधिक लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे.

कधीकाळी झालेल्या वंचित आणि एमआयएम युतीला जशा मर्यादा होत्या, तशाच मर्यादा वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीलाही आहे. त्याची जाणीव आंबेडकरांना असेलच. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेले जुने राग उगीच आळवत बसण्याला काहीच अर्थ नाही. शरद पवार यांचे राजकारण कितीही अनप्रेडिक्टेबल असले तरी सत्तेच्या गरजेपोटी का होईना त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकला हे विसरून चालणार नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्याच्या घडीला शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधी आघाडीतील प्रमुख स्तंभापैकी एक आहेत. हे आंबेडकरांना पटो वा ना पटो, त्यांना मविआचा भाग बनण्यात स्वारस्य असो वा नसो, दुश्मन का दुश्मन दोस्त या नात्याने आघाडी भक्कम करण्यासाठी नव्याने स्नेहसंबंध जुळवून घ्यावेच लागतील. सध्याच्या राजकीय स्थित्यंतरातून जात असताना मागचे उणेदुणे सोडून देणेच प्रकाश उर्फ बाळासाहेबांसाठी इष्ट ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -