घरसंपादकीयअग्रलेखठाकरेंची समाजवाद्यांना साद!

ठाकरेंची समाजवाद्यांना साद!

Subscribe

समाजवादी आणि शिवसेना यांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे, तर डर कसला. आपण मिळून भाजपला हरवू शकतो. माझ्यासोबत आला आहात, पश्चातापाची वेळ येणार नाही, अशी ग्वाही देत उद्धव टाकरे यांनी रविवारी मुंबईत थेट समाजवादी परिवाराशी संवाद साधला. भाजपविरोधात ठाकरे यांनी राज्यातील विविध पक्ष, गटांना सोबत घेण्याचे काम सुरू केल्याचे दिसत आहे. रविवारी समाजवादी विचारांच्या २१ विविध पक्ष आणि संघटनांना सोबत घेण्याच्या दिशेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पहिले पाऊल उचलले. विविध समाजवादी पक्ष, गट आणि संघटनांना एकत्र करण्याचे काम जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई आणि पुण्यात बैठका घेऊन राज्यातील समाजवादी परिवाराची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात यश मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी बांद्य्रात मातोश्रीजवळ समाजवादी जनता परिवाराच्या पदाधिकार्‍यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद घडवून आणला.

कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना समाजवादी परिवारातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नुकतीच शंभरी पार केलेल्या डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वतः येऊन कपिल पाटील यांच्या समाजवादी परिवाराला पाठिंबा दिला. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा यांच्यासारखे ज्येष्ठ समाजवादी नेतेही कपिल पाटील यांच्या पाठीशी दिसत आहेत. रविवारच्या संवादाला तरुणांपासून ते ऐंशी-पंच्याऐशी वयाचे समाजवादी नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी समाजवादी परिवाराला मैत्रीची हाक दिली. त्यासाठी त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांचे समाजवादी परिवाराशी असलेल्या नात्यांना उजाळा दिला. ठाकरे यांनी समाजवादी परिवाराचे कौतुक करताना भाजप आणि संघावर टीका केली.

- Advertisement -

स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणीविरोधी लढ्यात समाजवादी आघाडीवर होते. संघ यात कुठे होता. फोडाफोडी करण्यात मात्र संघाचा हात असतो. समाजवाद्यांनी देश घडवण्यात महत्वाचा वाटा उचलला. भाजप देश बिघडवत असल्याने सर्वांनी एकत्र येऊन देश आणि महाराष्ट्र वाचवुया, असे आवाहन ठाकरे यांनी केले. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भाजपकडून क्रिकेट सामन्यात पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव केला जात असेल, तर शिवसेनेने समाजवाद्यांना सोबत घेण्यात गैर काय, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने विविध पक्षांशी सत्तेसाठी तडजोड करून त्यांची कशी वासलात लावली याचे अनेक दाखले ठाकरेंनी दिले. त्यामुळे अशी फसवणूक करणार्‍या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्यावर्षीच्या जून महिन्यात भाजपने एकनाथ शिंदे गटाला फोडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले. तेव्हापासून भाजप आणि ठाकरेंमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. स्वतःकडे सर्वाधिक आमदार असतानाही भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. भाजप-शिंदे गट मजबूत असतानाही राष्ट्रवादी फोडून भाजपने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिले. भाजप आणि एकनाथ शिंदेंकडून आपले एकेक मोहरे टिपले जात असताना उद्धव ठाकरे यांनी कोणतीही तडजोड न करता भाजपशी दोन हात करणे पसंत केल्याचे दिसत आहे. भाजपविरोधकांना एकत्रित करण्याचे काम सध्या उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. विविध पक्षांच्या इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे महत्वाची भूमिका बजावत आहेत. प्रकाश आंबेडकरांनाही त्यांनी जवळ केले आहे.

- Advertisement -

युक्रांत आणि संभाजी ब्रिगेडसोबतही उद्धव ठाकरे संपर्क ठेवून आहेत. आता समाजवादी विचारसरणीच्या २१ पक्षांसोबत त्यांनी वैचारिक संवाद साधत मैत्रीची साद घातली आहे. आपण सगळे एकत्र आलो तर भाजपलाही पाडू शकतो, असे सांगताना जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईत स. का. पाटील या बड्या नेत्याचा पराभव केल्याची आठवण करून दिली. प्रबोधनकार ठाकरे आणि समाजवादी चळवळीच्या नेत्यांचा वैचारिक सलोखा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वैचारिक मतभेद होऊनही समाजवादी नेत्यांशी मैत्री जपली होती. मुंबई महापालिकेत १९६८ साली समाजवादी आणि शिवसेना यांनी युती केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रजा समाजवादी पक्षाशी केलेली युती १९७० पर्यंत टिकली होती. काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडीकेट, रिपब्लिकन गवई गट, मुस्लीम लीग, काँग्रेस, दलित पँथर यांच्याशीही बाळासाहेबांनी काही काळ होईना युती केली होती.

१९९० मध्ये झालेली भाजप-शिवसेना युती सर्वाधिक काळ टिकली होती. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर भाजपने जून २०२२ मध्ये शिवसेना फोडण्याचे काम केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे भाजपविरोधात मैदानात उतरले आहेत. राज्यातील विविध विचारांच्या पक्ष, संघटनांना सोबत घेण्याचे काम सुरू केले आहे. समाजवादी जनता परिवारातील वेगवेगळे पक्ष, गट, संस्था, संघटनांनी ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आजही सहा टक्के समाजवादी विचारांची मते आहेत, पण ती विभागली गेल्याने त्यांची ताकद दिसून येत नाही. आमदार कपिल पाटील यांनी समाजवादी जनता परिवाराच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याचे काम केले आहे. त्याला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ताकद दिली आहे. भाजपला आव्हान देण्याकरिता ठाकरे यांना साथ देण्यासाठी समाजवादी एकवटले असले तरी निवडणुकीचे समीकरण कसे जुळवणार यावर पुढील वाटचाल अवलंबून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -