घरसंपादकीयअग्रलेखआरोग्य तपासणीचा जीवघेणा धंदा

आरोग्य तपासणीचा जीवघेणा धंदा

Subscribe

सरकारी हॉस्पिटलमधील मृत्यूंना मी एकटाच जबाबदार नव्हे. ज्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाले ती आरोग्य विभागाच्या नाही, तर वैद्यकीय शिक्षण विभागात येतात. त्यामुळे मला प्रश्न विचारू नका, ही महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनतेचे सरकारमधील जबाबदार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया धक्कादायक, तितकीच बेजबाबदारपणाचीच म्हटली पाहिजे. त्यामुळे सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काय अपेक्षा करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यांच्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांचाही सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबतचा बेजबाबदार कारभार वसई-विरार महापालिकेतील कारभारावरून दिसून आला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने निलंबित केलेल्या डॉक्टरच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची वसई-विरार महापालिकेने कोणतीही खातरजमा न करताच पॅथॉलॉजी लॅबना परवाना दिला आहे. त्यानंतर निलंबित डॉक्टरच्या सहीने रुग्णांची आरोग्य तपासणी करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करत धंदा उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुग्णमित्रांनी पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतरही महापालिकेने फक्त नोटिसा बजावून कोणतीच कारवाई न करता लॅबचालकांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्रात कळवा, नांदेड, संभाजीनगर आणि नाशिक येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांचे जीव घेणार्‍या या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला असताना जबाबदार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही हॉस्पिटल्स माझ्या खात्याशी संबंधित नसल्याचे सांगत मला याबाबत प्रस्न विचारू नका, असे बेजबाबदार उत्तर दिले आहे. सरकारी यंत्रणा सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल्सना पाठीशी घालत असल्याने सर्वसामान्य रुग्णांची लुटमार सुरू आहे. कोरोना काळात विरारमधील खासगी हॉस्पिटल्सनी रुग्णांची कोट्यवधी रुपयांची केलेली लुटमार वसई-विरार महापालिकेने ऑडिट करून पैसे परत करण्याचे आदेश हॉस्पिटल्सना काढल्यानंतर समोर आली होती, पण लुटमारी करणार्‍या हॉस्पिटल्सवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचा धंदा सुरूच आहे. कोरोना काळातच विरारमधील विजय वल्लभ या खासगी हॉस्पिटल्समध्ये २१ एप्रिल २०२१ च्या मध्यरात्री मोठी आग लागली होती. त्या आगीत 15 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याने देशात खळबळ माजली होती. त्याआधी १२ एप्रिलला ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने नालासोपारा येथील विनायका हॉस्पिटलमध्ये 7 कोरोनाबाधित रुग्ण दगावले होते. विजय वल्लभप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात आली होती, पण त्याचा अहवाल अद्यापही गुपित ठेवण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आजही अहवाल गोपनीय असल्याचे कारण देत नाकारला जात आहे. पुढे काय कारवाई झाली हेही लपवून ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी हॉस्पिटल पुन्हा सुरू होत असल्याची चर्चा होती, तर विनायका हॉस्पिटल आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. उलट कोरोना गेल्यानंतर खासगी हॉस्पिटल्सची संख्या वाढली आहे. वसई -विरार महापालिका हद्दीत अडीचशेहून अधिक खासगी हॉस्पिटल्स आहेत. अनधिकृत इमारती, चाळी, धोकादायक इमारती, पत्र्याच्या शेडसारख्या ठिकाणी खासगी हॉस्पिटल्स सुरू असून त्यांच्यावर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अशा हॉस्पिटल्सना ना हरकत परवाना दिल्याचे दिसून येते. विजय वल्लभ दुर्घटनेनंतर वसईत फायर ऑडीटचा गंभीर प्रश्न समोर आला होता. अग्निशमन विभागाचा त्यावेळचा भोंगळ कारभारही उजेडात आला होता.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनधिकृत इमारती, मान्यता नसलेल्या अनधिकृत खासगी हॉस्पिटल्स, बोगस डॉक्टर कार्यरत असताना बोगस डॉक्टर शोध पथक काय काम करते, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यात आता बोगस पॅथॉलॉजी लॅबचा नवा धंदा तेजीत असल्याचे उजेडात आले आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द केला असतानाही गुजरातचा डॉक्टर राजेश सोनी हा तेरा लॅबमधील रक्त, मलमूत्र तपासणीच्या रिपोर्टवर बिनदिक्कत सह्या करत होता. याबाबतच्या तक्रारी महापालिकेला झाल्यानंतर महापालिकेने श्री जी पॅथोलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टिक सेंटर,गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरीज, ग्लोबल केअर अँण्ड वेल्फेअर डायग्नोस्टिक सेंटर, श्री धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज या पाच पॅथॉलॉजी लॅबला बंद करण्याची नोटीस दिल्या, मात्र काहीच कारवाई केली गेली नसल्याने त्या लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. डॉ. सोनी मुंबईत अशाच पद्धतीने व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आल्यावरून मेडिकल कौन्सिलने त्याला निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी वसई-विरार परिसरात आपले बस्तान बसवले आहे. अशा लॅबमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात असतानाही महापालिकेने केवळ सोपस्कार म्हणून नोटिसा धाडल्या आहेत, मात्र यातील बहुतेक लॅब चालू आहेत. डॉ. सोनीच्या ऐवजी दुसर्‍या डॉक्टरना या लॅबने ठेवले आहे. एका लॅब चालकाने तर महापालिकेकडे सादर केलेल्या लॅब परवानगी अर्जाची पोच घेऊन त्यावरच बिनधास्तपणे लॅब चालू केली आहे. आजाराचे निदान करणारे रिपोर्टच लॅबमधून बनावट बनवले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. बोगस विम्याचा परतावा मिळवण्यासाठी बोगस लॅबचा वापर होत असल्याने वैद्यकीय क्षेत्राशी काहीही देणेघेणे नसलेल्यांनी डॉ. सोनींसारख्या बोगस डॉक्टरला हाताशी धरून धंदा थाटला आहे. हा प्रकार फक्त वसई-विरारपुरताच मर्यादित नसून डॉ. सोनीवर झालेल्या कारवाईनंतर राज्यातील मोठ-मोठ्या शहरात बोगस लॅब चालवल्या जात असल्याचे दिसून येते. पैशांच्या मोहापायी काही खासगी हॉस्पिटल्स आणि काही लॅब चालकांनी धंदा थाटून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालवला आहे. तो रोखणार कोण, हा खरा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -