महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ सुफळ संपूर्ण!

congress leader rahul gandhi bharat jodo yatra successful in Maharashtra

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची बहुचर्चित भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा यशस्वी झाल्याचे मान्य करावे लागेल. ही यात्रा यशस्वी होईल की नाही, याची धाकधूक पक्षाच्या राज्यातील नेत्यांना होती. दक्षिणेकडून यात्रेने नांदेडमध्ये प्रवेश केल्यानंतर जे काही स्वागत झाले त्यामुळे नेत्यांचा उत्साह दुणावला आणि पुढे मग या यात्रेचे प्रत्येक टप्प्यावर जल्लोषात स्वागत झाले. काँग्रेस पक्ष एका विचित्र अवस्थेतून जात असताना राहुल गांधी यांची यात्रा या पक्षासाठी काहीशी संजीवनी देणारी ठरत आहे, मात्र यात्रेमुळे लगेच काही चमत्कार घडेल असे आता काही म्हणता येणार नाही, किंबहुना तशी परिस्थितीही नाही. भारत जोडो यात्रेची विरोधकांनी, विशेषत: भाजपच्या नेत्यांनी, यथेच्छ खिल्ली उडविण्याचे सुरुवातीला काम केले, पण ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेला प्रतिसाद मिळाल्याचे पाहून विरोधकांची टीका-टिप्पणी बरीचशी बंद झाली. राहुल गांधी यांची प्रतिमा डागाळण्याचे काम विरोधकांनी सुरुवातीपासून केले आहे.

त्यांना अनेकदा ‘पप्पू’ म्हणूनही हिणवण्यात आले. ही ‘पप्पू’ची प्रतिमा पुसून टाकण्यास यात्रेचा मोठा हातभार लागला असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. राहुल गांधी यांनी त्यांच्यावर प्रत्येक वेळी झालेल्या वैयक्तिक टीकेचा खरपूस समाचार घेतला असे फारसे कधी घडलेले नाही. त्यामुळे यात्रेच्या प्रारंभी राहुल यांच्या पायातील बुटावर टिप्पणी करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. राजकारणात टीका होत असते, परंतु ती इतकी बालिशपणाची वाटेल अशीही नसावी, याची प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात मरगळ आलेल्या काँग्रेसला कितपत लाभ होणार हा आता औत्सुक्याचा भाग आहे. कारण राज्यातील पक्ष संघटना नेत्यांच्या आपापसातील कुरबुरी, कुरघोड्या या कारणांमुळे खिळखिळी झाली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्या-आल्या नाना पटोले यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली ही बाब जुन्या नेत्यांना अद्यापही मान्य नाही. तसेच प्रदेश समितीचा दर्जा असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची झालेली नियुक्तीसुद्धा अनेकांना मान्य नाही. परिणामी हा जुना पक्ष आजमितीला गटातटाच्या राजकारणात गुंतून पडलेला आहे.

महागाई, बेरोजगारी यासह इतर महत्वाच्या प्रश्नांवर प्रभावी आंदोलन काँग्रेसकडून पुकारण्यात आले असेही दिसलेले नाही. आजही नेते अंगावरील परीट घडी विस्कटू देण्यास राजी नाहीत. आपल्या पक्षाला मतदारांनी का नाकारले याचे चिंतन होत नाही. गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस असतानाही मंत्रिपद मिळालेल्या पक्षातील नेत्यांना आक्रमकपणे काम करता आले नाही हे कटू वास्तव नाकारता येणार नाही. बर्‍याच मंत्र्यांचा तक्रारीतच वेळ जाताना जनतेने पाहिला. पक्षाला आलेली मोठी संधी नेत्यांनी हातची घालवली हे नाकारता येणार नाही. येत्या काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यासाठी पक्षाची तयारी शून्य आहे. मध्येच नाना पटोले स्वबळाचा नारा देत असतात ते कुणाच्या भरवशावर हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेते सुस्त असल्यामुळे कार्यकर्तेही सुस्तावल्यासारखे झाले आहेत.

महाराष्ट्रातील दोन-चार जिल्हा संघटना सोडल्या तर इतरत्र कमालीची मरगळ आहे. राज्यातील नेते यावर विचार करीत नाहीत. याकरिता भारत जोडो यात्रेने या मरगळीला बुस्टर डोस दिला का ते आता दिसणार आहे. यात्रा मध्य प्रदेशात शिरताच राज्यातील नेते पुन्हा सुस्तावणार असतील तर मग साराच आनंद आहे, परंतु ही सुस्ती आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका लक्षात घेता नक्कीच परवडणारी नाही. राहुल गांधी यांची यात्रा शहरी भागातून फारशी गेली नसली तरी इतर ठिकाणी मिळालेला प्रतिसाद कार्यकर्त्यांना सुखावणारा आहे. कार्यकर्ते पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यासारखे आहेत. त्यांना आता विविध प्रश्न हाती घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यासाठीचे मार्गदर्शन नेत्यांना करावे लागणार आहे. राहुल गांधींसोबत चालून झाले म्हणजे आता पक्ष संघटनेला आलेली मरगळ दूर होणार या भ्रमात नेतेमंडळींनी राहू नये. शेवटी कार्यकर्त्याला दिशा ही द्यावीच लागते. त्याच्या पाठी ठाम उभे रहावे लागते. पुढील निवडणूक आघाडी करून लढवावी लागणार का, याचाही विचार आतापासून झाला तर कार्यकर्त्यांना निश्चित अशी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

राहुल गांधी यांची गुलछबू अशी हेटाळणी झाली आहे. ते वाहनाशिवाय फिरत नाहीत, त्यांचे जीवन ऐशोरामी असल्याचीही टीका झाली. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी १२ राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश यातून पायी तब्बल ३५७० किलोमीटर चालण्याचा संकल्प सोडला आहे. राहुल गांधी यांचे यात्रेतील वर्तन एखाद्या परिपक्व नेत्यासारखे वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी टीका करून नसती राळ स्वत:च्या अंगावर ओढून घेतली हे त्या पक्षातील अनेक नेत्यांनाही मान्य नसेल. तेवढा प्रसंग सोडला तर अतिशय संयमाने ते पुढे निघाल्याचे दिसून येते. हेच लक्षण बुडत्या काँग्रेसला तारण्यास मदत करेल असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. भारत जोडो यात्रा सुरू असतानाच गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे. याकरिता यात्रा दोन दिवस थांबवून राहुल गांधी तिकडे प्रचारासाठी गेले. या यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याचा चपखल उपयोग तेथील स्थानिक नेते पक्षाच्या प्रचारादरम्यान करून घेणार का, असा सवाल स्वाभाविकपणे उपस्थित होतो.

भाजपचे कडवे आव्हान तेथे आहे. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत उडी घेतली असली तरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच प्रामुख्याने होणार आहे. म्हणून राहुल गांधी यांच्यासह नूतन अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे आणि इतर नेत्यांची सत्वपरीक्षा पाहणारी गुजरात निवडणूक असेल. या निवडणुकीसाठी भाजपचा आयटी सेल ताकदीनिशी मैदानात उतरला असून, राहुल गांधी आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची खिल्ली उडविण्याचे काम सुरू आहे. यात्रेनिमित्त काँग्रेसच्या आयटी सेलवरील मरगळ झटकली गेली आहे. हा विभाग भाजपची पोलखोल कशी करतोय याची मतदारांना नक्कीच उत्सुकता असेल. भारत जोडो यात्रा ही आतापर्यंतच्या पदयात्रांत अभूतपूर्व ठरणारी आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा सर्वसमावेशक ठरत आहे. छोटे-मोठे कार्यकर्ते इथपासून सामान्यजन त्यांना क्षणभर का होईना पण थेट भेटत आहेत. हा उत्साह कायम टिकवून ठेवण्याची जबाबदारी नेत्यांची आहे. महाराष्ट्रात ही यात्रा ‘सुफळ संपूर्ण’ झाली असे म्हणावे लागेल. म्हणूनच कदाचित नाना पटोले म्हणत असावेत की, यात्रा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहेत.