घरसंपादकीयदिन विशेषरसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर

रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर

Subscribe

डॉ. शांतिस्वरूप भटनागर हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८९४ रोजी शाहपूर याठिकाणी झाला. काही पायसांच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मांसंबंधी संशोधन करून भटनागर यांनी १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाची डी.एस्सी पदवी मिळविली. त्यानंतर ते भारतात परतले व त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले.

१९२४ मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९२६ पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ करून या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेले चुंबकीय व्यतीकरण संतुलनमापक हे उपकरण के. एन. माथूर यांच्या सहकार्याने तयार केले व त्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. १९३६ मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली.

- Advertisement -

या कार्याकरिता या कंपनीने दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामध्ये केरोसीनचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन, वंगणे व वंगणक्रिया, धातूंच्या क्षरणक्रियेला प्रतिबंधन यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केले. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब देऊन गौरवले. अशा या प्रयोगशील शास्त्रज्ञाचे १ जानेवारी १९५५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -