घरसंपादकीयदिन विशेषनोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन

Subscribe

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी आहेत. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत, तसेच दारिद्य्राच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोेजी शांतीनिकेतन येथे झाला. त्यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि १९५३ मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. नंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.

१९५५ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी दुसर्‍यांदा अर्थशास्त्र विषयात बी. ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी तेथूनच १९५९ मध्ये एम. ए. आणि त्याच वर्षी पीएच. डी. या पदव्या संपादित केल्या. पुढे १९५८-१९६३ या काळात ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये अधिछात्र होते. १९५५-१९५८ या काळात त्यांनी जादवपूर विद्यापीठ व १९६३-१९७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन केले. नंतर १९७१-७७ या काळात त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि १९७७-१९८८ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे अध्यापन केले. अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्वज्ञान विषयाचा अभ्यास केला.

- Advertisement -

त्यांची १९९८-२००४ या काळापर्यंत ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांनी १९७० मध्ये लिहिलेल्या आपल्या ‘कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर’ (१९७०) या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. यातून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी समाजातील दारिद्य्राचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. देशात दारिद्य्राचे प्रमाण किती आहे; त्याचे विभाजन कसे आहे; त्यात वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -