राष्ट्रकुलमध्ये भारत : ‘कॉमन’ नाही, तर ‘वेल्थ’!

जगभरातल्या खेळाडूंचा महाकुंभ असलेल्या या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धेत भारताने अपेक्षित कामगिरी करण्यात काहीसे यश मिळवलेले दिसून आले. काही खेळाडूंना दुखापतीमुळे, तर काहींना डोपिंगमुळे या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने भारताची चिंता वाढली होती. मात्र, तरीदेखील अन्य खेळाडूंनी ही कमतरता भरून काढत पदकांची कमाई करण्याचे ध्येय डोळ्या पुढून हटू दिले नाही. परिणामी, अनेकांनी इतिहासात पहिल्यांदाच सुवर्ण मिळवून देत भारताची शान वाढवली. एकूणच काय तर यंदाच्या या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी ‘कॉमन’ न राहता ‘पदक संपन्न’ म्हणजेच ‘वेल्थ’ राहिल्याचे दिसून आले.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या क्रीडा महाकुंभात भारताचे दोनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले. भारताने चौथ्या क्रमांकावर विराजमान होत ६१ पदकांची कमाई केली. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक म्हणजेच १७८, तर त्यापाठोपाठ यजमान इंग्लंडने १७६ पदके मिळवली. तिसर्‍या क्रमांकावर कॅनडाने ९२ पदके पटकावली. या स्पर्धेत भारताची कामगिरी तशी पाहिली तर ‘कॉमन’ म्हणता येणार नाही, कारण जवळपास बहुतांश खेळाडूंनी लक्ष्यवेधी कामगिरी केली. मुख्य म्हणजे २००२ पासून भारताने ‘टॉप फाईव्ह’मध्ये येण्याची परंपरा यंदाही कायम राखली. प्रामुख्याने कुस्ती आणि वेटलिफ्टिंग, टेबल टेनिसमधील योगदान महत्वाचे ठरले. ज्यामुळे भविष्यात निश्चितच भारतीय खेळाडूंची संख्या आणि त्यांच्या कामगिरीत अधिक ‘पदकसंपन्न’ सुधारणा झालेली दिसून येईल, यात शंका नाही!

जगभरातल्या खेळाडूंचा महाकुंभ असलेल्या या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धेत भारताने अपेक्षित कामगिरी करण्यात काहीसे यश मिळवलेले दिसून आले. काही खेळाडूंना दुखापतीमुळे, तर काहींना डोपिंगमुळे या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने भारताची चिंता वाढली होती. मात्र, तरीदेखील अन्य खेळाडूंनी ही कमतरता भरून काढत पदकांची कमाई करण्याचे ध्येय डोळ्या पुढून हटू दिले नाही. परिणामी, अनेकांनी इतिहासात पहिल्यांदाच सुवर्ण मिळवून देत भारताची शान वाढवली. भारताचा विचार केला, तर यंदाच्या मोसमात वैशिष्ट ठरले ते हेच की अनेक खेळाडूंनी ज्या खेळांविषयी कुणाला फारशी माहितीही नाही, अशा खेळांमध्ये देदीप्यमान कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावून दाखविले. अगदी लॉन बॉलसारख्या खेळातही आपल्या महिलांनी जगभराचे लक्ष वेधत ‘सुवर्ण’ कामगिरी केली. त्यांच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट महिला संघानेही पहिल्यावहिल्या समावेशात ‘रूपेरी’ कामगिरी करत भारताची मान उंचावली. मुख्य म्हणजे, या सर्व कामगिरीत भारताने सन्मानजनक स्थानी झेप घेतल्याने गेल्या २००२ पासून सुरू झालेल्या परंपरेची जोपासणूक झाली.

१९५४ पासून राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाली. यात भारताने आजवर सहभागी होत आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा केल्याचे दिसून येते. सुरुवातीला फारसा सहभाग आणि फारशी पदकविजेती कामगिरी बघायला मिळाली नसली, तरी त्यानंतर मात्र कामगिरीतील सातत्यामुळे भारत पदकतालिकेत चांगल्या स्थानी असल्याचे दिसून आले. १९५४ पासूनचा विचार केला तर भारताने या साली भाग घेतला नाही. मात्र, त्यानंतर १९५८ मध्ये भारताने दोन सुवर्ण अन् एक रौप्य पदक पटकावत आठवे स्थान पटकावले होते. यानंतर १९६२ मध्ये ३ सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक अशा एकूण १० पदकांसह पुन्हा आठवे स्थान पटकावले होते. १९६६ आणि १९८६ मध्ये भारताने भाग घेतला नव्हता. १९७० मध्ये भारताने ५ सुवर्णपदकांसह तीन रौप्य आणि चार कांस्य पदकं अशी १२ पदकांसह सहाव्या स्थानी झेप घेतली होती.

या स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली होती. यानंतर १९७४ मध्ये चार सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्यपदकासह १५ पदके पटकावत भारताने पुन्हा एकदा सहावे स्थान पटकावले होते. १९७८ मध्ये पुन्हा भारताने सुवर्ण, रौप्य अन् कांस्यमध्ये प्रत्येकी ५ पदकांप्रमाणे १५ पदके पटकावून सहावे स्थान कायम राखले होते. १९८२ मध्ये भारताने आपल्या कामगिरीत सुधारणा करत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवत १६ पदकांसह सहावे स्थान राखले. यानंतरच्या राष्ट्रकुलमध्ये भारताने सहभाग घेतला नाही, मात्र त्यानंतरच्या म्हणजेच १९९० च्या राष्ट्रकुलमध्ये भारताने जोरदार कमबॅक करत १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य पदक अशी एकूण ३२ पदके पटकावत ‘टॉप फाईव्ह’मध्ये उडी घेतली होती.

१९९४ मध्ये ६ सुवर्ण, ११ रौप्य अन् ७ कांस्यपदकासह भारताने रुपेरी कामगिरी करत २४ पदकांसह सहावे स्थान पटकावले होते. १९९८ मध्ये भारताच्या पदरी काहीशी निराशा पडली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ सुवर्ण, १० रौप्य, तर ८ कांस्यपदकांसह एकूण २५ पदके पटकावली. यावर्षी भारताला ७ व्या स्थानी समाधान मानावे लागले. यानंतर भारताने टॉप गिअर टाकत आजवर चांगल्या कामगिरीत सातत्य राखून टॉप फाईव्हमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. २००२ मध्ये भारताने ३० सुवर्ण, २२ रौप्य आणि १७ कांस्य पदके अशी एकूण ६९ पदकांची कमाई करत चौथ्या स्थानी झेप घेतली. यानंतरच्या स्पर्धेत २००६ मध्ये भारताला २२ सुवर्ण, १७ रौप्य आणि ११ कांस्य पदक अशी एकूण ५० पदके मिळवता आली. यावर्षीही भारत चौथ्या स्थानी विराजमान राहिला. २०१० मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल १०१ पदके मिळवली. यात ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदके पटकावत भारताने थेट दुसर्‍या स्थानी झेप घेतली.

भारताची ही आजवरची सर्वाधिक उत्तम कामगिरी म्हणता येईल. २०१४ मध्ये भारताला १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदके पटकावता आली. यावर्षी ६४ पदकांसह भारत पाचव्या स्थानी होता. २०१८ मध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदक अशा एकूण ६६ पदकांसह भारताने तिसरे स्थान पटकावत जगभराच्या नजरा खिळवल्या होत्या. यानंतर या कामगिरीत सातत्य राखत भारतीय खेळाडूंनी २०२२ मध्येदेखील ६१ पदकांची कमाई करत चौथ्या स्थानी विराजमान होत तिरंग्याची शान राखली. यावर्षी भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांची कमाई केली. यंदाच्या मोसमात भारतीय खेळाडूंचा सहभागही उत्साहवर्धक होता. अनेकांनी अपेक्षित कामगिरी करत पदके पटकावली, तर काहींनी अनपेक्षित कामगिरी करत जगभराचे लक्ष वेधले.

भारतातील विविध राज्यांचा विचार केला, तर सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग हा हरियाणा राज्यातून होता. ३९ खेळाडू हरियाणाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यापाठोपाठ पंचाबमधून २६ खेळाडू, दिल्ली आणि महाराष्ट्रातून १४ खेळाडू, तर उत्तर प्रदेश १२ आणि कर्नाटकातून ११ खेळाडू, गुजरात ५, राजस्थान ४, मध्य प्रदेशच्या ३ खेळाडूंनी यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. या खेळाडूंच्या सहभागामुळे आणखी एक मुद्दा प्रकर्षाणे चर्चिला गेला, तो म्हणजे या खेळाडूंसाठी त्या-त्या राज्यात केला गेलेला खर्च. अर्थात भारताच्या कामगिरीविषयी लिहिताना खर्चाचा विषय तसा योग्य नाही. परंतु, खेळाडूंच्या यशामागे त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्यांना मिळणार्‍या आवश्यक सुविधा या गोष्टी चर्चिल्या जाणे क्रमप्राप्त वाटते. म्हणून या वादग्रस्त मुद्याविषयीही थोडक्यात नमूद करावेसे वाटते.

भारतातून गुजरात आणि उत्तर प्रदेश मिळून आपण पाहिले की ५ आणि १२ अशा एकूण १७ खेळाडूंनी भाग घेतला. मात्र, या दोन राज्यात या खेळाडूंवर ६०८ कोटी आणि ५०३ कोटी रुपये अनुक्रमे खर्च केला गेला. त्याउलट सर्वाधिक खेळाडू असलेल्या हरियाणा राज्यावर ८९ कोटींचा एकूण खर्च केला गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रातून १४ खेळाडू असताना त्यांच्यावर १११ कोटी खर्च झाला, तर पंजाबमधून २६ खेळाडू असताना त्यांच्यावरही केवळ ९४ कोटींचा खर्च झाल्याचे आकडेवरीवरून समोर येते. अशा या आकड्यांच्या राजकारणात भारतीय खेळाडूंच्या पदकांचा काहीअंशी ‘खेळ’ झाला असेलच, यात शंका वाटत नाही. कारण खेळातले हे राजकारण कमी झाले तर भारत पुन्हा एकदा पदकतालिकेत टॉपवर दिसेल, हेही तितकेच खरे. असो, परंतु भारताने यंदाच्या या क्रीडा महाकुंभात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

भारताने तब्बल २२ सुवर्ण पटकावले. यात लॉन बॉलमधील सांघिक पदक पटकावणार्‍या लव्हली चौबे, पिंकी, नायामोनी सैकीया, रूपा राणी या महिला खेळाडूंसह वेटलिफ्टिंगमधील मिराबाई चानू, अचिंता शेवली, जेरेमी लालरिनुंगा यांनीही सुवर्ण कामगिरी केली. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवीकुमार दहिया, विनेश फोगट, नवीन मलिक यांनी दमदार कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये निखत झरीन, अमित पंघाल, नितू घंघास यांनी, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने सुवर्ण कामगिरी केली. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी-सरवीर के साईराज रंकीरेड्डी यांच्यासह टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमाल, श्रीजा अकुला-शरथ कमाल, हरमीत देसाई-शरथ कमाल-सानील शेट्टी-जी. सथियान, भाविना पटेल (पॅरा) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यासह भारताने अ‍ॅथलेटिक्समध्येही यंदा ऐतिहासिक कामगिरी करत लक्ष वेधले. यात ट्रिपल जम्प प्रकारात केरळच्या एल्धोस पॉल याने विक्रमी उडी घेतली.

याशिवाय अनेक भारतीय खेळाडूंनी रूपेरी कामगिरी करत १६ रौप्य पदके मिळवून देण्यात योगदान दिले. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशिला लिक्मबम, विकास ठाकूर, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका गोस्वामी, पुरुषांच्या लॉन बॉलमधील सुनील-नवनीत-चंदन-दिनेश यांचा संघ, भारतीय हॉकी संघ आणि महिलांच्या भारतीय क्रिकेट संघाने रूपेरी कामगिरी केली. त्यांच्यासह अब्दुल्ला अबुबेकर, सागर अहलावट यांनी रौप्य पदक पटकावले. कांस्य पदकाविषयी बोलायचं म्हटलं तर, गुरुराज पुजारी, विजय यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोसाल, गुरप्रीत सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मीन लंबोरिया, पूजा गेहलोट, पूजा सिहाग, मोहम्मद हासमुद्दीन, सोनलबेन पटेल, दीपक नेहरा, रोहित टोकस, संदीप कुमार, अनुराणी, सौरव-दीपिका, कितांबी श्रीकांथ, गायत्री-त्रिशा, साथीयान ग्यानशेखरन यांसह महिला हॉकी संघाने कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.

क्रीडा प्रकार निहाय भारताच्या पदकांचा विचार केला गेल्यास भारताने कुस्ती या क्रीडा प्रकारात सर्वाधिक म्हणजेच ६ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्यपदक पटकावले. त्यापाठोपाठ टेबल टेनिसमध्ये ४ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक, तर वेटलिफ्टिंगमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदक मिळाले. बॉक्सिंगमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्यपदक मिळाले. बॅडमिंटनमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदक मिळाले. अ‍ॅथलेटिक्समध्येही भारताने सन्मानजनक कामगिरी करताना १ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्पदकासह ८ पदके मिळवली. पहिल्यांदाच समावेश झालेल्या महिला क्रिकेटमध्येही भारताने रूपेरी कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूणच काय तर यंदाच्या या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी ‘कॉमन’ न राहता ‘पदक संपन्न’ म्हणजेच ‘वेल्थ’ राहिल्याचे दिसून आले. या कामगिरीत पुढील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये अधिकाधिक सुधारणा होऊन भारत २०१० प्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करेल, हीच अपेक्षा व्यक्त करूया.