घरसंपादकीयओपेडत्या राजकीय नाट्यात खरे कोण, पवार की फडणवीस?

त्या राजकीय नाट्यात खरे कोण, पवार की फडणवीस?

Subscribe

प्रत्येक गोष्टीच्या तीन बाजू असतात. एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य टायमिंग साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे केल्याने राष्ट्रवादी काँगेसला सध्या तरी तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागतोय. कारण त्या तीन दिवसांच्या सरकारच्या राजकीय नाट्यात खरे कोण, असा सवाल केला जाणे स्वाभाविक आहे. कारण दोघांपैकी एकजण खरं बोलतोय आणि दुसरा सोयीने किंवा सवयीनुसार खोटे बोलतोय हे मात्र नक्की. त्यामुळे खर्‍या खोट्याच्या लढाईत फडणवीस पवारांना भारी पडतील की पवार त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार फडणवीस यांना कात्रजचा घाट दाखवत केंद्रात पाठवतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेचा निर्णय झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा केलाय. पुन्हा एकदा म्हणण्याचे कारण ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांनी तीन ते चार वेळा अशा प्रकारची वक्तव्ये केली होती. प्रत्येक वेळी त्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोयीस्करपणे मौन बाळगले होते, तर काही वेळा नो कमेंट म्हणत वेळ मारून नेली होती. यावेळी मात्र शरद पवार यांनी फडणवीस यांच्याबद्दल दोन शब्द तीव्रतेने बोलल्याने फडणवीस यांचा राष्ट्रवादीसोबतचा सत्तास्थापनेचा बाण पवार यांच्या जिव्हारी लागला आहे हे मात्र नक्की.

एकीकडे कालपासून राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत असतानाच फडणवीस यांनी साडेतीन वर्षांपूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा सत्तास्थापनेचा अनुभव आणि शरद पवार यांचा बेभरवसा, विश्वासघात अधोरेखित केला आहे हे भाजपच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. भाजपसोबत २०१९ ला सत्ता स्थापन करताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या उपस्थितीत राजभवनात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आजही या पहाटेच्या शपथविधीवरून आणि सरकार स्थापनेवरून अजित पवार यांना कोंडीत पकडले जाते.

- Advertisement -

आम्ही निवडून आल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. तेव्हा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्हीही वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले. आम्ही काँग्रेससोबत जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळीही राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला होता. आम्ही सरकार बनवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. महामंडळ आणि सत्तास्थापन झाल्यानंतर कुणाला कोणती खाती द्यायची, पालकमंत्रीही आम्ही ठरवले होते. सर्व गोष्टी आम्ही फायनल केल्या होत्या, असे फडणवीस २०२१ सालीही नागपूरमधील एका कार्यक्रमात ऑफ कॅमेरा बोलले होते.

काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल जयंत पाटील म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा तीन वर्षांपूर्वी राजभवनात पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता. ही शरद पवारांची खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. शपथविधीची ही खेळी कुणीतरी जाणीवपूर्वक खेळली असे म्हणता येणार नाही, पण त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट मागे घेण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आणखी मजबूत झाली.

- Advertisement -

शरद पवारांशी चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून सकाळचा शपथविधी केला, या देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत, सुज्ञ माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असे मला कधीही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

जयंत पाटील यांच्या दाव्यावर शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी मौन सोडले. पवार म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला आता तीन वर्षे लोटलीत. त्यामुळे तो प्रश्न आता कशाला काढायचा, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारत त्यावर भाष्य टाळले होते, तर दुसरीकडे अजित पवार यांनाही पत्रकार वारंवार हा प्रश्न विचारतात तेव्हा ज्यावेळेस वेळ येईल तेव्हा मी बोलेन. आता बोलणार नाही, असे वक्तव्य केल्याने त्यावेळी नेमके काय झाले होते, पहाटेच्या शपथविधीमागचे गौडबंगाल आणि सरकार स्थापनेच्या मागे कोणाचा हात होता हे मात्र कुणालाही कळले नव्हते, मात्र फडणवीस यांनी साडेतीन वर्षांपूर्वीचा प्रसंग पुन्हा जिवंत केल्याने आता पवार यांची मोठी गोची केल्याचे आता तरी दिसतेय.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा पाठिंबा मिळवून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात सरकारही स्थापन केलं, पण हे सरकार अवघे ८० तास टिकले. राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत येण्यासाठी थेट राष्ट्रवादीकडूनच ऑफर आली होती, असा फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ऑन रेकॉर्ड खुलासा केला होता, मात्र त्याअगोदर शरद पवार यांनी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनीच त्यांना सरकार स्थापनेची ऑफर दिली होती, पण आपण ती विनम्रपणे नाकारली. त्यामुळे दोन्ही मुलाखतींमध्ये एकाच घटनेबाबत दोन्ही नेत्यांची टोकाची विसंगत विधानं पाहिल्यास यात कोण खरं बोलतंय हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही, पण पवार आणि फडणवीस यांच्यापैकी एक जण खोटं बोलतंय हे मात्र नक्की.

दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेसाठी ज्या अंतिम चर्चा आवश्यक असतात, त्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आणि भाजप कॉर्नर झाली. भाजप एकदम शांत बसली होती. भाजपने मनातून येणारे नवे सरकार आपलं नसेल असं ठरवून टाकलं होतं. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या जोरबैठका मुंबई, दिल्लीत सुरू होत्या, पण त्या तीन-चार दिवसांनंतर अजित पवारांकडूनच भाजपला फिलर आले. भाजपच्या नेत्यांशी अजितदादांची चर्चा झाली. दादांनी फडणवीस यांना मला हे मान्य नाही. जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं त्यानुसार स्थिर सरकार भाजप आणि राष्ट्रवादीच देऊ शकतं, असं माझं आजही स्पष्ट मत आहे, पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील, तरी मी तुमच्यासोबत सरकार बनवायला तयार असल्याचे आश्वासन दादांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनाही दिल्याची माहिती आता भाजपप्रमाणे राष्ट्रवादीच्या गोटातूनही पुढे येत आहे. कारण कमिटमेंट म्हणजे अजित पवार हे आता पुन्हा एकदा अधोरेखित केलं जात आहे.

फडणवीस यांनी नागपूरमध्ये काही निवडक पत्रकारांशी बोलताना अमित शहांनाच तीन दिवसीय सरकारचे शिल्पकार म्हटले होते. अजित पवार यांच्याबरोबरच्या त्या ८० तासांच्या सरकारची स्थापना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी सल्लामसलत करूनच झाली. अमित शहांचा या निर्णयाला पाठिंबा होता, पण पवार यांनी आयत्या वेळी निर्णय बदलला आणि त्यानंतरच तीन पक्षांचे सरकार राज्यात आले. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात आला नसता तर आमचे सरकार टिकले असते. आमच्याकडे आकडे होते. यावेळी मी राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले ते बरोबर होते, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला होता.

 दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवावा हासुद्धा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहिला तर त्यांनी २०१४ ला विनाअट भाजपला पाठिंबा देऊ केला होता. तत्पूर्वी त्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पाठिंबाही विनाकारण काढून घेतला होता. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय संशयास्पद राहिले आहेत, पण असं असलं तरी राजकारणात काहीही शक्य आहे. सध्या तरी प्रत्येक जण आपली बाजू बरोबर आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण यातलं सत्य अजूनही गुलदस्त्यातच आहे, असंच म्हणावं लागेल. कारण भाजपसोबत गेल्यास आपल्याला परवडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. तसेच बाबा (शरद पवार) यांचे भाजपसोबत न जाण्यासाठी मन वळवण्यासही त्याच कारणीभूत होत्या. मग आता फडणवीस यांनी शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच एवढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले असताना त्या गप्प का, हा खरा प्रश्न आहे.

शरद पवार यांना आता राज्यातील साडेतेरा कोटी जनतेला त्या तीन दिवसांच्या सरकार स्थापनेत त्यांचा हात होता का, यावरील संशयाचे ढग दूर करावे लागतील. भाजपच्या राज्यातील क्रमांक एकच्या नेत्याने म्हणजेच फडणवीस यांनीच पवार यांच्या विश्वासार्हतेला तडा देण्याचे काम केल्याने त्याला उत्तर न दिल्यास फडणवीस बोलताहेत हेच खरं वाटू लागेल. त्यामुळे पवार यांनी आपल्या ६५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखवलाय. त्यामुळेच पवार या आडनावाची भीती त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना वाटते, तशीच विरोधी पक्षातही पवार यांच्या नावाची दहशत आहे. त्यामुळे शरद पवार आता गप्प राहून योग्य संधीची वाट पाहतात की फडणवीस यांचा गेम करण्यासाठी भाजपमधीलच एका गटाशी हातमिळवणी करीत फडणवीस यांना केंद्रात पाठवण्यासाठी खलबतं करतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण शरद पवार मानसन्मान विसरतील, पण बंद खोलीत झालेल्या चर्चा सार्वजनिक करणार्‍याला कधीही माफ करीत नाहीत. त्यामुळे आपण सध्या वेट अ‍ॅण्ड वॉच करणे हेच योग्य आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -