घरसंपादकीयओपेडरात्रीस प्रवास चाले, जरी कितीही जीवानिशी गेले!

रात्रीस प्रवास चाले, जरी कितीही जीवानिशी गेले!

Subscribe

रात्रीचा शांत वातावरणातील प्रवास बर्‍याचजणांना हवाहवासा असतो, पण तो अनुभवी चालक असणार्‍या वाहनांतूनच करणे कधीही हिताचे आहे. काही वेळेला नेहमीचा चालक वेळेत उपलब्ध होत नाही म्हणून कुणाला तरी बोलावून त्याच्या हाती वाहन सोपवले जाते. छोट्या खासगी वाहनांच्या बाबतीत असा प्रकार कित्येकदा होत असतो. वाहन चालविता आले म्हणजे रात्रीचा पल्ला तो चालक सुखरूपपणे पार करेलच असे नाही. एसटीच्या जुन्या बस वगळता इतर अवजड वाहनांचे हेडलाईटस् खूपच प्रखर असतात. आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनांना अतिरिक्त प्रखर दिवे लावण्यात येतात. तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

४ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनजंय मुंडे यांच्या वाहनाला बीड जिल्ह्यात परळी येथे अपघात होऊन त्यात त्यांना दुखापत झाली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रसारमाध्यमांशी बोलताना रात्रीचा प्रवास टाळा असे किती वेळा सांगायचे, अशा आशयाचे वक्तव्य समोर आले आहे. रात्रीचा प्रवास गरज असेल तरच करावा अन्यथा हा प्रवास सकाळी ६ ते रात्री १०-११ वाजेपर्यंत करणेच हितकर असते. रात्रीचे वातावरण छान असते, ट्रॅफिक जॅमची कटकट नसते वगैरेसारखी कारणे सांगून रात्रीचा प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे रात्रीचा प्रवास चांगला असे मानले तरी बरेचसे अपघात मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान झाल्याचे दिसते.

गेल्या २४ डिसेंबरच्या पहाटे दहिवडीकडे जाताना पुणे-पंढरपूर मार्गावर मलठण पुलावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे वाहन कोसळून अपघात झाला. त्यात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रात्रीचा प्रवास शक्यतो टाळायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर गेल्या १४ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांचे निधन झाले. या अपघातानंतर तो घात की अपघात, यावर उलट सुलट चर्चा झाली असली तरी अपघात पहाटेच्या सुमारास झाला हे लक्षात घ्यायला हवे. या अपघातानंतर राजकीय नेत्यांनी रात्री उशिराचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा असे मत अनेकांकडून व्यक्त झाले.

- Advertisement -

बर्‍याच वेळा असे होते की त्यांना रात्रीच्या प्रवासाशिवाय गत्यंतर नसते. दूरच्या जिल्ह्यातून सकाळी होणार्‍या बैठकीसाठी, गाठीभेटींसाठी मुंबईत येण्याकरिता रात्रीचा प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. मुंबईत जाऊन थोडीशी विश्रांती घेऊन ताजेतवाने झाले की पुढील कामाला सुरुवात करायची हा त्यामागचा हेतू असतो. अधिवेशन काळात अनेकदा आमदार रात्रीच्या वेळी मतदारसंघात जाण्यासाठी प्रवास करतात. यामागेही लगेच किंवा लवकर मुंबईत परतण्याचा हेतू असतो, परंतु असे करताना आपल्या चालकाला पुरेशी विश्रांती मिळाली किंवा नाही, याची काळजी घेतली जात नाही. ड्रायव्हिंगचा अतिरिक्त ताण आला की चालकाला पेंग येण्याची शक्यता असते. त्यातून अपघात घडतात. नेत्यांना याची कल्पना नसते अशातला भाग नाही, पण कामामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. मुंडे असतील, गोरे असतील, यांच्या वाहनांच्या अपघातामागे हेच कारण आहे. वाहन महागड्या श्रेणीतील असल्याने त्याचा वेग भन्नाटच असला पाहिजे अशी बर्‍याच नेत्यांची मानसिकता असते. काहीवेळेला वेग वाढविण्यासाठी चालकावर दबाव असतो ही बाबही नाकारता येणार नाही. यामागे वेळेचे गणित जुळवायचे असते म्हणे!

ही झाली नेत्यांच्या रात्रीच्या प्रवासाची कथा! असाच प्रवास सर्वसामान्यांनाही भलताच प्रिय असतो. ३०० किंवा ४०० किंवा त्यापेक्षा अधिक किलोमीटर अंतराचा प्रवास असला की बरेचजण सायंकाळी उशिरा प्रवास सुरू करतात. यामागचा उद्देश इतकाच की पहाटे-पहाटे नियोजित ठिकाणी पोहचणे! गणेशोत्सव किंवा सुट्यांच्या दिवशी रात्री प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. यातून अपघाताच्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत. यामागचे कारण असते ते चालकाला डुलकी लागते हेच! सणासुदीच्या दिवसात मालक पैशांच्या लोभापायी चालकाला दुप्पट पैशांचे आमिष दाखवून पुरेशी विश्रांती मिळालेली नसताना रात्रीची गाडी चालवायला भाग पाडतात. हा प्रकार गणेशोत्सव काळात प्रकर्षाने दिसून येतो. काही वेळेला असेही होते की चालकाला रात्रीच्या वेळी वाहन चालविण्याचा पुरेसा अनुभव नसतो. हा चालक वाहन चालवायचे म्हणून चालवत असतो. याबाबतीत तज्ज्ञांनीही अनेकवेळा लक्ष वेधून रात्री वाहन चालविणारा चालक अनुभवी असण्याकडे कटाक्ष असावयास पाहिजे असा सल्ला दिला आहे, पण त्याकडे लक्ष देण्याची बहुतेकांना गरज वाटत नसल्याने वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशांवर धोक्याची टांगती तलवार लटकत असते.

- Advertisement -

रात्रीच्या वेळी प्रामुख्याने एसटी बस, खासगी प्रवासी बस, मालवाहतूक करणारी ट्रकसारखी वाहने धावत असतात. यावरील चालक अनुभवी असतात. एसटी प्रशासन तर रात्रीच्या वेळी अनुभवी चालकाच्याच हाती बस सोपवित असते. ट्रकचालक काहीवेळा स्वतः झोप काढून क्लीनरच्या हाती स्टिअरिंग सोपवितात. हा प्रकार धोकादायक असतो. अर्थात अशाप्रकारचे प्रमाण तसे नगण्य आहे. थोडक्यात, रात्रीच्या वेळी मोठी किंवा अवजड वाहने अनुभवी चालकांच्या हाती असतात. खासगी किंवा छोट्या वाहनांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. कोणतीही काळजी किंवा खबरदारी न घेता या वाहनांचा रात्रीचा प्रवास होत असतो असे लक्षात आलेले आहे. मध्यरात्री ते पहाटेची वेळ झोप अनावर करणारी असते. ही वेळ रेटण्याचा प्रयत्न केला तरी पहाटे हमखास डुलकी लागते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग असो किंवा अन्य प्रमुख महामार्ग असोत, पहाटेच्या वेळी चालकाला झोप आवरणे कठीण झाल्यामुळे अपघात घडल्याचे वारंवार दिसून आले आहे. वाहन थांबवून चेहर्‍यावर पाणी किंवा सोड्याचा हबकारा मारणे, शक्य झाले तर चहा पिणे असे उपाय करून चालक झोपेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु झोपेला कुणीच आव्हान देऊ शकत नाही, असे गमतीने म्हटले जाते तेच खरे आहे. न आवरता येणारी झोप कुठेतरी घात करतेच आणि होत्याचे नव्हते होऊन बसते.

पण म्हणून काय रात्रीचा प्रवास करायचाच नाही का? तर तसेही नाही. रात्रीचा शांत वातावरणातील प्रवास बर्‍याचजणांना हवाहवासा असतो, पण तो अनुभवी चालक असणार्‍या वाहनांतूनच करणे कधीही हिताचे आहे. काही वेळेला नेहमीचा चालक वेळेत उपलब्ध होत नाही म्हणून कुणाला तरी बोलावून त्याच्या हाती वाहन सोपवले जाते. छोट्या खासगी वाहनांच्या बाबतीत असा प्रकार कित्येकदा होत असतो. वाहन चालविता आले म्हणजे रात्रीचा पल्ला तो चालक सुखरूपपणे पार करेलच असे नाही. एसटीच्या जुन्या बस वगळता इतर अवजड वाहनांचे हेडलाईट्स खूपच प्रखर असतात. आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनांना अतिरिक्त प्रखर दिवे लावण्यात येतात. अशा दिव्यांसमोर नवशिक्या किंवा अननुभवी चालक गोंधळून जातो आणि अपघात होतात. असे अपघात घडल्याचे चालक त्यांच्या जबानीत सांगत असतात. प्रवासी वाहतूक करणार्‍या आराम बसना, तसेच अवजड वाहनांना समोर अनेक दिवे लावलेले आढळून येतात. यावर आरटीओ कोणतीही कारवाई करीत नाहीत. मुळात दोन हेडलाईट्स पुरेशा असताना चार किंवा त्याच्या पटीत प्रखर दिवे लावण्याचे कारण नाही. फार तर धुक्यासाठी असणारे पिवळे लाईट क्षम्य मानता येतील, पण अतिरिक्त दिवे घातक ठरतात.

रात्रीचा प्रवास करताना काही चालक दारू ढोसतात. महामार्ग असू देत किंवा प्रमुख राज्य मार्ग असू देत, तेथे भूछत्राप्रमाणे हॉटेल, धाबे आहेत. यातील अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दारू पुरविण्यात येते. काही वेळा प्रवासी निघतानाच दारू सोबत घेतात आणि मध्ये कुठेतरी धाब्याचा आश्रय घेऊन रात्र साजरी करतात. यात बहुतांश चालकही समाविष्ट असतात. त्यानंतर ते वाहन चालविण्याचा ‘आनंद’ घेतात. आपण किती वेगाने जातोय याचे काही वेळेला चालकाला भान नसते. शिवाय वाहनातील प्रवासीही ढाराढूर झोपल्याने त्यांना चालकाच्या वेगाशी देणेघेणे नसते. अशाही अपघाताच्या असंख्य घटना आहेत की त्या तर्र चालकांमुळे झालेल्या आहेत. लॉकडाऊनपासून ब्रेथ अ‍ॅनालायझर वापरण्यास बंदी असल्याने चालकाने दारू ढोसलेय किंवा नाही हे कसे ओळखायचे, असा वांदा पोलिसांचा होऊन बसलाय! काही प्रमुख मार्गांवर सरकारी परवानगी मिळालेल्या बारचीही व्यवस्था आहे.

त्यामुळे तेथे अधिकृतरित्या दारू प्राशन करून मग वाहने चालवणारेही महाभाग आहेत. रात्रीच्या वेळी दारू पिऊन वाहन चालविल्याने होणार्‍या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नाही. होणारी कारवाई चाकोरीबद्ध असल्याने चालक आणि मालक निर्धास्त असतात. त्यातूनही काही गंभीर प्रकरण उद्भवलेच तर मदतीसाठी एखादा नेता धावून येतोच येतो. अशा वेळी पोलीस किंवा आरटीओची गोची होऊन जाते. ब्रेथ अनालायझर नसेल तर दुसरी पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ज्या ठिकाणी दारू पिण्याची सुविधा निर्माण केली गेली आहे त्यावर कठोर निर्बंध असलेच पाहिजेत. या अनधिकृत व्यवसायातून सरकारला फायदा होत नाही. त्यातून काही ठराविक यंत्रणांचा खिसा भरत असतो. अपघात घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्याऐवजी किंवा उपाययोजनांचे हवेतील तीर मारून वेळ निभावून नेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेण्यास हरकत नसावी!

रात्रीस प्रवास चाले, जरी कितीही जीवानिशी गेले!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -