घरसंपादकीयओपेडबुलढाण्यातील कथित अवतारी बाबा आणि श्रद्धा-अंधश्रद्धेतील फरक

बुलढाण्यातील कथित अवतारी बाबा आणि श्रद्धा-अंधश्रद्धेतील फरक

Subscribe

बुलढाण्यात गजानन महाराजांसारखा दिसणारा एक व्यक्ती आल्याने अंधश्रद्धाळूंची मोठी गर्दी झाली. हाच माणूस २०१५ मध्येही इचलकरंजीतील गजानन महाराज मंदिरात आला होता. त्यावेळी काही अंधश्रद्धाळूंनी त्याला घरी नेऊन त्यांची एक दोन दिवस सेवा केली, या व्यक्तीसमोर उत्तम नैवेद्य ठेवण्यात आले होते. तसेच या व्यक्तीचे छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती, मात्र काही जणांनी फोटो काढलेच, त्यावेळी इचलकरंजीत दाखल झालेला हा माणूस बुलढाण्यात नुकताच पाहण्यात आल्याचे फोटो काढणार्‍यांनी समाजमाध्यमांवर स्पष्ट केले होते. बुलढाण्यातील या व्यक्तीने गजानन महाराजांसारखा पेहराव केला होता, त्याच्यासमोर अंधश्रद्धाळू भक्तांची गर्दी झाली होती. भक्तांची श्रद्धा गजानन महाराजांवर आहे, मात्र त्यांचा पेहराव करणारी व्यक्ती गजानन महाराज नाहीत, ही साधी बाब अंधश्रद्धाळू भक्तांच्या ध्यानात आली नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक लक्षात घेण्यासाठी ही घटना पुरेशी आहे.

बुलढाण्यात दाखल झालेली व्यक्ती ही अहमदनगरमध्येही अशाच पद्धतीने ‘अवतरली’ होती. त्यावेळी काही जणांनी त्याचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला असता ही व्यक्ती येथून निघून गेली. खामगावमध्ये हे कथित गजानन महाराज प्रकटल्यानंतर आणि त्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चेला उधाण आले. शेगावमध्ये ही व्यक्ती लोकांचे भविष्य सांगत फिरत होती, मात्र शेगावमध्ये समाधी घेतलेले कथित गजानन महाराज पुन्हा कसे प्रकट झाले, असा प्रश्न लोकांना पडला नाही, तर लोकांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. ज्या व्यक्तीच्या घरी हे कथित महाराज थांबले होते, तेथे लोकांची गर्दी झाली. पूजा अर्चा, आरती होऊ लागली.

या भागात या व्यक्तीने तीन दिवस वास्तव्य केले. मी महाराजांचा अवतार असल्याचे या व्यक्तीने लोकांना सांगितले. शहरातील काही लोकांना या कथित महाराजांनी भविष्य सांगण्यास सुरुवात केली. ‘तुमचे चांगले होईल, पैसा अडका येईल’ असे सकारात्मक भविष्य सांगितल्यावर गर्दी वाढत गेली. लोक आशीर्वादासाठी गर्दी करू लागले, मात्र कथित महाराजांचे हे असे फुटकळ उद्योग पाहून काही सूज्ञ श्रद्धाळूंना संशय आणि संताप आला. त्यांनी खामगावमधून या व्यक्तीला निघून जायला सांगितले. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा तपास करण्याची गरज असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले. समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -

एक माणूस गावात येतो आणि आपल्याला दैवी अवतार म्हणवून घेतो, लोक त्यावर विश्वास ठेवतात, त्याला घरी नेले जाते. त्याच्यासमोर नैवेद्य ठेवला जातो, त्याची श्रद्धेने सेवा केली जाते, ही श्रद्धा नसून अंधश्रद्धाच आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, स्टेशन्सवर अनेकदा साईबाबांचा वेश परिधान केलेल्या व्यक्ती प्रवाशांकडून पैसे मागत असल्याचे चित्र दिसते, पैसे दिल्यावर आशीर्वाद दिला जातो. श्री शंकराचा वेश परिधान करूनही असा प्रकार होतो. परमेश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासाच्या चेहर्‍यावर असे व्यक्ती आपले मुखवटे चढवून परमेश्वराच्या नावाने आपलं चांगभलं करून घेतात. प्रश्न श्रद्धा आणि विश्वासाचा असल्यानं कोणी विरोधात जात नाही. जर एखाद्या सूज्ञ व्यक्तीने चिकित्सेचा प्रयत्न केला, तर त्याला धर्म, श्रद्धाद्रोही ठरवण्याचा धोका असतो.

आपल्याकडे काळी बाहुली, लिंबू मिरची, वास्तूदोष, शुभ किंवा अपशकुन, दैवी यंत्र, चांगली वाईट दिशा, ग्रहदशा, शुद्ध-अशुद्धता, असलं बरंच काही असतं. चुंबकात जसे ऋण आणि धन से दोन ध्रूव असतात, एक आकर्षणाचा आणि दुसरा प्रतिकर्षणाचा असतो, तसेच मानवी समुदायातही असेच दोन समाजध्रूव असतात. त्यात वास्तवापासून दूर पळणारा आणि पारलौकीक अशा कथित विषयांकडे आकर्षित होणारा एक समुदाय आणि अशा घटनांमागील कारणे शोधणारा तुलनेने कमी संख्येचा असा दुसरा समुदायही असतो. देवस्थानाकडे दर्शनासाठी जाताना वाहनाला अपघात होतो. त्यावेळी अशा अपघातातून वाचल्यास देवानेच वाचवल्यावर आपला विश्वास असतो, तर अपघातात मृत्यू झाल्यास बघा..देवाच्या मार्गावर मृत्यू आल्याचं कौतूक होऊन त्याला खर्‍या श्रद्धेचं नाव दिलेलं असतं.

- Advertisement -

विदर्भामध्ये एक नुकतेच जन्मलेले बाळ आजारी पडल्यावर त्याच्या पोटावर भोंदू बाबाने उपचार म्हणून चटके दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. पुढे या बाळाला आजार बळावल्यावर रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. भोंदू बाबाने चटके दिल्यावरही बाळ काही दिवस जिवंत होते, मात्र रुग्णालयात नेल्यावर दगावल्याने वैद्यकीय विज्ञानशास्त्रापेक्षा भोंदुगिरीची भलामण आपण वाद विवादात करू शकतो. आपल्याकडे देवस्थानात मनातील इछा ओळखणारे दगड असतात. या दगडाने विशिष्ट दिशेला झुकून कौल दिल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार किंवा नाही, हे स्पष्ट होते.

जर हा दगड स्थिर राहिल्यास इच्छा अनिश्चित असल्याचे समजले जाते. श्रद्धा-अंधश्रद्धा सोयीच्या असतात. सोयीनुसार त्याची व्याख्या केलेली असते. पाप्यांना देवरूप आपले दर्शन देत नाही. त्यामुळे पाप्यांपेक्षा दैववादाचा अनुभव घेतलेले आपल्याकडे भरपूर आढळतात. आपले न दिसणारे किंबहुना मुदलात नसलेले पुण्य दाखवण्याची अशी सोय श्रद्धेने करून दिलेली असते. इथे पापे धुणार्‍यांचीही संख्या मोठी असते. गंगेच्या प्रवाहात मृतदेह सोडल्याने थेट मोक्षप्राप्तीची अपेक्षाही इथे असते. त्यामुळे अशा मृतदेहांचेही राजकारण आपल्याकडे नवे नसते.

आपल्याकडे पैशांचा पाऊस हा एक महत्वाचा ऋतू असतो. त्याला हवामानबदलाची गरज नसते. रिझर्व्ह बँकेने बनवलेले सरकारच्या अनुमोदनावर टाकसाळीत पाडलेले छापलेले चलन हवेतून कसे पडू शकते, याचा विचार पैशांचा पाऊस पाडणारे करत नसतात. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पर्जन्य बीज म्हणून खर्‍या नोटा घेतल्या जातात या नोटा जाळल्याचे दाखवले जाते. त्यातून तयार होणार्‍या धुरातून पैशांचा पाऊस पाडला जातो. त्यासाठी मांडूळ सर्प, अठरा नखांचे कासव किंवा पालीची शेपटी असलं विचित्र साहित्य सामग्री मागवली जाते. ठाणे, रायगड किंवा महाराष्ट्रातील काही भागात मांडूळ सर्पाची कोट्यवधींमध्ये बेकायदा खरेदी विक्री केली जाते. ज्या ठिकाणावरून मांडूळ सर्प मार्गक्रमण करतो त्या ठिकाणी धनाचा हंडा आढळल्याचे मानले जाते. असे धन मिळवण्यासाठी कोट्यवधींना मांडूळ खरेदी केले जातात. त्यामुळे मांडूळ या जातीच्या निरपद्रवी सर्पांची संख्या कमी होत आहे.

देवाच्या मूर्तीला दूध पाजणे किंवा मानवी शरीरात चुंबकीय शक्ती तयार होऊन धातू वस्तू शरीराला चिकटणे यावर आपली श्रद्धा असते. कोरोना लसीमुळे शरीर चुंबक झाल्याचा दावा नाशिकमध्ये करण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांवर चुंबकाच्या गुणधर्माचे चर्वितचर्वण सुरू झाले. चुंबकाची ऋण- धन अशी दोन टोके आहेत. माणसांच्या समुदायातही कुठल्याही अतार्किक, अविश्वसनीय गोष्टींकडे आकर्षित होऊन ताबडतोब हे सगळं घडवणारी एक ईश्वरी शक्ती असल्याचे मानणारा घाई करणारा एक गट असतो, तर दुसरा त्यामागील विज्ञान, अफवा, भ्रम, तथ्य शोधणारा चिकित्सकांचाही गट असतो. पारलौकिक शक्ती अनुभवाला आल्यास त्याबाबत प्रश्न विचारणं दैववादी आणि धर्मसंस्कृतीच्या विरोधात मानलं जातं. कौल पाहणारे, शुभ, अपशकून तसेच संकेत सूचन करणारेही घटक समाजात असतात.

अशांनी देवाधर्माच्या नावाखाली त्यांची दुकाने सुरू ठेवलेली असतात. मुंबईतील काही देवस्थानांमध्ये भूत, पिशाच्च, काळी जादू उतरवली जाते. आपल्याकडे बाबा-बुवांचे प्रस्थ मोठे असते. माळकरी व्यक्तीबाबत समाजात आदर सन्मान असतो, मात्र असाच कथित हभप वृद्ध माळकरी आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करत असल्याने माध्यमांवर संताप चीड व्यक्त होते. माळकरी माणूस असे करूच शकत नाही, असा समाजमाध्यमांवरील चर्चेचा सूर असतो, महिलेला मारहाणीपेक्षा माळेची इभ्रत जास्त महत्वाची मानली जात असल्याने महिलेच्या मारहाणीचा मुद्दा दुय्यम असतो. निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावरचे वाटोळे व्हावे म्हणून काळी बाहुलीतून जादूटोना केल्याचे प्रकार घडतात त्यानंतर ही काळी जादू उतरवण्यासाठी पुन्हा नव्याने सकारात्मक शक्तींना पूजेतून आवाहन केले जाते.

हे सर्व असेच असल्याने आणि त्याविषयी आपल्याकडील गूढतेला आपण श्रद्धेचे नाव दिल्याने मानवी शरीराला धातूच्या वस्तू चिकटण्याचे अप्रूप आपल्याला असते. त्यामुळे तातडीने पारलौकिक निष्कर्ष काढण्यात आपण वाकबगार असतो, अशाच निष्कर्षातून संपूर्ण राज्यात तीन दशकांपूर्वी देवाच्या मूर्तीने दूध प्यायल्याच्या घटना घडलेल्या असतात. कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती आल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होते. त्यात चिकित्सा आणि अलौकिकता असे दोन्ही गट सक्रिय होतात. कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आल्याचा असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकाकडून केला जातो. हा दावा खरा आहे का, त्याबाबत डॉक्टर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणेही मांडले जाते.

कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा नाशिकमधील एका व्यक्तीने केल्यानंतर कोरोना लसीबाबत संपूर्ण जगात आपण अनाकलनीय शोध लावल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ही अफवा इतकी वाढली की लस घेतल्यामुळे हे झालेलं नसावे, असे सरकारी अधिकार्‍यांना जाहीर करावे लागले. याबाबत थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांना विचारणा झाल्यावर त्यांनी त्वचेवर ओलसरपणा असल्यावर निर्वात पोकळी आणि वातावरणाचा दाब यामुळे नाणी शरीराला चिकटू शकतात, असे स्पष्ट केले. लोकांचे भविष्य सांगणे, पैशांचा पाऊस पाडणे, अपत्यप्राप्तीचे आश्वासन यातून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार याआधी अनेकदा झालेला आहे. बुलढाण्यातील कथित महाराजांच्या निमित्ताने लोकांना श्रद्धा-अंधश्रद्धेतील फरक समजून घेण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -