घरसंपादकीयओपेडया तिघा नेत्यांना डावलले नसते तर...

या तिघा नेत्यांना डावलले नसते तर…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्याकडे त्यांच्या मूळ पक्षातील प्रमुख नेत्यांनी पक्षाची सूत्रे दिली असती, तर त्यांच्या पक्षांची जी आज स्थिती झाली आहे तशी झाली नसती असे वाटते. कारण या तिघांकडे जबरदस्त नेतृत्व गुण आहेत. संघटनेवर प्रभाव पाडण्याची क्षमता आहे. निवडणुकीच्या राजकारणात त्याचा नक्कीच फायदा झाला असता, पण त्यांना काही कारणांमुळे मूळ पक्षातून डावलले गेले, त्यांची कोंडी झाली. त्यामुळे मूळ पक्षाची हानी झाल्याचे गेल्या काही वर्षांच्या राजकीय परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर दिसते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी या तिघांना त्यांच्या मूळ पक्षातून डावलले नसते तर आज या तिन्ही पक्षांची वेगळी परिस्थिती दिसली असती. या तिन्ही पक्षांचा प्रभाव आजच्यापेक्षा अनेक पटींनी वाढला असता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आपल्याला डावलले जात आहे, पक्षात आपली घुसमट होत आहे असे वाटल्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले.

शिवसेनेतून त्यापूर्वी काही नेते बाहेर पडले होते, पण ज्या नेत्याला बाळासाहेब ठाकरे त्यांचा वारसदार मानले जात होते, बाळासाहेबांच्या नंतर राज ठाकरे असेच शिवसैनिकांना वाटत होते, तोच ठाकरे घराण्यातला नेता शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे पक्षामध्ये प्रथम उभी फूट पडली. त्यामुळे शिवसेनेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने प्रतिशिवसेना उभी राहिली. त्याचा फटका मुख्य शिवसेनेला बसला. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे सगळे शिवसैनिक आहेत. निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार उभे राहू लागले.

- Advertisement -

त्यामुळे शिवसैनिकांची मते या दोन पक्षांमध्ये विभागली गेली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. मनसे उमेदवारांनी शिवसेनेची मते खाल्ल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडू लागले. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे उमेदवार पडत असले तरी त्याच वेळी मनसेचेही उमेदवार निवडून येत नव्हते. या दुहीमुळे दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. जर राज ठाकरे शिवसेेनेत असते आणि पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती असती तर आज शिवसेना अतिशय मजबूत स्थितीत असली असती असे गेल्या काही वर्षांतील राजकीय परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर दिसून येते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लहानपणापासून राहिल्यामुळे राज ठाकरे यांना राजकीय बाळकडू मिळालेले होते. त्यामुळे त्यांची संघटनेवर चांगली पकड होती, तशीच नेता म्हणून जी जरब असायला हवी ती होती. त्याचसोबत शिवसैनिकांना बाळासाहेबांप्रमाणे दिसणारा आणि असणारा उत्तराधिकारी हवा होता. त्या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडे होत्या. त्यामुळे बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख होणार असे शिवसैनिकांना वाटत होते. त्याचसोबत बाळासाहेबांनंतर आपण असे राज ठाकरे यांनाही मनातून वाटत होते आणि तसा आत्मविश्वासही त्यांना होता, पण पुढे परिस्थिती बदलली. त्याला ठाकरे घराण्यातील अंतर्गत कारणे होती.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी आपला पुत्र उद्धव ठाकरे यांना बनवले. त्यानंतर राज ठाकरे यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. उद्धव ठाकरे यांना पुढे आणले जाणे आणि त्यामुळे राज ठाकरे यांची संघटनेतील जागा आक्रसत जाणे या गोष्टी होत गेल्या. त्यामुळे राज ठाकरे यांची घुसमट होत गेली. त्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे होते. त्यामुळे राज ठाकरे यांचे काही चालण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळ्या पक्षाची स्थापना केली.

पुढे त्याचा परिणाम असा झाला की शिवसेनेची ताकद कमी होत गेली, तर त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांचे आगमन होऊन त्यांनी २०१४ साली केंद्रात भाजपची बहुमताची सत्ता आणल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे पारडे जड झाले होते. तसेच त्याअगोदर बाळासाहेबांचे देहावसान झाले होते. त्याचा फायदा भाजपला मिळाला. त्यामुळे लोकसभेत मोदींच्या झंझावातापुढे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मातब्बर पक्षांची धूळधाण उडाली होती. त्यामुळे आता आपण शिवसेनेसमोर पडते घ्यायचे नाही, यावेळी कुठल्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी तयारी भाजपवाल्यांनी केली.

मोदींच्या प्रभावाचा फायदा शिवसेनेला घेऊ द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले. पुढे केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रात भाजपला फायदा मिळत गेला. पुढे तर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यानंतर पक्षातील नाराजांना आणि महत्त्वाकांक्षी लोकांना भाजपने हेरले. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असे लोक भाजपच्या हाती लागले. त्यांनी त्यांना बाहेर पडण्याचा सुरक्षित गुवाहाटी मार्ग दाखवला. पुढे भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भरपूर ताकद दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांना पुढे आणले, पण आज उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नाव आणि चिन्हही नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांची राजकीय कारकीर्द घडली, पण आपणाकडे बराच राजकीय अनुभव आहे, आपण पक्ष संघटना चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो अशी स्थिती असताना आपले काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या हाती संघटनेची सूत्रे देत नाहीत. आपल्याला डावलले जात आहे. आपल्याला संघटनेतून ‘उप’पद दिले जात आहे, पण ‘मुख्य’पदापासून दूर ठेवले जात आहे अशी भावना अजित पवार यांच्या मनात बळावू लागली.

त्यात पुन्हा शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना कुठलाही आसभास नसताना राजकारणात सक्रिय केले. तो अजित पवारांसाठी धक्का होता. कारण त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन ध्रुव तयार झाले. शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण, असे विचारले जाऊ लागले. त्यावेळी ते लोक ठरवतील, असे पवार कुटुंबीयांकडून उत्तर दिले जाऊ लागले, पण त्यामुळे मूळ समस्या मिटत नव्हती. अजितदादांची नाराजी आणि घुसमट वाढत चालली होती. त्यांनी काही वेळा ती दाखवून दिली. शरद पवार यांनी अजितदादांचे एक बंड मोडून काढले, पण दुसरे बंड मोडणे त्यांना शक्य झाले नाही.

अजितदादांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगितला. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. जी अवस्था शिवसेनेची झाली तीच राष्ट्रवादीची होत आहे. जर शरद पवारांनी वेळीच अजित पवार यांना राष्ट्रवादीत मुख्य स्थान दिले असते आणि आपण राज्यात मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली नसती. आता अजितदादा आणि सुप्रियाताई या दोन बाजूंमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात पक्ष अधिकच कमकुवत झाला आहे. याचा फायदा भाजपला होणार आहे.

काँग्रेसकडे राष्ट्रीय पातळीवर प्रभावशाली नेतृत्व नाही. त्यामुळे देशभरात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे. पक्ष संघटना विस्कळीत झाली आहे. गटबाजी फोफावली आहे. ४० वर्षे ज्या पक्षाने देशावर राज्य केले, त्या पक्षाला आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसण्यासाठी जितक्या जागा लागतात तितक्याही जिंकता येत नाहीत. राहुल गांधी हे काँग्रेसचे मुख्य नेते असले तरी त्यांचा संघटनेवर प्रभाव पडत नाही. प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करा, पुढील नेतृत्व म्हणून त्यांना तयार करा, असे त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांनी पहिल्यांदाच सांगितले होते, पण त्यांचे सोनिया गांधी यांनी ऐकले नाही.

प्रियांका लाओ काँग्रेस बचाओ, असा काही नेत्यांकडून सल्ला देण्यात आला. त्यांना पुढील काळात गप्प बसवण्यात आले. राहुल गांधींऐवजी जर प्रियांका गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्रे दिली असती, तर काँग्रेसची आज जी अवस्था झाली आहे तशी नक्कीच झाली नसती. कारण राष्ट्रीय पातळीवर सर्व संघटनेवर प्रभाव टाकू शकणारे व्यक्तिमत्त्व प्रियांका गांधी यांच्याकडे आहे. सोनिया गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे का दिली नाहीत यामागेही घरगुती कारणे असल्याचे मानले जाते, पण त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेस दुभंगला नसला तरी प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे पक्ष खिळखिळा झाला आहे. कार्यकर्त्यांमधील जोश ओसरला आहे. त्यामुळे मोदींच्या लाटेसमोर पक्षाचा टिकाव लागणे अवघड झाले आहे. जर सोनिया गांधी यांनी वेळीच प्रियांका गांधी यांच्या हाती सूत्रे दिली असती, तर आज काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या स्थितीत नक्कीच असला असता. राज ठाकरे, अजित पवार, प्रियांका गांधी यांना त्यांच्या पक्षातील मुख्य नेत्यांकडून वैयक्तिक कारणावरून डावलण्यात आले. त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्यात आली नाहीत. त्याचा काय परिणाम झाला ते सगळ्यांना दिसत आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -