घरसंपादकीयओपेडतरुणांचे प्रेरणास्थान...राजकारणातील चैतन्यसूर्य!

तरुणांचे प्रेरणास्थान…राजकारणातील चैतन्यसूर्य!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज वयाच्या ८३व्या वर्षात पदार्पण करीत असले तरी त्यांचा राजकीय मुत्सद्दीपणा आणि जिगरबाजपणा काही कमी झालेला नाही. पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक वेळा बंड केले आणि अनेक वेळा बंड पचविले, पण आता पुतणे अजित पवार यांनी बंड करून पक्षावरच दावा केल्यामुळे पवार थोडे हतबल झालेले दिसतात, मात्र नेहमीप्रमाणे ही वादळापूर्वीची शांतता असेल असे वाटते. कारण त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी म्हटलेच होते, माय डॅड इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल पर्सन.

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबरचा. १२ या आकड्याशी मराठी भाषेत अनेक गोष्टी जोडल्या जातात. आपल्या राजकीय कुशलतेने पवारांनी अनेकांना अस्मान दाखवले, बारा वाजवले आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. आता शरद पवार संपले, त्यांचे वय झाले, त्यामुळे मी पुन्हा येईन, असे जाहीर आव्हान देणार्‍यांना शरद पवारांनी चारी मुंड्या चीत केले. अलीकडे शरद पवारांना एका पत्रकाराने विचारले, पवारसाहेब तुमच्या वयाचे काय, तर ते म्हणाले, माझ्यासोबत कुस्ती खेळणार का? या वयातही असे आव्हान स्वीकारण्याची पवारांची तयारी अनेकांना अक्षरश: तोंडात बोट घालायला लावते. या वयातही या गृहस्थांकडे कुठून येते एवढी शक्ती, असा प्रश्न लोकांना पडतो, पण शरद पवार हा एक अखंड आणि स्वयंभू असा ऊर्जेचा धबधबा आहे, असे म्हणावे लागेल.

पवारांच्या राजकीय जीवनाचा धांडोळा घेतल्यावर असे दिसेल की आमदार, खासदारकीच्या निवडणुकीत ते कधीच पराभूत झाले नाहीत. सक्रिय राजकारणापासून ते कधीच फार काळ दूर गेले नाहीत. आपण सत्ता मिळवण्यासाठी आणि लोकांची अखंड सेवा करण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत, हीच त्यांची जन्मजात भावना असावी असे त्यांचा एकूणच जीवनप्रवास पाहिल्यावर दिसते. भारतीय राजकारणात दोन असे नेते दिसतील की ते सत्तेपासून दूर राहू शकले नाहीत. ते म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. सत्ता हाती असली की लोकांची कामे वेगाने करता येतात. त्यामुळे ती हाती असायलाच हवी, असे या दोन्ही नेत्यांना वाटले. आजही वय झाले म्हणून शरद पवार यांनी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. त्यांची ही ऊर्जा आणि कामाचा झपाटा आजच्या तरुण पिढीला नवचैतन्य देणारे आहे.

- Advertisement -

पवारांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा राजकीय बंड केली. इतकेच नव्हे तर अनेक बंडोबांना थंडोबा केले, पण त्यांच्या उतारवयात त्यांचे पुतणे अजित पवार यांनी केलेले बंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच सांगितलेला दावा या प्रकरणाचा सामना करताना मात्र पवारांना वयोमानानुसार आता जड जाताना दिसत आहे, पण शेवटी ते पवार आहेत हे विसरून चालणार नाही. कारण त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. शरद पवार नाहीत असे महाराष्ट्रात कुठलेे क्षेत्र नाही, मग ते कला असो, क्रीडा असो, ग्रंथालय असो, पवार सगळ्यांना हवे असतात. कारण पवारांकडे अध्यक्षपद असले की आपल्याला काही अडथळा येणार नाही, आपले प्रश्न मार्गी लागतात, असा अनेकांना विश्वास वाटतो.

शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण, हा प्रश्न ज्यावेळी पवारांची मुलगी सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हापासून विचारला जाऊ लागता. तोपर्यंत पवारांचे राजकीय वारसदार अजित पवार असतील असेच लोकांना वाटत होते. पुढे काळ जसा सरकू लागला तसे राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे दोन ध्रुव दिसू लागले. सुप्रिया सुळे या राजकारणात नवीन होत्या. त्याचप्रमाणे पवार घराण्याची कौटुंबिक वीण घट्ट असल्यामुळे पुढे दादा आणि ताईंमध्ये काही वितुष्ट येईल असे वाटत नव्हते. कारण सुप्रिया सुळे या जुळवून घेणार्‍या आहेत. त्यामुळे पवारांचा राजकीय वारसदार कोण, याचे उत्तर दोघांनीही कधी दिले नाही.

- Advertisement -

त्याचवेळी पक्षात अजित पवारांची अस्वस्थता वाढत होती. आपले काका आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी का देत नाहीत, अशी खदखद अजितदादांच्या मनात कायम होती. त्याचा पहिला स्फोट २०१९ साली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर झाला. पहाटेच्या वेळी अजितदादा आपल्या समर्थक आमदारांसोबत फडणवीसांसोबत राजभवनावर पोहचले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता, पण त्या धक्क्यातून सावरत शरद पवारांनी अजितदादा यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आपल्याकडे आणण्यात यश मिळवले आणि अजितदादांचे बंड मोडून काढले.

अजितदादा पुन्हा माघारी आले. सिल्व्हर ओकवर पुन्हा येताना त्यांनी सुप्रियाताईंसाठी कॅडबरी चॉकलेट आणले. चॉकलेटच्या माध्यमातून त्यांनी नात्यांमध्ये आलेली कटूता दूर केली. त्यामुळे आता सगळे ठीक होईल असे वाटत असताना अजितदादांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरून बंड केले आणि थेट पक्षावरच दावा केला. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, संख्याबळ माझ्याकडे जास्त आहे, असे त्यांनी जाहीर केले. जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झाले तेच सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत सुरू आहे. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलेेले आहे. दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद सुरू आहेत. पुढे काय होणार हे कळायला मार्ग नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादीविषयी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तारखा दिल्या आहेत, पण ठाकरे आणि शिंदे यांच्या सुनावण्यांच्या बाबतीत जे सुरू आहे ते पाहिल्यावर राष्ट्रवादीबाबतचा निर्णय कधी लागेल हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा भाजप हा मूळ आधारस्तंभ आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जी कोंडी झालेली होती, त्याला भाजपने वाट मोकळी करून दिली. त्यामुळे ते भाजपकडे आले. शिवसेनेच्या वर्मी घाव घातल्याशिवाय आपला डाव साधणार नाही, कारण त्यांच्यामुळेच आपल्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली आहे असे भाजपला वाटत होते.

ज्या संधीची वाट भाजपवाले पाहत होते ती संधी एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने त्यांना मिळाली. तसेच शिवसेनेचे त्यावेळचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारसरणीशी विसंगत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची कोंडी झाली होती. शिंदे यांना जो मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्यामागून नेते आणि कार्यकर्ते आले त्यामागे हे कारण होते. कारण सत्तेच्या नव्या समीकरणात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तरी शिवसैनिकांची कोंडी झाली होती.

अजितदादा अनेक वर्षे आपल्या काकांसोबत होते, पण तरीही आपल्याला मुख्य पदापासून दूर ठेवले जात आहे. काका पक्षाची सूत्रे आपल्या हाती देत नाहीत याची खंत अजितदादांना वाटत होती. त्यांच्या मनातील अस्वस्थता त्यांनी विविध प्रसंगी दाखवून दिली होती, पण अजितदादा हे काही धक्कादायक निर्णय घेतील असे पवारांना वाटत नव्हते. कारण त्यांचे पहाटेच्या शपथविधीचे एक बंड मोडून काढल्यामुळे ते पुन्हा असे धाडस करणार नाहीत असे शरद पवारांना वाटत होते, पण काळ सतत बदलत असतो. अजितदादांची अस्वस्थता टिपेला पोहचली होती. आपण वेगळा पक्ष स्थापन केला तर आपला टिकाव लागणार नाही, पण जर आपण शिंदे यांच्याप्रमाणे पक्षावरच दावा सांगितला तर सगळा पक्ष आपल्या बाजूने फिरवता येईल असे अजितदादांना वाटत होते.

त्यामुळे ते आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना आणि त्याच्या सहकार्‍यांना भाजपने चांगली पदे दिली. कारण त्यातून भाजपला शरद पवारांना शह द्यायचा होता. त्यांची ताकद कमी करायची होती, पण अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, आपले काका आपल्या मार्गात अडथळे आणत आहेत, त्यामुळे आपली ती इच्छा भाजप पूर्ण करेल, अशीच भावना त्यांनी बंडानंतर केलेल्या भाषणातून व्यक्त केली होती, पण अलीकडेच भाजपचे राज्यातील मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अजितदादांना सोबत घेताना आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदाचे वचन दिलेले नव्हते. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि पुढील विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल. त्यामुळे आता अजितदादांची कोंडी झाली आहे.

जसजशी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येईल आणि जागावाटपाचा प्रश्न पुढे येईल, तसतशी ही परिस्थिती अधिक अवघड होणार आहे. कारण भाजपला महाराष्ट्रात शतप्रतिशत विजय हवा आहे. सोबतच्या दोन पक्षांना जास्त जागा दिल्या तर ते साध्य होणार नाही. अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळालेच नाही, पण त्याचसोबत पुढे जागावाटपात काय होणार हेही स्पष्ट नाही. शिंदे सोबत असल्यामुळे भाजपला त्यांची तशी गरजही नाही. त्यामुळे पुन्हा शरद पवारांचीच सरशी होईल असे दिसत आहे. कारण शरद पवारांचे वय झाले तरी त्यांच्या जिगरबाजपणाचे वय झालेले नाही.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -