घरसंपादकीयओपेडसत्तालोलूप नेत्यांमुळे महाराष्ट्र काँग्रेस रसातळाला...!

सत्तालोलूप नेत्यांमुळे महाराष्ट्र काँग्रेस रसातळाला…!

Subscribe

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असणे हे काही नवीन नाही. उलट देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत सगळीकडे जी गटबाजी बोकाळली आहे, त्याचे उगमस्थान हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे, तथापि या सत्तालोलूप स्वार्थी संधीसाधू दलबदलू नेत्यांकडे पाहिले की कोणालाही असे वाटेल की हे काँग्रेसच्या विचारसरणीशी एकनिष्ठ कधीच नव्हते. केवळ काँग्रेसकडे सत्ता होती आणि त्यामुळे सत्तेचा मलिदा ओरपण्यासाठीच यांनी काँग्रेसचा आजवर पुरेपूर वापर करून घेतला आहे. मग ते अशोक चव्हाण असो की त्यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा असोत की अगदी काल परवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बाबा सिद्धीकी असोत. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर विधिमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक प्रदेशाध्यक्ष कसा असतो हे काँग्रेसला दाखवून दिले आहे, तथापि काँग्रेसचाच नव्हे तर कोणत्याही पक्षाचा राज्याचा प्रमुख हा केवळ आक्रमक असून चालत नाही तर त्याच्याकडे संघटनात्मक बांधणीचे कौशल्यदेखील असावे लागते. उत्तम संवाद आणि समन्वय साधणे आवश्यक असते.

महाराष्ट्राची राजकीय स्थिती ही जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशी राजकीयदृष्ठ्या अत्यंत बिकट होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील फुटीनंतर आता काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्षही अंतर्गत मंडळीने पोखरून निघाला आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची दुसरी टर्म अर्थात सलग दहा वर्षे देशाची सत्ता उपभोग झाल्यानंतर केंद्र सरकार विरोधात जी काही थोडीफार अँटी इनकंबन्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या आघाडीमधील हवादेखील काढून घेण्याचे काम भाजपची नेतेमंडळी अत्यंत पद्धतशीरपणे करत आहेत.

स्वार्थी, संधीसाधू आणि सत्तालोलूप नेतेमंडळी ही काँग्रेसची सर्वात मोठी कमजोरी आहे. भारतातील कोणत्याही निवडणुका या केवळ यात्रा काढून अथवा लाखोंच्या सभा घेऊन जिंकता येत नाहीत तर त्यासाठी सक्षम संघटनात्मक बांधणी, बूथ लेवलपर्यंतचे काटेकोर नियोजन आणि कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ असलेले नेटवर्क हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत आवश्यक असते.

- Advertisement -

सर्वधर्मसमभाव ही राजकीय संकल्पना म्हणून कितीही आदर्शवत वाटत असली आणि या विचारसरणीला भारतीय मतदार हे आदर्श मानत असले तरीदेखील प्रत्यक्षात सर्वसामान्य मतदारांपर्यंत कोणत्या राजकीय पक्षाचे विचार तसेच कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे अधिक सक्षमपणे आणि आताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे लोकांपर्यंत पोहचतात, त्यांचे मतपरिवर्तन करतात, मनपरिवर्तन करतात यावरच निवडणूक जिंकण्याचे फंडे हे निश्चित होत असतात.

देशावर २०१४ पर्यंत एखाद दुसरा अपवाद वगळता अखंडपणे एकहाती राज्य केलेल्या काँग्रेससारख्या प्रस्थापित सत्ताधारी राष्ट्रीय पक्षाला सत्तेमागचे जे निवडणुका जिंकण्याचे फंडे कळाले नाहीत अथवा कळूनही काँग्रेस त्याकडे वळली नाही असे हुकमी फंडे हे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांच्या केंद्रातील सत्तेच्या आधारावर आत्मसात केले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये जी गळती लागली आहे त्या गळतीमागे भाजपचे हे हुकमी फंडे प्रामुख्याने कारणीभूत आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

कालच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी प्रदेशाध्यक्ष व १९९२ पासून ते अगदी उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले अशोक चव्हाण यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला तसेच त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतरचे त्यांचे जे प्रसारमाध्यमांसमोरचे विधान होते की भाजपमध्ये जाण्याबाबत अजून कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही.

ते स्वतःचेच विधान त्यांनी त्यांच्या विधानाला २४ तास होण्याच्या आधीच खोटे ठरवत मंगळवारी दुपारीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून एक गोष्ट प्रसारमाध्यमांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे राजकीय नेते हे प्रसारमाध्यमांसमोर धादांत खोटे बोलू लागले आहेत आणि त्याचे ताजे आणि आदर्श उदाहरण म्हणून अशोक चव्हाण यांच्या कालच्या विधानाकडे पाहता येईल.

मुळात अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडणार ही काही धक्कादायक ब्रेकिंग वगैरे समजण्याचे कारण नव्हते. कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आणि त्यावरील विश्वासदर्शक ठरावाचे मतदान होते त्यावेळीदेखील अशोक चव्हाण हे सभागृहात विलंबाने दाखल झाले होते. अर्थात त्यावेळीदेखील अशोक चव्हाण हे भाजपवासी होणार अशा चर्चा जोरात होत्या, मात्र तरीदेखील काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या घडामोडींकडे नेहमीप्रमाणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचे दुःख हे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अधिक आहे. याचं कारण म्हणजे अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील एकमेव असे नेते म्हणावे लागतील की ज्यांचे वडील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण यांनादेखील २००८ ते २०१० अशी दोन वर्षे काँग्रेसने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बहाल केले होते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांची एण्ट्रीदेखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती करून झाली होती.

त्यानंतर ते शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात काही काळ राज्यमंत्री होते. त्यानंतर स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कॅबिनेट खाते होते आणि २००८ ते २०१० या काळात तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि जर सर्वात शेवटी म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती. तहीही त्यांनी काँग्रेसला निरोप दिला यासारखे दुर्दैव महाराष्ट्र काँग्रेसच्या भाळी दुसरे कोणतेही असू शकत नाही.

महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्षाचे नेते हे सोयीस्करपणे विसरत आहेत की ते ज्या सत्ताधारी भाजपच्या प्रेमात पडत आहेत त्या भाजपचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे गेली ६० वर्षे म्हणजे अगदी देशामध्ये २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची करिष्माकारी लाट येण्यापूर्वी केंद्रातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या विचारसरणीशी अखंडपणे कुठेही विचलित न होता सातत्याने संघर्ष करत होते. त्यामुळे भाजपने अपरिमीत संघर्ष करत प्रस्थापित काँग्रेसकडील देशाची सत्ता खेचून घेतली.

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असणे हे काही नवीन नाही. उलट देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत सगळीकडे जी गटबाजी बोकाळली आहे त्याचे उगमस्थान हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे असं म्हटलं तर कोणाला नवल वाटू नये, तथापि या सत्तालोलूप स्वार्थी संधीसाधू दलबदलू नेत्यांकडे पाहिले की कोणालाही असे वाटेल की हे काँग्रेसच्या विचारसरणीशी एकनिष्ठ कधीच नव्हते.

केवळ काँग्रेसकडे सत्ता होती आणि त्यामुळे सत्तेचा मलिदा ओरपण्यासाठीच काँग्रेसचा या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आजवर पुरेपूर वापर करून घेतला आहे. मग ते अशोक चव्हाण असो की त्यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा असोत की अगदी काल परवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बाबा सिद्धीकी असोत.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर विधिमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक प्रदेशाध्यक्ष कसा असतो हे काँग्रेसला दाखवून दिले आहे, तथापि काँग्रेसचाच नव्हे तर कोणत्याही पक्षाचा राज्याचा प्रमुख हा केवळ आक्रमक असून चालत नाही तर त्याच्याकडे संघटनात्मक बांधणीचे कौशल्यदेखील असावे लागते आणि संघटनात्मक बांधणीसाठी पक्ष संघटनेतील सर्वांशीच उत्तम सुसंवाद, समन्वय आणि विश्वासाचे वातावरण ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. भाजपबाबत अत्यंत आक्रमक असलेले नाना पटोले हे काँग्रेस पक्षांतर्गत सुसंवाद आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबाबत कुठेतरी कमी पडत आहेत हेदेखील यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे देशातील सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या विचारसरणीशी अधिक प्रमाणात कशी जोडली जाईल यासाठी गेली दोन वर्षे सतत यात्रा, दौरे करत आहेत, मात्र राहुल गांधींनी लक्षात घेतले पाहिजे की जोपर्यंत तुमच्या पक्ष संघटनेचा पाया भक्कम होत नाही तोपर्यंत या गर्दीचा काही उपयोग नाही. ते होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या यात्रा, दौरे यांना म्हणावा असा काही अर्थ नाही. कारण काँग्रेसमध्ये ही जी काही नेत्यांची गळती सुरू झाली आहे ती रोखण्याची क्षमता आजच्या घडीला तरी काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -