घरसंपादकीयओपेडमहाविकासची आदळआपटच; होणार ‘सत्या’चीच ‘जीत’!

महाविकासची आदळआपटच; होणार ‘सत्या’चीच ‘जीत’!

Subscribe

सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली असली आणि भाजपच्या शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा जरी दिला असला तरीही तांबेंना खलनायक ठरवण्यात महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना साफ अपयश आल्याचे दिसते. किंबहुना महाविकासच्या यशासाठी कोणीही मनापासून प्रयत्नच केलेले दिसत नाहीत. संपूर्ण महाविकास आघाडी एका अपक्ष उमेदवारासमोर जेव्हा नांगी टाकते, तेव्हा या आघाडीचा किती शक्तिपात झाला याची कल्पना येते. पदवीधर मतदार हे केवळ राजकीय पक्ष बघूनच मतदान करीत नसल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयाची माळ सत्यजित तांबे यांच्याच गळ्यात पडेल, असे चित्र मतदानानंतर दिसत आहे.

नाशिकची निवडणूक एकतर्फी होईल, डॉ. सुधीर तांबे सहजपणे बाजी मारून आपली जागा राखतील, असा अंदाज वर्तवला जात असताना अशा काही राजकीय खेळी खेळल्या गेल्या ज्यामुळे निवडणुकीत थोडाफार रंग भरला. उमेदवारी जाहीर होऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी रणांगण सोडून आपल्या मुलाला पुढची चाल दिली ही बाब काँग्रेसच्या समर्थकांसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मतदारांना रुचली नाही. भाऊसाहेब थोरातांपासून काँग्रेसचा वसा अगदी इमाने-इतबारे चालवणारे तांबे घराणे कधी ‘घर का भेदी’ ठरतील असा विचारही कुणी केला नव्हता. त्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजी पसरणे स्वाभाविकच होते, परंतु मतदारांमधील या नाराजीला विरोधकांपैकी कुणीही ‘कॅश’ करू शकले नाही, हे महत्वाचे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी संपूर्ण निवडणुकीच्या काळात तांबेंविरोधात जोरदारपणे शाब्दिक आदळआपट केली, पण त्यातून साध्य काय झाले? ज्या पोटतिडकीने नाना पटोले हे तांबेंविरोधात भूमिका मांडत होते, त्या पोटतिडकीने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल.

तांबे आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नात्यात असल्याने तांबेंच्या माध्यमातून थोरातांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षीय स्पर्धकांकडून यानिमित्त झाला नसेल तर नवल, परंतु थोरातांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आपली दारे उघडली नाहीच; शिवाय त्यांच्या बाजूने ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळे थोरात नक्की कुणाचे, असा प्रश्न या काळात पडणे स्वाभाविकच होते. दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांनाही अहमदनगर जिल्हा काँग्रेसमुक्त करायचा असल्याने ते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले दिसतात. भाजपने तांबेंबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसतानाही विखेंनी तांबेंची जाहीरपणे तळी उचलली. कदाचित, नगर जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढला तर त्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणे अधिक सुकर होईल ही सुप्त इच्छा विखेंची असू शकते. अशा वेळी फडणवीसांच्या आदेशाची वाट न बघताच सुजय विखेंनी ‘भूमिपूत्राला साथ द्या’ची हाक देणे यात सारे काही आले.

- Advertisement -

सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारणे आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करणे यामागे भाजपचीच मोठी साथ असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. असे असतानाही भाजपने अखेरपर्यंत तांबेंना जाहीरपणे पाठिंबा दिलेला दिसत नाही. बुद्धीभेद करण्यात भाजपचे नेते नेहमीच अग्रेसर असतात याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून तांबेंच्या उमेदवारीकडे बघता येईल. यामागची पार्श्वभूमी बघायची झाली तर, हा संपूर्ण नाशिक मतदारसंघ हा डॉ. सुधीर तांबे यांनी बांधून ठेवलेला आहे. मतदारसंघाच्या अखेरच्या टोकापर्यंत संपर्कात राहणे, मतदारांची कामे कोणतेही आढेवेढे न घेता करत राहणे, दांडगा जनसंपर्क आणि शिक्षक संघटनांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध या डॉ. सुधीर तांबे यांच्या जमेच्या बाजू आहेत. सलग तीन पंचवार्षिक निवडणुका निवडून आल्यानंतर या काळात तांबेंनी काँग्रेसमध्येही सक्रिय सहभाग घेतला. परिणामी तांबेंच्या वैयक्तिक जनसंपर्काबरोबरच काँग्रेसचीही ताकद या मतदारसंघात वाढत गेली.

मुळात हा मतदारसंघ डॉ. तांबे निवडून येण्यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघात दीर्घकाळ भाजपचे ना. स. फरांदे यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९८ मध्ये फरांदे यांच्याऐवजी भाजपने प्रतापदादा सोनवणे यांना उमेदवारी दिली. ते सलग दोन वेळा निवडून आले. म्हणजे या मतदारसंघावर २००९ पर्यंत भाजपचा वरचष्मा होता, परंतु २००९ मध्ये प्रतापदादा सोनवणे यांना खासदारकी लाभल्याने पदवीधरच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसने अ‍ॅड. नितीन ठाकरेंना, तर भाजपने प्रसाद हिरेंना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे बलाढ्य नेते बाळासाहेब थोरात यांनी अथक प्रयत्न करूनही डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामागे शरद पवार यांचा मोठा हात होता, असे बोलले गेले. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे सुधीर तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि बाजीही मारली. अर्थात त्यानंतर अल्प कालावधीतच तांबे स्वगृही परतले. त्यानंतर दोन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढवून त्यांनी मतदारसंघातील आपली ताकद वाढवली. त्यामुळे आपसुकच मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव वाढला. हा प्रभाव अजूनही टिकून आहे.

- Advertisement -

असे असताना सत्यजित तांबे यांना जर भाजपने जाहीररित्या पाठिंबा दिला असता तर काँग्रेसच्या विचारसरणीशी निगडित मतदारांनी तांबेंकडे पूर्णत: पाठ फिरवली असती. आजमितीस तांबे अपक्ष उमेदवार होते. ते काँग्रेसचे उमेदवार नसले तरी भाजपचेही नव्हते. त्यामुळे त्यांना काँग्रेसचीही मते मिळवणे जड झाले नाही. शिवाय सत्यजीतच्या मागे विखेंची ताकद उभी राहिली. विखेंचीही मोठी शिक्षण संस्था आहे, तर तांबे यांचीही स्वत:ची शिक्षण संस्था आहे. म्हणजे दोन मोठ्या शिक्षण संस्था तांबेंच्या पाठीशी सबळपणे उभ्या होत्या. विखेंचे बंधू राजेंद्र यांनी निवडणुकीच्या दृष्टीने बरीच तयारी केली होती, परंतु राधाकृष्ण विखेंच्या शब्दाबाहेर ते नसल्याने त्यांनी प्रामाणिकपणे तांबेंचा प्रचार केला. दुसरीकडे विरोधी उमेदवार शुभांगी पाटील या तांबेंसमोर राजकीयदृष्ठ्या फिक्या पडल्या. त्यांची स्वत:ची शिक्षण संस्था नाही. त्यांचे धुळे जिल्ह्यातील काम मोठे असले तरी त्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत.

त्या शिक्षिका असून टीचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षाही आहेत. विद्यार्थ्यांचीही संघटना त्यांनी बांधलेली आहे, परंतु इतक्या मर्यादित कामावर पदवीधर निवडणूक जिंकता येत नाही. एक लाख मतदार नोंदणी केल्याचा त्या दावा करीत असल्या तरी त्यांना पाठिंबा मिळाल्यापासून मतदारसंघात झालेली चर्चा बघता मतदार नोंदणीच्या दाव्यातही तथ्य नसल्याचे दिसते. सर्वात महत्वाचे म्हणजे पाटील यांना ज्यांनी पाठिंबा दिला त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनाही त्या माहीत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या बाजूने प्रभावी प्रचार होऊ शकला नाही. अहमदनगरमध्ये तांबे आणि थोरांतांचे प्रभुत्व असल्याने तेथील अनेक काँग्रेसींना पाटलांचा प्रचार करण्याचे धारिष्ठ्य दाखवले नाही. राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतलेली दिसते. मतदानाच्या दिवशी तर अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात महाविकासचे पोलिंग एजंटच दिसले नाहीत. या उलट प्रत्येक मतदारसंघात तांबेंची फौज होती. निवडणूक लढवण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा तांबेंच्या हाताशी होती.

या यंत्रणेने त्यांची जबाबदारी चोखपणे बजावलेली दिसते. त्यामुळे शुभांगी पाटील तांबेंपुढे थिट्या पडलेल्या दिसल्या. अर्थात निवडणुकीचा निकाल अजून बाकी आहे. वंचित आघाडी आणि स्वराज्य पक्षानेही आपापले उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस आणली होती. असे असले तरी तांबेंइतकी सक्षम यंत्रणा अन्य उमेदवारांकडे नसल्याने सत्यजित तांबे यांचा विजय दृष्टीपथास पडत आहे. ते निवडून आल्यानंतर त्यांची वाटचाल भाजपच्याच दिशेने असेल असे आज तरी चित्र आहे. अर्थात बंड करून स्वगृही परतण्याची थोरात-तांबे घराण्याची परंपरा आहे. २००९ मध्ये डॉ. सुधीर तांबेंनी काँग्रेसमधून बंड करीत अपक्ष उमेदवारी केली होती. निवडून आल्यावर ते स्वगृही परतले. त्यापूर्वी म्हणजे १९८५ च्या निवडणुकीत भाऊसाहेब थोरात आणि तत्कालीन मंत्री बी. जे. खताळ- पाटील यांच्यात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी कमालीची स्पर्धा होती.

अखेर ‘दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ’ या उक्तीप्रमाणे या दोघांनाही टाळून पुणे येथील शकुंतला थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. थोरात या नावाचा लाभ घेण्याची ही रणनीती होती. त्यावेळी भाऊसाहेब थोरातांनी स्वत: बंड करणे टाळले; मात्र आपले चिरंजीव बाळासाहेब यांना त्यांनी अपक्ष उभे केले होते. ते निवडून येताच स्वगृही परतले. हाच कित्ता सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंनी गिरवला तर भाजपच्या खेळींवर पाणी फिरेल, पण तसे होणे अवघड आहे. यापुढील काळात बाळासाहेब थोरात हे कधी मौन सोडतील, राजकीय ‘आजारा’तून ते कधी बाहेर पडतील, तांबे पिता- पूत्रांनी काँग्रेसमधून बंड करण्याचे पाऊल का उचलले या सर्वांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. ही उत्तरे पुढे आल्यानंतर लोकांच्या मनातून ‘सत्या’ची किंमत वाढते की कमी होते हे ठरेल.

महाविकासची आदळआपटच; होणार ‘सत्या’चीच ‘जीत’!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -