घरसंपादकीयओपेडOped Mana Sajjana : सरकार मुळावरच घाव का घालत नाही?

Oped Mana Sajjana : सरकार मुळावरच घाव का घालत नाही?

Subscribe

शिकली सवरलेली माणसं अनेकदा स्वत:ला फसवताना दिसतात. सिगरेट, दारूच्या आहारी, गुटखा खाणार्‍यांत जास्त हीच मंडळी दिसतात. सिगरेटच्या पाकिटावर तर धोक्याचा इशारा दिलेला असतो, पण त्याकडे दुर्लक्ष करत सिगरेटचा धूर काढणारे लोक कमी नाहीत. याची किंमत त्यांना मोजावी लागतेच शिवाय याचे परिणाम त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही भोगावे लागतात. ही व्यसने आयुष्याची वाताहत करतात, म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ लिहिताना मनाला सज्जन म्हणत चांगलं आणि वाईट यातील फरक स्पष्ट दाखवला आहे. आता यातून काय शिकायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं! सरकार व्यसनांची हानिकारकता दाखवण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करतं, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठीही हजारो कोटींची तजवीज करतं. तरीही प्रश्न उपस्थित राहतो, सरकार मुळावरच घाव का घालत नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.

अविनाश चंदने – 

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका ओळखीच्या कुटुंबातील युवकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. चांगला 26-27 वर्षांचा तरुण होता, पण आता त्याला श्वास घेणंही अशक्य झालं होतं. व्हेंटिलेटरवर होता तो. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्याच्या कुटुंबाशी बोललो तेव्हा एवढंच कळलं की, त्याला जगायचं आहे आणि डॉक्टर मला जगवा, असं त्यानं डॉक्टरांसह कुटुंबातील सर्वांना विनवणी केली होती. मग असं अचानक काय झालं की त्याची प्रकृती खालावली. या प्रश्नाला त्याच्या कुटुंबीयांनी दिलेलं उत्तर होतं, मुलाला जडलेलं सिगरेट आणि तंबाखूचं व्यसन.

मुलगा कॉलेजमध्ये गेल्यानंतर कधीतरी स्टाईल म्हणून सिगरेट पिऊ लागला होता. पुढे कॉलेजच्या पाच वर्षांत त्याला सिगरेटचं व्यसन जडलं होतं. त्यातच गुटखा खाऊ लागला. तो आणि कॉलेजमधील त्याचे काही मित्र नेहमी कट्ट्यावर सिगरेट प्यायचे, गुटखा खायचे. घरी येण्यापूर्वी हा युवक तोंड अगदी स्वच्छ करायचा आणि तोंडाला वास येऊ नये म्हणून कसली तरी गोळीदेखील खायचा, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा… झाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

डिग्रीनंतर नोकरी लागली. नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर असल्यामुळे सिगरेट, गुटखा खाणं वाढलं होतं. आता घरच्या मंडळींच्याही हे लक्षात आलं होतं. त्याच्या अनेक मित्रांनाही हे कळलं होतं. कुणी त्याच्या सवयीला टोकलं तर अगदी सहज म्हणायचा, ‘अरे चार दिवसांची जिंदगी, खाओ, पिओ और ऐश करो..!’ त्यानंतरही कुणी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं, ‘मरण तर येणारच आहे, मग डरने का क्यू?’ आता हे कमी म्हणून की काय तो काही उदाहरणेही द्यायचा, ‘ते बघ अमक्या घरातले ते, कसलंच व्यसन नाही की काही नाही, तरीही ऐन पन्नाशीतच गेले ना! म्हणून सांगतो आपल्याला काहीच होणार नाही! पाहिजे तर स्टँप पेपरवर लिहून देतो!’

- Advertisement -

कधी कधी त्याचे मित्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा तर भारी उत्तर द्यायचा. ‘अरे मेल्यावर देवच विचारतो, दारू प्यायलास का, सिगरेट प्यायलास का, तंबाखू खाल्लीस का, ड्रग्ज घेतलेस का? आणि हे काही केलं नसेल तर देव पुन्हा खाली पाठवतो’ असं उत्तर देऊन स्वत: हसायचा आणि आपण समोरच्याला कसं निरुत्तर केलं याचा त्याला अभिमान वाटायचा. आपण चुकतोय, याची त्याला जाणीवच नव्हती. अखेर काही दिवसांनी तो आजारी पडला. बरं व्हायचं नाव घेत नव्हता. प्रकृती ढासळत चालली होती. डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या. अखेर त्याला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. हे कसं झालं, असा प्रश्न त्याला पडला.

हेही वाचा… समन्वयातून सर्वांगीण विकास

मुलाच्या घरचेही काळजीत पडले. उपचार सुरू झाले, पण आजार विकोपाला गेला होता. गुटख्यानं तोंडाची चाळण केली होती. सिगरेट फुकून फुफ्फुस निकामी झालं होतं. आता त्याला जाणीव झाली आपण मरणाच्या दारात आहोत आणि आपल्याला जगायचं आहे. आपण काय करून बसलो, सगळे सांगायचे तेव्हा त्यांची थट्टा करायचो, त्यांना निरुत्तर करायचो! पण नुकसान त्यांचं नाही माझंच झालं. जीव माझा जाणार आहे, त्यांचा नाही. कारण त्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

या आजारामुळे नोकरी सोडावी लागली. उपचारांवर अमाप खर्च सुरू झाला. कुटुंबावरील ताण वाढ वाढू लागला. हे सर्व तो युवक उघड्या डोळ्यांनी पाहत होता, पण आता खूप उशीर झाला होता. त्याच्या कुटुबीयांनी त्याची आणखी एक आठवण सांगितली. काही दिवसांपूर्वी अचानक त्याला लहानपणी वाचलेले मनाचे श्लोक आठवले.

मना सज्जना भक्तीपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे !
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे !! 2 !!

समर्थ रामदास स्वामी मनाला सज्जन म्हणतात आणि सांगतात की, नित्य नेमानं देवाचं स्मरण करत चांगलं काम कर. असं केल्यास देवाची तुझ्यावर कृपा राहील. कारण तो देवाचा स्वभाव आहे. त्याचवेळी जे काही वाईट आहे त्या मार्गाला जाऊ नकोस, ते सोडून दे आणि जगात जे उत्तम आहे, जे लोकादरास पात्र आहे, ते कर!

समर्थ रामदास स्वामींनी जगण्याचा केवढा सोपा मंत्र सांगितला आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर काय होते, याची जाणीव या तरुणाला झाली होती. आता त्याला जगण्याचं महत्त्व कळलं होतं. यातून तो बरा कधी होईल माहीत नाही, पण हे आयुष्याचं वास्तव आहे, एवढं खरं. गंमत म्हणजे सिगरेट किंवा तंबाखू किंवा अगदी गुटखा विकत घेतला तरी त्या पाकिटावरस तसेच त्या पुडीवर धोक्याचा इशारा दिलेला असतो. या इशार्‍याकडे शिकले सवरलेले लोक हमखास दुर्लक्ष करतात. कामाचा खूप ताण आहे, थोडा धूर काढला तर रिलॅक्स व्हायला होतं, असं म्हणत ही मंडळी त्याचं समर्थन करतातस पण याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात, याची त्यांना अजिबात जाणीव नसते.

हेही वाचा… क्रांतिकारक खुदीराम बोस

हे वाईट आहे, याचे परिणाम चांगले होणार नाहीत, हे माहीत असूनही लोक व्यसन करत असतीलस तर त्याला आत्महत्येच्या दिशेनं टाकलेलं पाऊल का म्हणू नये? वास्तविक दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू, ड्रग्ज यामुळे काय होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. सरकार त्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करतं, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठीही हजारो कोटींची तजवीज करतं. तरीही प्रश्न उपस्थित राहतो, सरकार मुळावरच घाव का घालत नाही? सिगरेट, दारू, तंबाखूच्या कंपन्यांकडून कररूपात भरभक्कम रक्कम घेणारं सरकार नंतर तोच पैसा हॉस्पिटल, उपचार, औषधे आणि जाहिरातींवर का खर्च करतं, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.

गंभीर बाब म्हणजे व्यसनं करणारे बहुतांश लोक उच्चशिक्षित असतात. चांगलं काय आणि वाईट काय, हे ते शिकलेले असतात. तरीही क्षणिक सुखासाठी आयुष्य पणाला लावत असतात. बरं हे करताना ते त्यांच्या कुटुंबाला गृहीत धरतात. आपल्या वाईट व्यसनांचा कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो, व्यसनामुळे आपला मृत्यू झाल्यास पत्नी, मुलाबाळांचं कसं होणार, आपल्यावर अवलंबून असलेल्यांना पुढे कोणते भोग भोगावे लागतील, याची त्यांना अजिबात काळजी नसते.
बरं यात स्त्री-पुरुष असा भेद नाही. काही वर्षांपासून मुलीही खुलेआम स्टाईल स्टेटमेंट म्हणून सिगरेट ओढताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कामं करत असताना नको ती कामंही तेवढ्याच जिद्दीनं या मुली, महिला करतात, ही चिंतेची बाब आहे. ही व्यसनं जोपासतो म्हणजे आपण नक्की काय करतो, याचा गंभीरपणे कुणी विचार केला आहे का? याचा अर्थ एकच आपण कष्टानं कमावलेल्या पैशांतून आजार विकत घेतो, दु:ख विकत घेतो, त्रास विकत घेतो. थोडक्यात आपण मृत्यूला जवळ बोलावलेलं असतं. मग इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.

जी बाब तंबाखूजन्य पदार्थांची तीच दारूची. हे विकतचं दुखणं हवंच कशाला, याचा कुणी विचार करत नाही. उलट दारू आरोग्याला किती चांगली असते, दारू प्यायल्यानंतर भरपूर खाल्लं पाहिजे म्हणजे दारू बाधत नाही, असं मोडकंतोडकं समर्थन करत आपण शेकडो रुपये मोजून आजार विकत घेत असतो. काहीजण हातभट्टीची दारू वाईट असते आणि इंग्लिश दारू चांगली असते, अशी स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात.

म्हणूनच चांगलं आणि वाईट हे दोनच निकष असतात. त्यातून काय घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. म्हणूनच समर्थ मनाच्या श्लोकात लिहून गेलेत,
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे
यात सर्व काही आलं. जे जो करेल त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. त्यामुळे शहाण्यास अधिक बोलणे न लगे! नाहीतर सर्व करून भागल्यानंतर आणि मृत्यू समोर दिसू लागल्यावर आपणही केविलवाण्या स्वरात विनवणी करू, मला जगायचं आहे रे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -