घरसंपादकीयओपेडऑस्कर पुरस्काराच्या वाटचालीचा रंजक इतिहास!

ऑस्कर पुरस्काराच्या वाटचालीचा रंजक इतिहास!

Subscribe

‘ऑस्कर’ पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो. ९६वा ऑस्कर सोहळा नुकताच कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. जगभरात ऑस्कर पुरस्काराला इतकं का मानतात? हा जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कसा झाला? पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा त्याचे स्वरूप इतके भव्य-दिव्य नव्हते. चित्रपट इतिहासकार डेव्हिड थॉमसन यांच्या मते १९२७ मध्ये मीडिया फर्म मेट्रो-गोल्डविन-मेयरचे प्रमुख लुई बी. मेयर यांनी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ची स्थापना केली. यावेळी हॉलिवूडची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचे आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तेव्हाच कला क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली.

-आशिष निनगुरकर

ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो. ९६वा ऑस्कर सोहळा नुकताच कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदा ‘ओपनहायमर’ चित्रपट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ओपनहायमरने तब्बल सात पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ओरिजनल स्कोअर असे सात पुरस्कार एकट्या ओपनहायमरने जिंकले.

- Advertisement -

सोहळ्यादरम्यान दिवंगत भारतीय कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खरेतर अमेरिकन चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी हा सोहळा सुरू करण्यात आला होता. आज भारतासह जगभरातील चाहते, अभ्यासक या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात.

ऑस्कर पुरस्काराची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा याचे स्वरूप इतके भव्य-दिव्य नव्हते. चित्रपट इतिहासकार डेव्हिड थॉमसन यांच्या मते १९२७ मध्ये मीडिया फर्म मेट्रो-गोल्डविन-मेयरचे प्रमुख लुई बी. मेयर यांनी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ची स्थापना केली. यावेळी हॉलिवूडची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचे आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तेव्हाच कला क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली.

- Advertisement -

‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या म्हणण्यानुसार १९२७ मध्ये ऑस्कर पुरस्काराचा पहिला सोहळा पार पडला. हा सोहळा केवळ १५ मिनिटे चालला आणि सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही झाले नाही. या १५ मिनिटांच्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे एकूण १२ पुरस्कार देण्यात आले होते. सर्वप्रथम ऑस्कर पुरस्काराला १९३० मध्ये रेडिओवर प्रसारित केले गेले. १९५३ सालापासून ऑस्कर पुरस्कार टीव्हीवर प्रसारित होऊ लागला. सुरुवातीला विजेत्यांच्या नावांची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच करण्यात यायची.

सीलबंद लिफाफ्यातील विजेत्यांच्या नावाची घोषणा १९४१ नंतर सुरू झाली. १९५३ मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर पुरस्कार कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तेव्हापासून ऑस्कर पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठरला. ऑस्करमधील चित्रपट तज्ज्ञ डेव्ह कार्गर यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला सांगितले, अकादमी पुरस्कार टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले. ऑस्करची नामांकन प्रक्रिया अकादमीच्या सदस्यांद्वारे ठरवली जाते. ऑस्करच्या वेबसाईटनुसार चित्रपट व्यवसायाशी संबंधित कलाकार या अकादमीचे सदस्य असू शकतात.

अकादमीच्या एकूण १८ शाखा आहेत. यात कलाकारांपासून ते लेखकांपर्यंत, प्रोडक्शन डिझाईनपासून शॉर्ट फिल्मपर्यंत सर्व शाखांचा समावेश आहे. अकादमीचे सदस्यत्व दोन प्रकारे मिळते. यात जर एखाद्या अभिनेत्याला किंवा दिग्दर्शकाला चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले असेल, तर त्याला सहज सदस्यत्व मिळते, परंतु ज्याला कधीही ऑस्कर नामांकन मिळालेले नाही, अशा व्यक्तिला जर का सदस्यत्व हवे असल्यास अकादमीचे दोन सदस्य त्याच्या नावाची शिफारस करतात.

ऑस्कर पटकावल्यानंतर कलाकारांचे आयुष्य पालटते. २००७ मध्ये ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता मॅट डॅमन याने सांगितले की, १९९७ मध्ये ‘गुड विल हंटिंग’ चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. लोकांना हे एका रात्रीतलं यश वाटतं, पण यासाठी मी अकरा वर्षे मेहनत करीत होतो. पुरस्कार मिळण्याआधी कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नसे.

ऑस्कर पटकावल्यानंतर मला ओळख मिळाली, असे तो म्हणाला. ऑस्कर अकादमी जगभरातील कानकोपर्‍यातील चित्रपटांना संधी देत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास बोंगजून-हो दिग्दर्शित कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ला ९२व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार ऑस्कर पुरस्कार मिळाले. याने कोरियन चित्रपटांना जगात नवीन ओळख दिली.

आपली कलाकृती ऑस्करसाठी नामांकित आहे असे म्हटल्यावर त्याला मिळणारं पैशाचं बक्षीस फारसं महत्त्वाचं ठरत नाही असे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्स अन् अमर उजालाच्या एका बातमीनुसार ऑस्कर जिंकणार्‍याला बक्षीस म्हणून कोणत्याही प्रकारे पैसे दिले जात नाही. यात पुरस्कार अकादमीकडून गोल्ड प्लेटेड ट्रॉफी मिळते. पैशांशिवाय इतर अनेक फायदे संबंधित कलाकाराला मिळतात ती गोष्ट वेगळी.

ऑस्कर मिळाल्यानंतर संबंधित दिग्दर्शक, कलाकार आणि अन्य संबंधित लोकांची ब्रँड व्हॅल्यू अधिक वाढते, असे म्हटले जाते. ऑस्कर मिळवणार्‍यांना जी गुडी बॅग दिली जाते त्यात काही डॉलर्स असतात. ऑस्करची ट्रॉफी ही कांस्य धातूची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेला असतो. ते सगळे तयार करण्यासाठी एक हजार डॉलर अर्थात ८२ हजार रुपये खर्च होतो, असे म्हटले जाते. यात जर एखाद्या विजेत्याला त्याची ट्रॉफी विकायची असल्यास ती फक्त अकादमीलाच विकता येते.

जगातील पहिल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले अमेरिकी शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ७ पुरस्कारांची लयलूट करीत धमाका उडवून दिला. ऑस्कर पुरस्कारांच्या १३ प्रकारांसाठी ओपनहायमरचे नामांकन झाले होते. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह तब्बल सात ऑस्करचा मान या चित्रपटाला मिळाला. ‘पुअर थिंग्ज’ या चित्रपटातील बेला बॅक्स्टरच्या भूमिकेसाठी एमा स्टोन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी ९६व्या अकादमी पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याला गाझा आणि युक्रेनमधील युद्धे आणि अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकांची राजकीय पार्श्वभूमी होती. पुरस्कारांसाठी नामांकन लाभलेले अनेक चित्रपट आणि माहितीपटही युद्धांवर आधारित होते. युक्रेन-रशिया युद्धातील मारियुपोल शहरात झालेल्या लढाईवर आधारित ‘ट्वेंटी डेज इन मारियुपोल’ या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी फीचरचा सन्मान मिळाला.

तर दुसर्‍या महायुद्धातील नाझी सेनानी रुडॉल्फ हेस यांच्या जीवनावर आधारित कादंबरीवर बेतलेल्या ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार लाभला. दुसर्‍या महायुद्धादरम्यान सर्व प्रमुख देश अणुबॉम्ब हस्तगत करण्यासाठी धडपडत होते. अमेरिकेने लॉस अलामॉस येथे ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली मोठी प्रयोगशाळा स्थापन केली. तेथे हळूहळू टुमदार शहरच वसले. तेथेच अणुबॉम्बविषयी सुरुवातीचे संशोधन आणि प्रयोग केले गेले.

प्रोजेक्ट मॅनहटन म्हणून गाजलेल्या या प्रकल्पावर अमेरिकेने त्या काळात २ अब्ज डॉलर्स खर्च केले होते. अखेर अमेरिकेचा अणुबॉम्ब तयार झाला आणि १६ जुलै १९४५ रोजी त्याची अल्मागोरोडो येथील वाळवंटात चाचणी घेतली गेली. ती यशस्वी झाल्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्याने अपरिमित संहार घडला. याचा सर्व घटनाक्रम चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

या सगळ्या पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ची जादू चालली. मागील वर्षी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणार्‍या आरआरआर चित्रपटाला स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले. त्यानिमित्ताने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचा पुन्हा एकदा कॅमिओ झाला. ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये बेस्ट साँगच्या प्रेझेंटेशनदरम्यान आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याची झलक दाखवण्यात आली.

९६व्या ऑस्करसाठी जगभरातील काही उत्कृष्ट स्टंट दृश्यांचा समावेश असलेली क्लिप तयार करण्यात आली होती. या क्लिपमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका असलेल्या पीरियड फिल्म आरआरआरच्या गाण्याची झलक दाखवण्यात आली. २०२३ मध्ये ‘आरआरआर’ मधील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल स्कोअर या कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात या क्लिपद्वारे स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले.

एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. भारतात या चित्रपटाने ७६७.५४ कोटींची कमाई केली, तर जगभरात ११०६ कोटींची कमाई केली होती. जगाच्या चित्रपटसृष्टीत सर्वांना हवाहवासा वाटणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लक्षणीय व नेत्रदीपक पद्धतीने पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा कायम लक्षात राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -