घरसंपादकीयओपेडमनात साठलेल्या, दबलेल्या वेदनांची शस्त्रक्रिया!

मनात साठलेल्या, दबलेल्या वेदनांची शस्त्रक्रिया!

Subscribe

कवी उत्तमराव तरकसे मराठवाड्याच्या दुष्काळी बीड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा आसरडोह गावी जन्मलेले. दुष्काळामुळे आईवडील उदरनिर्वाहासाठी कुराडी, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भुसावळ, अकोला, नाशिक असा प्रवास करीत जीवाची मुंबई समजणार्‍या चंदेरी दुनियेत स्थिर झाले. त्यांनी भोगलेल्या आणि परिस्थितीने शिकवलेल्या यातनांची यादीच ‘शाईची नोंद’ कवितासंग्रहातून मांडली आहे. सामाजिक, आर्थिक चटके भोगलेला उत्तमराव तरकसे नवी मुंबईच्या पोलीस विभागातील गुन्हे शाखेत कार्यरत ‘खाकी वर्दीतला कवी’. आपल्या मनात साठलेल्या, दबलेल्या वेदनांची शस्त्रक्रिया त्यांनी कवितांमधून केली आहे. भावना व्यक्त झाल्या की त्यातून कविता जन्म घेते. कवी उत्तमराव तरकसे या कवीच्या शब्दांना धार असून समाजविघातक विकृत प्रवृत्तींवर शस्त्रक्रियेसाठी पुरेशी आहे. त्यांची कविता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करते. समाजातील प्रथा, परंपरा, चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयतेवर प्रहार करून माणुसकीचं गाणं गाते.

-प्रदीप जाधव

अंतर्मनातील भावना, दुःख, यातना, वेदना दाबून कोंडमारा झाल्यास कालांतराने त्यांचा उद्रेक होतो. अस्वस्थतेचा हा उद्रेक ज्वालामुखीसारखा प्रचंड भयानक असतो. सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर बेचैन माणसाच्या अंतर्मनातील खदखद ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर आल्यास बरे वाईट परिणाम होतात. सर्वच यातना या वैयक्तिक असतातच असं नाही, बर्‍याचदा या वेदनांना सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, जातीय किनार असते.

- Advertisement -

या भावनांची कदर केली नाही तर अनेक अंतर्बाह्य कलह निर्माण होतात. उद्रेकाचा विस्फोट झाला की त्याचे दूरगामी परिणाम टाळता येत नाहीत. ज्वालामुखी उसळल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर यायला काही काळ जावा लागतो. अंतर्मनातील वेदना खोलवर रुतल्यास त्या जखमा होतात. या जखमा मलमपट्टीने बर्‍या होत नाहीत. कधी कधी सहज बर्‍या होणार्‍या जखमांवर त्वरित औषधोपचार न केल्याने शस्त्रक्रियासुद्धा करावी लागते. अगदी तसंच अंतर्मनाच्या वेदनांचंही. बर्‍याचदा त्या पूर्वग्रहदूषितही असू शकतात.

सामंजस्याने सुटणार्‍या समस्या दुर्लक्षिल्याने खोलवर रुतून जातात आणि आपापसात गैरसमज निर्माण होऊन मनं दुभागली जातात. विस्फोटातून भावनांना उत्स्फूर्तपणे साहित्याच्या माध्यमातून वाट मोकळी केली जाते. साहित्य म्हणजे नक्की काय? आपल्या सभोवताली घडणार्‍या घटना उघड्या डोळ्यांनी बघून त्या समाजासमोर कथा, कविता, नाटक, कादंबरीच्या स्वरूपात मांडणे. त्यासाठी केवळ डोळसपणा असून भागत नाही, तर सम्यक दृष्टी असावी लागते.

- Advertisement -

दृष्टी ही सृष्टी पाहण्यासाठी असली तरी प्रकृतीविरुद्ध घडणार्‍या घटनांवर तुटूनही पडायचं असतं. त्यातून एक नवीन मार्ग निर्माण करायचा असतो, ज्यावर सर्वच मार्गस्थ होतील. प्रत्येक जण आपण केलेल्या कामाची नोंद घ्यावी यासाठी धडपडत असतोच. यात सर्वात पुढे असतो तो कवी. अव्यक्त भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे ‘कविता’ असं म्हणता येईल. अगदी मोजक्या शब्दांत आपल्या अंतर्मनातील संकल्पना सहज प्रभावीपणे मांडण्यासाठी बहुसंख्य लोक कवितेचा आधार घेतात.

पटकन सुचते आणि शब्दात उमटते ती कविता. त्यामुळे कवितेच्या मार्गाने बरेचसे लोक येतात. कविता केवळ मनोरंजनाचं साधन नसून मानवी समाजजीवनात आणि सहजीवनात परिणामकारक ठरली पाहिजे. कविता कशीही असली तरी ती हृदयाला भिडली पाहिजे. हृदयाचा संवाद हृदयाशी सहजपणे कवितेच्या माध्यमातून मांडता आला पाहिजे. त्यामुळे ती चिरकाल टिकते. सर्वांनाच आपल्या शब्दांच्या सामर्थ्याने कवितेच्या माध्यमातून क्रांतीची ललकारी देण्याची प्रतिभा असतेच असं नाही.

कवी उत्तमराव तरकसे मराठवाड्याच्या दुष्काळी बीड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा आसरडोह गावी जन्मलेले. दुष्काळामुळे आईवडील उदरनिर्वाहासाठी कुराडी, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भुसावळ, अकोला, नाशिक असा पोटासाठीचा प्रवास करीत जीवाची मुंबई समजणार्‍या चंदेरी दुनियेत स्थिर झाले. त्यांनी भोगलेल्या आणि परिस्थितीने शिकवलेल्या यातनांची यादीच ‘शाईची नोंद’ कवितासंग्रहातून मांडली आहे. सामाजिक, आर्थिक चटके भोगलेला उत्तमराव तरकसे नवी मुंबईच्या पोलीस विभागातील गुन्हे शाखेत कार्यरत ‘खाकी वर्दीतला कवी’.

आपल्या मनात साठलेल्या, दाबलेल्या वेदनांची शस्त्रक्रिया त्यांनी काव्यसंग्रहातून केली आहे. शाईची नोंद नुकताच प्रकाशित झालेला पहिलाच काव्यसंग्रह. याआधी ‘गीतांजली’ आणि ‘धुळीतून शिखराकडे’ ही दोन पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांना याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा ‘समाजभूषण’ हा सन्मानाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. २४ तास जनतेची सेवा करून थकल्या भागलेल्या जीवनाचा आलेख आता पोलीस विभागातील काही कर्मचारी कथा, कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत साहित्य क्षेत्रामध्ये झेप घेत आहेत.

आपल्याकडे प्राथमिक शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतली जाते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशावर माझे प्रेम आहे. या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं संगोपन करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अखंडता जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे संस्कार बालमनावर केले जातात. प्रत्यक्षात जेव्हा आपण सुजाण नागरिक होतो तेव्हा मात्र या प्रतिज्ञांचा आपल्याला विसर पडलेला दिसतो.

खरोखरंच आपण लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा सार्वजनिक जीवनात अमलात आणली असती तर भारत केव्हाच ‘सुजलाम सुफलाम्’ झाला असता, पण तसं होत नाही त्याची खंत कवी, लेखक, साहित्यिक, पत्रकार, विचारवंत सर्वांनाच आहे. कवी उत्तमराव तरकसे यांनी ‘समतेचा धडा’ या कवितेत आपली तळमळ आणि कळकळ स्पष्ट केली आहे. कवितेत ते लिहितात, शाळेत पहिलीपासूनच शिकवली जाते समता, एकता, बंधुभावाचे कागदावरचे धडे, पण शिकवले जात नाहीत संविधानातील समान न्याय्य, हक्काचे, स्वातंत्र्याचे तसेच अन्यायाविरुद्ध झगडण्याचे धडे.

देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक दशके झाली, आता शतकसुद्धा पूर्ण होईल, तरी आजसुद्धा प्रत्येक गावाबाहेर आहेत जातीयतेने सजलेले छोटेसे, लहानसे, मनुस्मृतीने रेखाटलेले जातवाडे. संत, महात्मे, महापुरुषांच्या या देशात केवळ त्यांच्या नावाचा जयजयकार केला जातो. प्रत्यक्ष कृती मात्र त्यांच्या विचारांविरुद्ध होते. म्हणून कवी उत्तमराव तरकसे क्रोधाने समस्त राजकारणी आणि व्यवस्थेलाच प्रश्न विचारतात…

निर्दयी पापभिरू, पिशाच्च वृत्तीच्या राज्यकर्त्यांनो
कधी रूजवाल या मातीत
शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे बीज.

ते पुढे म्हणतात, एकाच रंगाच्या रक्ताने एकमेकांवर पेटून उठायचे हे मला पटत नाही. जात, धर्म, पंथाच्या नावाखाली माणसाचे रक्त सांडणे, देवाच्या नावाने बळी देणे-घेणे यात कसली आली मानवता? मी छातीठोकपणे सांगेन मानवता हाच माझा धर्म, माणुसकी आपली संस्कृती. जातविरहित समाजाची निर्मिती हाच आपला संकल्प असला पाहिजे. मनुष्य जन्म हा माणसाला मिळालेली देणगी आहे. तो पुन्हा नाही.

म्हणूनच याच जन्मात आपल्याला जे जे पुण्य कर्म करून मानवमुक्तीच्या लढ्यासाठी, माणुसकी संवर्धनासाठी करता येईल ते केलंच पाहिजे. ही आपल्या संतांची शिकवण आहे. माझा जन्म सत्कारणी लागावा अशीच आपल्या प्रत्येकाची धारणा आणि भावना असते. उत्तमराव तरकसे मात्र म्हणतात, मी जन्मा आलोय इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी. मला या देशात समतेचं, मानवतेचं, बंधुत्वाचं नातं गुंफून माणसांचं राज्य प्रस्थापित करायचं आहे. त्यासाठी कोणतंही शस्त्र हाती घ्यायला भाग पडलं तरी चालेल. म्हणून कवी म्हणतो…

हाती घेईन कुदळ
जाती धर्माच्या नावावर माणसामाणसात
वितुष्ट निर्माण करणार्‍यांच्या कबरी खोदण्यासाठी…
बस… यासाठीच…!
मी जन्मा आलोय…!

या कवितेतून विषमता गाडण्याचा व्यापक मानवतावादी दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो. मनुष्य जन्मात स्वाभिमानाने जगण्याला फार महत्त्व असून त्याला प्राधान्य असावं. सत्ता-संपत्तीसाठी केवळ लाचारी पत्करून हुजरेगिरी करून जगणारे कृतघ्नच. आपण आपल्याप्रति समाधानी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वाभिमान गहाण टाकू नये. आपलं स्वत्व टिकवण्यासाठी कवी आवाहन करतात. न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता तुमचे रक्त पेटवत आहे. उठा आता, जागे व्हा. तुमचे हक्क तुम्हीच मिळवा. तुमच्यातला स्वाभिमान जागवा अन् स्वाभिमानी व्हा.

कवी उत्तमराव तरकसे महत्त्वाच्या शासकीय सेवेत असल्याने नोकरीची आचारसंहिता पाळणे बंधनकारक असते. समाजात घडणार्‍या विकृत प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची, समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांचीच आंतरिक इच्छा असतानासुद्धा केवळ आपण शासकीय नोकरीत आहोत म्हणून ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसावं लागतं. अर्थात नोकरी करणार्‍यांची प्रातिनिधिक स्वरूपात ही कैफियत त्यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे. ते लिहितात, समाजकंटकाचे समाजविघातक वर्तन बघून हृदयाला असंख्य वेदना होऊन रक्त पेटून उठते.

पण करणार काय? वाटतं कसलं हे जगणं अठराशे सत्तावनच्या गुलामासारखं. काहीच करता येत नाही, जीव नुसता कासावीस होतो. असं वाटतं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. समाजावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलणे नाही. एवढेच काय साधा निषेधसुद्धा करता येत नाही. कारण मी एक सरकारी नोकर आहे. या व्यवस्थेवर तुटून पडण्याची हिंमत आणि ताकद असतानाही केवळ नोकरदार म्हणून शांत राहावं लागतं. ‘शाईची नोंद’ कवितासंग्रहात एकूण ७० कविता असून त्या मुक्तछंदातल्या, सामाजिक विषयावरच्या आहेत. या कवितांमधून कवी उत्तमराव तरकसे यांच्या सामाजिक बंधुत्वाची नाळ अधोरेखित होते.

=कवी – उत्तमराव तरकसे
=प्रकाशक – महाजन पब्लिशिंग हाऊस
=मूल्य – १९० रुपये, पृष्ठे – ९६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -