घरसंपादकीयओपेडदिगू टिपणीसचे वारसदार डोकी फोडून घेतील!

दिगू टिपणीसचे वारसदार डोकी फोडून घेतील!

Subscribe

आताचं राजकारण फक्त गढूळच नाही तर त्याचं गटार झालं आहे. हे गटार उपसणारा पत्रकार दिगू टिपणीस इथे या गलिच्छ राजकारणाच्या मॅनहोलमध्ये लेखणी घेऊन उतरणारा सफाई कामगार ठरला आहे. दिगू सत्तरच्या दशकात संविधानातली ‘कल्याणकारी राज्याची’ स्वप्नं डोळ्यात घेऊन मुंबईच्या गल्लीबोळात फिरायचा. आजही महाराष्ट्रातील राजकीय नेते सोयीप्रमाणे ज्या कोलांटउड्या मारत आहेत, त्या पाहून आताचे पत्रकारही संभ्रमित होत आहेत. त्यांचाही दिगू टिपणीस होण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर तर डोकी फोडून घेण्याची वेळ आली आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘सिंहासन’ चित्रपटातला ऐंशीच्या दशकातला पत्रकार दिगू टिपणीस नेहमीप्रमाणे फोनची रिंग वाजल्यानं २०२३ च्या जुलै महिन्यातल्या २ तारखेलाही लवकर उठला होता. सत्तर ऐंशीच्या दशकातल्या चाळीतल्या चार बाय पाचच्या खोलीतून तो आता गिरणी कामगारांच्या झोपडपट्टीवजा चाळींच्या जागेवर बांधलेल्या एसआरएच्या हवाबंद फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. महापालिकेसह मंत्रालयातल्या विभागवार खात्यांमध्ये त्याचं आजही वजन असल्याने एसआरएतून मिळालेल्या सोसायटीचा तो अध्यक्ष झाला होता. इमारतीच्या सतराव्या माळ्यालाच आपापलं ‘आभाळ’ मानणार्‍या हवाबंद फ्लॅट नावाच्या अडीचशे स्क्वेअर फूटच्या खुराड्यात तो आज शिफ्ट झाला होता. आजच्या दिगू टिपणीसाची पत्रकारिता बदललेली आहे, सोबतच त्याचा भवतालही कमालीचा बदललेला आहे. अरुण सांधूंच्या लेखणीतून चित्रपटात उतरलेला दिगू कधीचाच वेडा झालाय, फक्त त्याला आणि त्याच्या भवतालाला माहिती नाही.

सिंहासन चित्रपटाला तीस पस्तीस वर्षे उलटून गेल्यानंतर त्या काळचा गिरणी कामगारांचा लढा, मराठी माणसांची मुंबई २०२३ मध्ये आज कधीचीच इतिहासजमा झाली होती. राज्याची राजधानी असलेली ही मुंबई नवी होती. इथल्या झोपडपट्ट्यांच्या गल्लीबोळात आता पत्रकार दिगूला मोकळेपणानं फिरता येत नव्हतं. प्रत्येक इमारतीबाहेर एक पगारी रखवालदार बसवलेला असल्यानं ‘माणसांशी’ थेट संवाद साधताना त्याची अडचण झाली होती. दुसरीकडे दिगूच्या लँडलाईन फोनच्या जागी स्क्रीन टच मोबाईल आल्यानं संपादकांनी पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजेसनं त्याचा इनबॉक्स फूल झाला होता. नाही म्हणायला या चाळवजा खोलीत कोविड काळात वर्क फ्रॉम होम करण्यासाठी प्रेसनं दिलेला लॅपटॉप उघडून त्यानं अपडेट्स पाहायला सुरुवात केली.

- Advertisement -

सत्तरच्या दशकातल्या खादीच्या सदर्‍यावर शबनम बॅग खांद्याला लटकवलेल्या काळ्या चष्म्याच्या जाड फ्रेमच्या निळू फुलेंनी साकारलेल्या सिंहासनातल्या दिगूला त्याकाळी मर्यादित साधनं असतानाही राजकीय, सामाजिक घटना घडण्याआधी त्याचा हलकासा गंध यायचा. घटना घडामोडीचं वार्तांकन करण्याऐवजी उद्या घडणारी बातमीच तो आजच्या वर्तमानपत्रात देऊन आधीच मोकळा होत असे. त्यामुळे त्याचं वर्तमानपत्र झालेल्या घडामोडींच्या सरकारी प्रेसनोटला त्याची लेखणी कधीच बांधिल नव्हती. मात्र आता काळ बदलला होता. माहिती तंत्रज्ञानानं घडवलेल्या ‘स्फोटक’ क्रांतीनं कामगारांच्या क्रांतीला केव्हाच गिळून टाकलं होतं. भवतालमध्ये घडणारी, घडवली जाणारी ‘बातमी’ तातडीनं चॅनलवर, न्यूज वेबसाईटवर त्याच वेळी जाणं गरजेचं होतं. इथं केवळ ‘बातमी’ होती. राजकीय भूकंपाचं विश्लेषण, विवेचन, त्याची कारणं घटना घडल्यानंतर ‘प्राईम टाईम’वर चर्चिली जाणार होती. त्यामुळे दिगूच्या सदर्‍याच्या खिशाला लावलेले फाऊंटन पेन आजच्या काळात कामाचं नव्हतं. त्याला तातडीनं चॅनलच्या स्टुडिओतून बोलावणं आलं होतं.

सकाळी दिगूने मोबाईलचा अलार्म सेट केला होता, पण रात्री उशिरापर्यंत ‘प्रेस’मध्ये महत्वाच्या ‘कुठल्याशा नुकत्याच बांधलेल्या आणि ‘राजकीय हेतू’ साध्य करण्यासाठीच वेळेआधीच उद्घाटन उरकलेल्या महामार्गावरील अपघातांची ‘राजकीय’ कारणे अशा कुठल्याशा स्टोरीवर काम करून त्याचे डोळे तारवटले होते. या घटनेनं तो रात्रभर अस्वस्थ होता, झोप उडून गेली होती. राज्याला ‘समृद्ध’ करण्यात ‘बहुमोला’चं योगदान असलेल्या एका ‘बहुमोलाच्या’ मार्गावरून धावणारी अख्खी बस रात्रीतच पेटली होती आणि जिवंत प्रवाशांना थेट भयंकर वेदना देणार्‍या मरणाच्या दारात घेऊन गेली. या बातमीने दिगू कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याच्या कानांना बसमधल्या पेटलेल्या प्रवाशांचे आक्रोश किंकाळ्यांनी दडे बसले होते. पण चॅनलच्या टॉक शोचा तो विषय नव्हता, तर राज्यातल्या राजकीय भूकंपाचा विषयानं वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने आणि वाहिन्यांच्या चॅनलच्या चर्चांनी तो आधीच गोंधळला होता.

- Advertisement -

राज्यातल्या सर्वात मोठ्या महामार्गावर झालेल्या अपघातांच्या मालिकेनं त्याची झोप उडवली होती, त्यामुळे पहाटेच्या रिमझीम पावसात त्याला उठवत नव्हतं, डोळे जड झाले होते, पण उठणं गरजेचं होतं. नाही म्हणायला दोन दिवस आधीच त्याला महाराष्ट्रातल्या ‘राजकीय भूकंपाची’ हलकीशी कुणकूण लागली होती. त्याच्या बातमीतल्या लेखणीनं सत्तरच्या दशकात आलेल्या सिंहासन चित्रपटातलं सरकार कोसळलं होतं. आज सरकार वाचवण्यासाठी राजकीय मूल्य कोसळताना तो पाहत होता. नाही म्हणायला, सत्तरच्या दशकातही दिगू टिपणीसच्या भ्रमिष्ट आणि त्याच्या वेडं होण्याला ठोस कारण होतं.

अरुण साधूंच्या कसदार लेखणीतून साकारलेल्या सिंहासनमध्ये दलित महिलेवरील अत्याचाराच्या विषयाला बातमीचं आणि सामाजिक चिंतेच्या घटनेचं मूल्य होतं. त्याकाळी महिलांवरील अत्याचार ही माध्यमं, सरकार आणि समाज या सगळ्याच भवतालासाठी सामाजिक चिंतेची बाब होती. आज २०२३ साली तीस वर्षानंतर हे सगळं चित्र बदललं होतं. महिन्याभरात महाराष्ट्र नावाच्या राज्यात चार ते पाच महिलांच्या हत्यांनंतरही इथलं समाजमन बधिर झाल्याचं पाहून दिगू टिपणीसानं आपली लेखणी आधीच मॅन केली. का लिहावं? कोणासाठी लिहावं?, असले नतद्रष्ट प्रश्न त्याला आज पडू लागले होते.

आताचं राजकारण फक्त गढूळच नाही तर त्याचं गटार झालं होतं. हे गटार उपसणारा दिगू टिपणीस इथं या गलिच्छ राजकारणाच्या मॅनहोलमध्ये लेखणी घेऊन उतरणारा सफाई कामगार ठरला होता. दिगू सत्तरच्या दशकात संविधानातली ‘कल्याणकारी राज्याची’ स्वप्नं डोळ्यात मुंबईच्या गल्लीबोळात शहरभर शबनम बॅग खांद्यावर लटकवून फिरायचा, त्यावेळी त्याला ‘उषःकाल होता होता….काळ रात्र झाली’ ही आशा भोसलेंनी गायलेली सुरेश भटांनी कागदावर मांडलेली ‘राजकीय फसवणूक’ त्याला ऐकू यायची. निदान त्याचे कान त्यावेळी शाबूत होते. त्यामुळे त्याला ऐकू यायचं, आजच्या दिगूचे कान धार्मिक, जातीय आणि अस्मिता वाद्यांच्या राजकीय घोषणांंनी पुरते बधिर झाले होते.

मंदिर, मशीद, देव धर्म धोक्यात आल्यानं काल्पनिक सिनेमांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातल्या घोषणांनी दिगूचे कान आज किटून गेले होते. त्याला आता शोषित, पीडित, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला मुलींचं आक्रंदन ऐकूच येत नव्हतं. अशा परिस्थितीत ‘राजकीय भूकंपा’च्या बातमीनं त्याची उरली सुरली झोपही उडवली होती. बातमी खर्‍या अर्थानं ‘ब्रेकिंग’ होती. विद्यमान सरकारमधील जुन्यातलं ‘बरंच’ काही तुटलं तर बरंच काही नवं जोडलं जाणार होतं. सरकारमधील या नव्या जोडणीला नवं इंजिन असं नाव त्यानं बातमीत देऊ केलं होतं. एकेकाळी दिगूला घडणार्‍या बातमीचा गंध यायचा, त्यामुळे पस्तीस वर्षांपूर्वी त्याचं नाकही शाबूत होतं. मात्र ‘राजकारणात पहाटेचा शपथविधी’ ही नवी सर्वांगीण विकासाची योजना सुरू झाल्यापासून त्याला कधी कुठं काय घडेल, याचा अंदाज येणं बंदच झालं.

कधी काळी दिगू टिपणीसाला विद्रोही कविता आवडायच्या. ‘दुष्यंतकुमार’, ‘धूमिल’ वाचत तो तासन्तास लायब्ररीत बसायचा. ढसाळांचा नामदेव, नारायण सुर्वे, लोकनाथ यशवंत हे त्याचे सोबती होते. सआदत हसन मंटो ऐकत असताना त्याची लोकल ट्रेनच्या सेकंड क्लासमध्येच उभ्या उभ्याच समाधी लागे. ‘मन्सूर एजाज जोश’ त्याचा मित्र होता. दिगू टिपणीस त्याची लोकनाथ यशवंतांनी मराठीत अनुवादीत केलेली कविता नेहमीच गुणगुणत असे.

जेव्हा साप आणि मुंगूस, उंदीर आणि मांजर
आपसात समझोता करतात,
तेव्हा संविधान आणि संसदीय लोकशाही आत्महत्या करून घेते.

दिगूच्या काळात साप त्याच्या सर्पपणाशी प्रामाणिक होता, तर मुंगूस त्याच्यातल्या मुंगूसपणाशी तडजोड करणारा नव्हता. आजचा राजकीय वातावरणातला सर्प कधी मुंगूस होईल आणि मुंगूस कधी सर्पासारखे विषारी दात दाखवेल, हे आज दिगूच्याही आकलनाबाहेर गेलं आहे. रात्री उशिरा बारा वाजता होणार्‍या सरकार स्थापन करण्याची माहिती देणार्‍या पत्रकार परिषदा आणि पहाटे सूर्य उगवण्याच्या वेळेआधीच उरकले जाणारे शपथविधी यामुळे या रात्रीच्या अंधारखेळात आज दिगू टिपणीस पुरता आंधळा झाला आहे.

सिंहासनमधला दिगू टिपणीस अर्थात निळू फुले यांनी साकारलेला तत्त्वनिष्ठ पत्रकार आज या सत्तेच्या खेळाचा भाग झालेला आहे. दिगूला इतकं हतबल करणारी व्यवस्था, दिगू ठार वेडा होईपर्यंत त्याच्या वेडेपणाची दखल न घेणारे इथले नागरिक म्हणवून घेणारे लोक दिगूच्या या भ्रमिष्टपणाला जबाबदार आहेत. सत्तेच्या साठमारीत पत्रकारितेतला दिगू वेडा होणं इथल्या लोकशाहीसाठी घातकच आहे. दिगूची फसवणूक ही इथल्या नागरिक म्हणवणार्‍यांची फसवणूक आहे. दिगूचं भ्रमिष्ट होणं लोकशाहीला परवडणारं नाही. लोकांनी या लोकशाहीत त्यांच्यातल्या दिगूला आता वेडं होण्यापासून वाचवायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -