घरसंपादकीयओपेडबेभान लोकप्रतिनिधींना लगाम घालणार तरी कोण?

बेभान लोकप्रतिनिधींना लगाम घालणार तरी कोण?

Subscribe

मतदारांना कायम ‘राजा’ संबोधणारे, कायम महापुरुषांच्या विचारावर चालत असल्याचा दावा करणारी नेतेमंडळी कोणताही अधिकारी असो, कोणीही मोठा नेता असो, कोणाचीच पात्रास ठेवत नाहीत. आपला आदर्श लोकांनी का घ्यायचा? हे ही मंडळी सांगू शकत नाहीत. फक्त हाती असलेली सत्ता आणि त्या ओघाने आलेला पैसा याच्या जोरावर ते कोणाशी कसेही वागू शकतात, हे आठवडाभरातील काही घटनांमुळे सर्वांना दिसले.

नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनी मोठ्या उत्साहात केले. नवे संकल्प केले गेले. नवेपणाची नवलाई सर्वत्र असतानाच, राजकारण्यांच्या मस्तवालपणाच्या दोन घटना या नव्या वर्षातील सुरुवातीच्या पहिल्या पाच दिवसांतच पहायला मिळाल्या. आक्षेपार्ह विधाने करत सतत वादाच्या भोवर्‍यात सापडणारे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमात पोलिसांना थेट लाठीमाराचे आदेश दिले. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारीला सिल्लोड येथे गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. तेव्हा सत्तार संतापले आणि ‘गोंधळ घालणार्‍यांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे,’ असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. शिवाय, त्या तरुणांच्या आई-वडिलांचाही उद्धार केला. आपल्याच मतदारसंघातील नागरिकांबद्दलची निष्ठा, प्रेम, कळवळा हाच का? त्यांनी तुम्हाला आपले मौल्यवान मत दिले, त्याचीच ही परतफेड का?
पुण्यातील एका कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांकरिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 5 जानेवारी रोजी झाले. त्यावेळी ही घटना घडली आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपल्याला धक्काबुक्की केल्याने आपण तसे केल्याचा खुलासा आमदार सुनील कांबळे यांनी केला, पण तो पचनी पडणारा नाही. मुळात तुम्ही विधिमंडळ म्हणजे न्यायमंडळाचे सदस्य आहात; मग, ऑन ड्युटी कर्मचार्‍यावर हात उचलून तुम्हीच कायदा हाती कसा घेऊ शकता? याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता त्यातून खास काही हाती लागेल, असे वाटत नाही!
जवळपास 30-32 वर्षांपूर्वी ‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनायेंगे,’ अशी घोषणा भाजपचे त्यावेळचे आक्रमक नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पुढे जे काही घडले ते सर्वश्रुत आहे. राम मंदिर उभारणीची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. हा रामजन्मभूमीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे लावून धरला होता. मर्यादापुरुषोत्तम रामाचा जयघोष करणार्‍या भाजपच्याच आमदाराने एका पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली. किती हा विरोधाभास? सीताहरणानंतर श्रीरामाने बंधू लक्ष्मणाला सीतेबद्दल विचारले असता, लक्ष्मणाने अतिशय नम्रपणे, सीतेबद्दल मी काहीही सांगू शकत नाही, कारण आतापर्यंत मी केवळ त्यांचे पददर्शनच केले आहे, असे सांगितले. असे आदर्श सांगणार्‍या भाजपच्या तीन पदाधिकार्‍यांनी एका विद्यार्थिनीवर अत्याचार केले! ही घटना अयोध्येनजीकच्या वाराणशीमध्ये घडली. कुणाल पांडे (28), सक्षम पटेल (20) आणि अभिषेक चौहान (22) अशी आरोपींची नावे असून तिघेही भाजपच्या वाराणसी आयटी सेलचे सदस्य आहेत.

सरकार बदलून समाज बदलण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. कारण एकदा लोकांच्या हाती सत्ता आली की, त्यांना समाजात बदल करण्याऐवजी सत्ता त्यांच्यातच बदल घडवून आणते आणि हे इतक्या असंख्य वेळा घडलेलं आहे की, अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो नियमच होऊन बसलेला आहे, असे ओशो म्हणतात. हेच विविध घटनांवरून जाणवते, पण अशा घटनांचा सिलसिला सुरूच आहे, हे वेळोवेळी दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, श्रीरामचंद्र हे मांसाहारी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून तीव्र पडसाद उमटले. त्यांनी अकारण हा मुद्दा उपस्थित केला आहे. हा झाला राजकारणाचा भाग. वर्षभरापूर्वी त्यांनीच प्रभू श्रीरामाने उग्र रूप कसे धारण केले, असा प्रश्न विचारत रामाची असंख्य वैशिष्ठ्ये सांगितली होती.
सत्तेची कोणतीही लालसा न ठेवता पित्याच्या वचनासाठी वनवासात जाणारा राम, जातीभेदाला थारा न देता शबरीने दिलेली बोरे खाणारा राम, समुद्रात सेतू बांधून लंकेत जाणारा आणि रावणाशी युद्ध करणारा राम, रावणाचा म्हणजेच ओघाने अधर्माचा वध करणारा राम, पुन्हा सत्तेची लालसा न ठेवता बंधू लक्ष्मणाऐवजी बिभिषणाकडे लंकेचा कारभार सोपवणारा राम आणि अयोध्येत परतल्यानंतर लोकांचे ऐकणारा राम अशी त्याची भिन्नभिन्न रूपे आहेत, असे त्यांनी सांगितले. मग सोशल मीडियावर विरोधात पोस्ट आल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपल्या निवासस्थानी नेऊन बेदम मारहाण करणे, हे कोणत्या निकषात बसते? हेही मान्य की, त्या व्यक्तीने आव्हाड कुटुंबातील सदस्यांबद्दल त्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह लिहिले होते, पण पुन्हा तोच प्रश्न येतो की, तुम्ही कायदा कसा हाती घेऊ शकता?

- Advertisement -

प्रभू श्रीराम अगदी सामान्य माणसांचेही म्हणणे ऐकत असत, पण सत्ताधीश तर कोणाचेच ऐकायला तयार नाहीत. हीच वस्तुस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील काय करतात. पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांची उत्तर देण्याची पद्धत जवळजवळ दम दिल्यासारखीच असते. ‘शाहू, फुले, आंबेडकर’ यांची विचारसरणी सोडलेली नाही, असे ठामपणे सांगणार्‍या अजित पवार यांच्या उपस्थितीतच भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटल्याप्रमाणे – ‘माझाच आदर्श ठेवा’ हे सांगण्याची हिंमत स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाही नेत्याजवळ नाही, यात सगळं आलं.’ म्हणूनच कायम महापुरुषांची नावे घेऊन केवळ भावनांचाच खेळ केला जात आहे. राम मंदिरावरून आरोप आणि दाव्यांचा धुरळा उडविणार्‍या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणतात, ‘राम आमच्या हृदयात आहे.’ पण एका स्त्रीबद्दल किंवा स्त्रीशी बोलताना सर्वच मर्यादा कशा ओलांडता? त्यांनी एका महिलेला केलेली शिवीगाळ ऑडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलीच ना! 17 सेकंदाच्या या क्लिपमध्ये त्यांनी 27 वेळा एका महिलेला शिव्या दिल्याचे समोर आले होते. एक लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधी असलेल्या या नेत्याने पत्रकार परिषदेतदेखील इतर नेत्यांना जाहीरपणे शिवीगाळ केली आहे. तरीही, राम यांच्या हृदयात आहे, हे मानायचे?

याच्याशिवाय, महापुरुषांचा अवमान, दुसर्‍यांच्या बापाचा उद्धार (त्याच नावावर आपले राजकीय करिअर उभे राहिले, याचा सर्रास विसर), महिलांबद्दल वक्तव्य, हात-पाय तोडा, कानाखाली आवाज काढा, अरेला कारे करा अशांचा भडिमार सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यात आघाडीवर आहेत. खुलेआम दमदाटी, मारहाण सुरूच आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट खासदार संजय राऊत यांच्या श्रीमुखात देण्याची भाषा केली आहे. शेतकरी बांधावर आक्रोश करत आहे, पण त्यांच्या पदरी आश्वासनापलीकडे काहीही पडत नाही. वर्षानुवर्षे तो अस्मानी संकटाला तोंड देत आला आहे आणि यापुढेही तो तसाच तोंड देणार आहे, पण आपण जे करत आहोत ते केवळ जनतेच्या सेवेसाठी करत आहोत, असे चित्र राजकारण्यांकडून उभे केले जाते. प्रत्यक्षात, ‘जनतेच्या मनीचे भाव’ ओळखले जात नाहीत, असे म्हणण्यापेक्षा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असे म्हणणे उचित ठरेल. फक्त जिसकी लाठी उसकी भैस, हेच तत्त्व लागू असते. त्यापुढे सर्व बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असतो. एखाद्या शासकीय कार्यालयात घुसून तेथील अधिकार्‍याला मारहाण केली जाते. तो अधिकारी जर चिरीमिरी मागत असेल, तर त्या संबंधित खात्याचा मंत्री दुसरे काय करतो? त्यातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविता येते. कोणा महिलेशी असभ्य वर्तन केले, तर न्यायालय, महिला आयोग आहेतच. असे मार्ग असताना ऑन ड्युटी कर्मचार्‍याच्या अंगावर हात टाकण्याची गरज काय? आता तर थेट मोबाईलमध्ये शूटिंग करून ते प्रसार माध्यमांकडे पाठविले की काम भागते.

- Advertisement -

थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी ‘व्यासपर्व’ या पुस्तकात महाभारतातील दुर्योधनाच्या व्यक्तीरेखेचे विश्लेषण केले आहे. ‘माडाच्या झाडाची मुळे उघडी पडलेली दिसतात. जीर्णशीर्ण रंग असतो त्यांचा. एवढ्या ताठ उंच झाडाची ती खुरटी उपरी मुळे पाहिली की माझे मन विषण्ण होते. त्याचे माथे आकाशाला भिडलेले आहेत, हे लक्षातच येत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. सध्या राजकारण्यांचे वर्तन आणि त्यांची भाषा लक्षात घेता, त्यांना हे तंतोतंत लागू होते. सत्ता तर मिळवली आहे, पण मुळे उघडी पडली आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -