घरसंपादकीयओपेडपुन्हा ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारणार?

पुन्हा ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारणार?

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत राज ठाकरे यांनी मनसे हा त्यांचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून त्या शिवसेनेचे प्रमुखपद स्वतःकडे घेण्याची ऑफर दिली असल्याचे विविध प्रसारमाध्यमांमधून पुढे येत आहे. आता प्रश्न असा पडतो की राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व तसेच जर पक्ष संघटना त्यांना मिळत असेल तर राज ठाकरे हे नेमके कोणते पाऊल उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे, मात्र ज्यांनी महाराष्ट्रातील 50 आमदार गुवाहाटीला नेऊन महाराष्ट्रातील तत्कालीन उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते एकनाथ शिंदे भाजपच्या या धक्कातंत्रानंतर स्वखुशीने अथवा भाजपच्या प्रेमळ दबावापुढे ठाकरे हे नाव असलेल्या आणि ग्लॅमर असलेल्या नेतृत्वाचा स्वखुशीने स्वीकार करणार का? हा यामधील सर्वात प्रमुख कळीचा मुद्दा आहे.

देशात आणि महाराष्ट्रातही एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदारपणे सुरू झाली असताना आणि सर्वच राजकीय पक्ष जागावाटपाच्या अंतिम चर्चांमध्ये गुंतलेले असताना या सर्व घडामोडींचे केंद्रीय स्थान असलेल्या भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून उघडकीस येत आहे. ते पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वीच अथवा निवडणुकीनंतरही म्हणा परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्ष संघटनांमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत या घडामोडींमधून पाहायला मिळत आहेत. केंद्रीय गृहमंत्री व ज्यांना राष्ट्रीय राजकारणातले चाणक्य म्हटले जाते असे अमित शहा यांनी गेल्याच आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीत भेट घेतली.

या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी मनसे हा त्यांचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून त्या शिवसेनेचे प्रमुखपद स्वतःकडे म्हणजेच राज ठाकरे यांच्याकडे घेण्याची ऑफर राज ठाकरे यांना दिली असल्याचे विविध प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या या भेटीदरम्यानच्या वृत्तांत वरून उघड होत आहे. आता प्रश्न असा पडतो की राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व तसेच जर पक्ष संघटना त्यांना मिळत असेल तर राज ठाकरे हे नेमके कोणते पाऊल उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. मात्र त्याहीपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी महाराष्ट्रातील 50 आमदार गुवाहाटीला नेऊन महाराष्ट्रातील तत्कालीन उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले आणि स्वतः एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असे मुख्यमंत्री भाजपच्या या धक्कातंत्रानंतर स्वखुशीने अथवा भाजपच्या प्रेमळ दबावापुढे पुन्हा एकदा ठाकरे हे नाव असलेल्या आणि ग्लॅमर असलेल्या नेतृत्वाचा स्वखुशीने स्वीकार करणार का? हा यामधील सर्वात प्रमुख कळीचा मुद्दा आहे.

- Advertisement -

मुळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती ही ज्या झपाट्याने बदलली आहे अथवा बदलत आहे. ती जर लक्षात घेतली तर एक गोष्ट यामुळे अगदी स्पष्ट झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासारखे राज्यातील प्रस्थापित तत्कालीन नेत्यांना ज्युनियर असलेले नेते हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी गेल्या दोन वर्षांपासून राज्याचा गाडा सक्षमपणे चालवतच नाहीत तर अक्षरशः पळवत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरेंकडे असलेले ग्लॅमर हे जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नसले तरीदेखील एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदार मंत्री यांनाच केवळ त्यांच्याबरोबर बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणले असे नव्हे तर नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख ते अगदी शिवसैनिकांनादेखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वतःकडे सत्तेच्या बळावर खेचले आहे.

यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे कोणी बडे नेते ते अगदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत अथवा जात आहेत. त्यामागे स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्याबरोबरच ही मंडळी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या मतदारसंघात जर विकासकामे करायची असती तर त्यासाठी राज्य सरकारकडून भरघोस आर्थिक निधी तसेच पाठबळ मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने आणि त्यांना ग्राउंडवर काम करत असलेल्या शिवसैनिकांना अथवा शिवसेनेच्या नेत्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची पुरेपूर कल्पना असल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ही एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांच्याकडेच आहे. ही जाणीव असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्याच्या घडीला इनकमिंग जोरात सुरू आहे.

- Advertisement -

अगदी थोडक्यात याचा मतितार्थ सांगायचा झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सध्याचा काळ हा राज्याच्या राजकारणातील सुवर्णकाळ आहे. हा सुवर्णकाळ आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जे काही महानाट्य घडवले आहे त्याचा जर बारकाईने विचार केला तर सत्तेसाठी एवढी मोठी जोखीम पत्करणारे एकनाथ शिंदे हे आत्ताच्या घडीला अत्यंत मुरब्बी, धूर्त, कुशल राजकारणी झाले आहेत असे म्हटले तर कोणाला नवल वाटू नये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये ते बाळासाहेबांची शिवसेना ही राज ठाकरे यांच्यासारख्या अधिक मुरब्बी, परिपक्व आणि ग्लॅमरस नेत्याच्या हाती अशी सहजासहजी सुपूर्द करतील याची सध्याच्या घडीला तरी सुतराम शक्यता नाही.

याबरोबरच एक आणखीन एक मोठा जो फरक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे या तिन्ही नेत्यांमध्ये प्रकर्षाने जो कोणाच्याही नजरेत येऊ शकतो तो असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू हे हस्तीदंती मनोर्‍यातील नेतृत्व आहे, अशी एक सार्वत्रिक भावना राजकीय वर्तुळात नेहमीच असते. एकनाथ शिंदे हे या हस्तीदंती मनोर्‍यातील नेते नाहीत.त्यातही उद्धव ठाकरे हे काहीसे मवाळ, सौम्य, शांत, संयमी आणि न बोलता थेट कृतीने राजकीय उत्तर देणारे आहेत. तर राज ठाकरे मात्र जहाल शीघ्रकोपी थेट जेथल्या तेथे म्हणजे अगदी जाहीरसभेसारख्या व्यासपीठावरूनदेखील कुणाचाही मुलाहिजा न बाळगता पाणउतारा करणारे आक्रमक आणि रोखठोक शैलीतील नेते आहेत. त्यामुळे एक वेळ उद्धव ठाकरे परवडले, पण राज ठाकरे हे पचनी पडतीलच याची कोणतीही शाश्वती सद्यस्थितीमध्ये कोणीही देऊ शकत नाहीत.

त्यातही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड करण्यामध्ये शिवसेनेतील तब्बल 40 आमदार तर ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा देणारे 10 अपक्ष आमदार असे एकूण तब्बल पन्नास आमदार हे गुहावटीला होते. तेरा खासदार त्यांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राष्ट्रीय राजकारणात या आकड्यांना कमालीचे महत्त्व आहे. एवढे भरभक्कम राजकीय पाठबळ ज्या एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून उभे केले आहे ते एकनाथ शिंदे अदृश्य शक्तीच्या सांगण्याप्रमाणे राज ठाकरे यांचे नेतृत्व प्रमुख म्हणून स्वीकारून स्वतःच्या राजकीय भवितव्यावर अशाप्रकारे बोळा फिरवतील असे समजण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपने दिलेल्या धक्कातंत्री ऑफरमध्ये नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणेदेखील मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात दिल्लीतील प्रसार माध्यमांमधून या ऑफरच्या बातम्या झळकत असल्यामुळे आणि त्याबाबत अद्याप तरी राज्यातील कोणत्याही मोठ्या नेतृत्वाकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील उत्पादन शुल्क मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष महायुतीत सामील करून घेण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे, मात्र अन्य ज्या काही चर्चा सांगण्यात येत आहेत त्याबाबत अद्याप मुख्यमंत्र्यांकडून अशी कोणतीही माहिती त्यांना अद्यापपर्यंत देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचेच आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व आपण स्वीकारू शकत नसल्याचे रोखठोक आणि परखड मतप्रदर्शन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत भाजपकडून जी ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्यास आपण राज ठाकरेंची प्रवक्ते अफवा शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत असं सांगत यातून स्वतःचे अंग झटकून घेतले आहे.

या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट जर बारकाईने लक्षात घेतली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही ठाकरे बंधूंवर लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचा प्रेमळ दबाव असावा असाच मतितार्थ या सर्व घडामोडींमधून काढता येतो आणि मनसेला महायुतीत सन्मानजनक स्थान देण्याची तरी इच्छा मुख्यमंत्र्यांची अथवा शिवसेनेची आहे की नाही हेही यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -