वाणी ज्ञानेश्वरांची

आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥
काय सांगावे, आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व म्हणजे नवीन आहे की काय? अरे! तुम्हा परस्परांतील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे.
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥
मग आताच काय झाले? हा मोह तुला कसा उत्पन्न झाला कोण जाणे! पण अर्जुना, तू हे फार वाईट केलेस.
मोहो धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥
जर तू या मोहात पडलास तर त्याचा परिणाम असा होईल की, आजपर्यंत मिळवलेला लौकिक जाऊन इहपरलोकांसही अंतरशील.
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासि नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥
तुझ्या अंत:करणाची ही दुर्बलता या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. ती दुर्बलता म्हणजे क्षत्रियांचा संग्रामातील अध:पातच आहे.
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥
या प्रमाणे दयाळु भगवान अर्जुनाची परोपरीने समजूत घालीत होता; तथापि त्यावर अर्जुन काय बोलला, ते ऐका.
देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं । आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥
देवा, हे इतके काही बोलावयला नको आहे. माझे काय म्हणणे आहे. ते ऐका. या युद्धाविषयी आधी आपणच विचार करा.
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥
हे युद्ध नसून आमचे हातून मोठा दोष घडत आहे; त्यात प्रवृत्त झाल्यास मोठे नुकसान होईल, असे दिसते. आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा कठीण प्रसंग ओढवला आहे.