घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥
अशा रीतीने जो संशयात पडला, त्याचा नि:संशय विनाश झाला, असे समज. म्हणून तो इहलोकच्या व परलोकच्या सुखास मुकला!
जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥
ज्याला सन्निपात ज्वर झाला आहे, त्याला ज्याप्रमाणे शीत, उष्ण कळत नाही आणि तो ऊन व चांदणे सारखेच वाटते,
तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥
त्याचप्रमाणे खरे व खोटे, अनुकूल व प्रतिकूल, हित व अहित ही संशयी पुरुषाला कळत नाहीत.
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥
ज्याप्रमाणे जन्माधास रात्र या दिवस ठाऊक नसतात, त्याचप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते.
म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ॥
म्हणून संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही, प्राण्यांचा नाश करण्याचे हे एक जाळे आहे,
येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा । माजि असे ॥
याकरिता तू त्याचा संग सोड. आधी त्याला जिंक. त्याचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावी असते.
जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥
जेव्हा अज्ञानाचा घोर अंधार असतो, तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो, म्हणून श्रद्धेचा मार्ग सर्वथा नाहीसा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -