घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडावे बद्धक । तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥
या हातोटीशिवाय जो कोणी, नित्यनैमित्तिक कर्मे बद्धक आहेत असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो.
जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥
जसा कोणी एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याचे खटपटीत पडतो, त्याप्रमाणे योग्य कर्मत्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहात पडून व्यर्थ त्रास सोसतो.
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥
गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वाच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करिता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो.
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥
म्हणून श्रौतस्मार्तहोमादिक कर्माचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्याजवळ सहजानुसार योगसुख आहे.
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥
ऐक. ‘संन्यासी तोच योगी’ असा एकवाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे.
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग झाल्यामुळे संकल्प नष्ट झाला, त्याच ठिकाणी, योगाचे सार जे ब्रम्ह त्यांची भेट होते, असे स्वानुभवाच्या प्रमाणाने ज्यांचे ठरले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -