घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्‍हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥
ज्या मराठी बोलापासून शांतरसच प्रगटेल व जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थपूर्ण आहे, तो बोल ऐका.
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥
जसे सूर्यबिंब हे बचकेत मावण्याएवढेच दिसते, परंतु त्याचे प्रकाशाला त्रिभुवनसुद्धा पुरत नाही, तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवावे;
ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥
किंवा कल्पवृक्ष जसा कामीजनाच्या इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. म्हणून यांच्याकडे लक्ष द्यावे.
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥
श्रोतेहो, तुम्हाला आणखी काय सांगावे! तुम्ही जाणतेच आहात. तेव्हा नीट लक्ष द्यावे, एवढीच माझी विनंती आहे.
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥
ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर, गुणी आणि कुलशीलवती असून पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याचे पद्धतीवरून, या बोलामध्ये सर्व अलंकार व शांती ही स्पष्ट दिसतात.
आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदां जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा? ॥
अगोदर साखरेची आवड असून ती जर औषधाच्या अनुपानात दिली, तर ती आनंदाने वरचेवर का न खावी?
सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥
साहजिकपणे मैलागिरी पर्वतावरील सुगंध व मंद असा गारा वाहत असून त्याला जर अमृताची गोडी आली आणि दैवयोगाने तेथे जर पंचम-सुरासारखा नाद कानी आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -