घरमनोरंजनमराठी शाळा सक्षमीकरणासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमित सरसावली

मराठी शाळा सक्षमीकरणासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमित सरसावली

Subscribe

कलाकार म्हटला की पैसा आणि प्रसिद्धी यात गुंतलेला माणूस असा काहीसा अर्थ लावला जातो; पण सर्वच कलाकार या गोष्टीला महत्त्व देतात असे नाही. आत्मिक आनंद घेत असताना सामाजिक भानही जपले पाहिजे असे मानणारे जे कलाकार आहेत त्यात नाना पाटेकर, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, सयाजी शिंदे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. महिला कलाकारांनीसुद्धा आपल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. युवक बिरादरीच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी यांनी युवकांना वृक्ष लागवडीविषयी मार्गदर्शन केलेले आहे. सुहिता थत्ते हिचा नेहमी राष्ट्र सेवा दलाच्या उपक्रमांमध्ये सहभाग राहिलेला आहे. सोनाली कुलकर्णीने ‘अंनिस’च्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केलेले आहेत. ‘बनगरवाडी’, ‘पोरबाजार’, ‘मुरांबा’ या चित्रपटांमध्ये, ‘कथा अरूणाची,’ ‘सखाराम बाईंडर’, ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी अभिनेत्री चिन्मयी सुमित ही मराठी शाळा टिकावी, भाषेचे संवर्धन, प्रचार व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते.

मातृभाषा जिला अनंत काळाचे संदर्भ आहेत ती टिकून राहावी अशी इच्छा फक्त दाखवली नाही तर मराठी अभ्यास केंद्रात तिने सक्रिय सहभाग दाखवलेला आहे. विद्यार्थ्यांशी, पालकांशी थेट सुसंवाद साधण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आज मराठी शाळांच्या ‘सदिच्छा दूत’ म्हणून ती कार्यरत आहे. ८ व ९ डिसेंबर रोजी गोरेगाव इथल्या महाराष्ट्र विद्यालयात दोन दिवसांचे ‘मराठी प्रेमी पालक महासंमेलन’ होणार आहे, तिथे चिन्मयी आपले विचार मांडणार आहे. या चळवळीमध्ये अभिनेत्री, दिग्दर्शिका संपदा जोगळेकर, ही सेलिब्रिटी अभिनेत्री सहभागी होणार आहे.

- Advertisement -

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण इथे होणार आहे. सातत्याने संमेलन घेतल्याने केंद्राकडून अभिनव असा एक प्रयत्न झालेला आहे, तो म्हणजे मराठीतून शिक्षण पूर्ण करून ज्या व्यक्तींनी उच्चपदी काम केलेले आहे अशा दोन हजार व्यक्तींची नावे त्यांच्या शाळांच्या नावांसह प्रकाशित केली जाणार आहेत. यातून मुलांनी आणि पालकांनी मातृभाषेचा आग्रह धरावा हे ठासून सांगण्याचा प्रयत्न होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -