घरमनोरंजनप्रेक्षकांना माझं वेगळं रूप पाहायला मिळालं - पुष्कर जोग

प्रेक्षकांना माझं वेगळं रूप पाहायला मिळालं – पुष्कर जोग

Subscribe

अटीतटीची लढत...शेवटपर्यंत सुरू असलेली चढाओढ...शोची अंतिम वेळ आणि विजेत्याचं नाव घोषित... या सुखद क्षणाचा वाटेकरी असणार्‍या अभिनेता पुष्कर जोग याने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील फायनलिस्ट होण्याचा मान पटवला आहे.हा शो जरी मेघा धाडे हिने जिंकला असला तरी आपण लाखो प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलो असल्याचे पुष्कर सांगतो.बिग बॉसच्या घरामध्ये अगदी दिवे घालवेपर्यंत राहिलेल्या पुष्करने आपला १०० दिवसांचा प्रवास आपलं महानगरंसोबत शेअर केला आहे.

तब्बल १०० दिवसानंतर ’बिग बॉस’च्या घरातून बाहेर आलास. कसा होता तुझा प्रवास?

’बिग बॉस’च्या घरात १०० दिवस राहणं कठीण आहे आणि माझ्या सारख्या हळव्या मुलाला या घरात राहता येईल की नाही याची खात्री नव्हती.पण खरच खूप मज्जा आली.घरात गेलो तेव्हा पहिल्या काही आठवड्यातच बाहेर येईन असं वाटलं होतं.कारण मला माझ्या कुटुंबियांची सतत आठवण येत होती.पण त्यानंतर एक विश्वास वाटू लागला आणि मी शेवटच्या दिवसापर्यंत घऱात राहिलो.खुप जवळचे मित्र या घरात झाले.मी,सई आणि मेघा आमचा ट्रायो प्रेक्षकांनाही आवडला.ऋतूजा आणि शर्मिष्ठा या दोन मैत्रिणी तर आऊंसारखी आई मला या घराने दिली.’बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी अविस्मरीण आहे.या घरातून बाहेर आल्यावर खुप छानही वाटत आहे.अनेक दिवसांनी खुप माणसं आजूबाजूला बघतोय.मोठ्या अंतरानंतर मुलीला,बायकोला भेटलो.पण’बिग बॉस’च्या घरातील प्रवास आयुष्यात एक वेगळा अनुभव देऊन गेला.जो खूप काही शिकवूनही गेला आहे.

घरामध्ये पुष्करचे दोन वेगवेगळे रूप प्रेक्षकांना बघायला मिळाले.काय सांगशील त्या बदलाबद्दल?

शंभर दिवस’बिग बॉस’च्या घरात मी जसा आहे तसाच वावरलो.सुरूवातीचे काही दिवस मी शांत होतो.सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो.यावेळी माझी सई आणि मेघाशी चांगली मैत्री झाली. त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की घरातील इतर पुरूष मंडळी महिलांशी आदराने वागत नाहीत. स्त्रीदाक्षीण्य त्यांच्याकडे नाही. स्त्रियांवर आरडाओरड करणे हे काही टास्कमध्ये सतत घडत होतं. जे मला खूप खटकलं.त्यातच नंदकिशोर यांनी आऊंची मस्करी केली. एक लिमीटनंतर ही मस्करी जेव्हा वाढायला लागली. तेव्हा वाटलं आऊ या माझ्या आईसारख्या आहेत.आता गप्प राहून चालणार नाही आणि त्यानंतर एक वेगळा पुष्कर प्रेक्षकांना बघायला मिळाला.

- Advertisement -

मेघा या पर्वाची विजेती ठरली, तुला खरचं वाटतं का मेघाच जिंकणं हे योग्य होतं?

Medha Dhade Bigg Boss Marathi Winner
बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे

मेघा ही पहिल्या दिवसापासूनच खुप छान खेळली.तिचं एकच ध्येय होतं की तिला ट्रॉफी जिंकायची आहे. तर माझं एकच ध्येय होतं, मला त्या घरात टिकून रहायचं आहे. मेघा खूपच जिद्दी आहे. तिने या खेळाचा पूर्ण अभ्यास केला होता. मेघा ही माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे ती जिंकल्याचा मला नक्कीच आनंद आहे. शेवटच्या क्षणी मला मेघा आणि मी जिंकण्याची ५०-५० टक्के संधी वाटत होती. पण मेघा मी एकाच गुप्रचे आहोत.त्यामुळे ती जिंकल्याचाही आनंद मला तेवढाच झाला आहे.

शेवटच्या काही आठवड्यात तू मेघावर खुप आरोप केले होतेस,तू खरचं तिच्यावर रागावला होतास?

मेघा, मी आणि सई पहिल्या दिवसापासून एकत्र होतो.त्यामुळे त्या दिवशी जेव्हा तिने अस्तादला कॅप्टनशीपसाठी उमेदवारी दिली. तेव्हा मला मनापासून वाईट वाटलं.त्यानंतर ती टास्कमध्येही प्रामाणिकपणे खेळली नाही. हे मला आवडलं नाही. पण मेघा खरचं खुप चांगली आहे. ती टास्क खूप स्मार्टली खेळली.तिच्या अनेक स्ट्रॅटेजींचा टास्कमध्ये फायदा झाला. मी कायमच तिचा आदर करतो आणि पुढेही करत राहीन. त्यामुळे तिच्यावर रागावणं हे केवळ खेळापुरत होतं.

- Advertisement -

तुझं आणि सईचं हेल्दी फ्लर्टींग पुढे जास्त झालं असं नाही वाटत का?

sai pushki
सौजन्य- Voot

’बिग बॉस’च्या घरात शंभर दिवस राहणं कठीण आहे.त्यामुळे तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन शोधता.मेघा,सई,आऊ,ऋतूजा हे माझे कम्फर्ट झोन त्या घरात होते.पण सईशी माझ जास्त बाँडिंग तयार झालं.सईसोबत मी सर्व गोष्टी शेअर केल्या.कुटुंबियांची आठवण आली की मी सईबरोबर बोलायचो.सईने मला टास्कमध्ये पण आणि टास्क व्यतिरीक्तही कायम मदत केली.सई ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे.मला आनंद आहे की ती टॉप चारमध्ये होती.

 

’बिग बॉस’नंतर आता पुष्कर प्रेक्षकांना कधी भेटणार?

लवकरच माझा ‘ती आणि ती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील माझं डबिंग बाकी आहे.या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे माझ्याबरोबर आहेत.या चित्रपटाचं दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केलं आहे. ‘ती आणि ती’ हा एक रोमँटिक चित्रपट आहे.माझी खात्री आहे की,प्रेक्षकांना माझा हा सिनेमा नक्की आवडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -