घरमनोरंजनबॉलिवूडच्या 'या' जोडप्यावर कंगना रणौतने केले गंभीर आरोप

बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यावर कंगना रणौतने केले गंभीर आरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. कधी एखादे वक्तव्य करून तर कधी सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करून कंगना अनेक वाद देखील ओढवून घेते. तिने थेट उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात सरकार असताना त्यांना आपल्या निशाण्यावर धरले होते. ज्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.

कंगना रणौत नेहमीच बॉलीवूडमधील कलाकारांवर खोचक टीका करताना दिसून येते. पण यावेळी तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यावर गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आलिया आणि रणबीर कपूरवर कंगनाने कथित आरोप केला आहे. रणबीरकडून तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा कंगनाने केला आहे. याबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष नाव न घेता रणबीर कपूरबद्दल लिहिले आहे. त्याशिवाय तिने यामध्ये आलिया आणि रणबीर एकाच इमारतीत वेगवेगळे राहत असल्याचे देखील म्हटले आहे.

तिने इंस्टाग्रामच्या स्टोरीला शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी जिथे जाते, तिथे माझा पाठलाग केला जातो. फक्त रस्त्यावरच नाही, माझ्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि माझ्या घराच्या छतावरही ते माझी हेरगिरी करण्यासाठी झूम लेन्स लावतात. सगळ्यांना माहीत आहे की, पापाराझी एखाद्या अभिनेता-अभिनेत्रीचे तेव्हाच फोटो काढायला जातात, जेव्हा त्यांना यासाठी मोबदला देण्यात येतो.”

- Advertisement -

“जर मी किंवा माझी टीम त्यांना पैसे देत नसेल, तर त्यांना पैसे कोण देत आहे? सकाळी 6.30 वाजता माझा फोटो काढला जातो. त्यांना माझ्या संपूर्ण दिवसाची माहिती कशी मिळते? ते या फोटोंचे काय करतात? आताच मी माझ्या नृत्याचा सराव संपवला. पण मी यासाठी कोणालाही माझ्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी सांगितले नव्हते… तरी ही सर्व प्रसारमाध्यमे रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित राहिली. यामागे फिल्म इंडस्ट्रीचा ‘कॅसाेनोवा’ असू शकतो.”

- Advertisement -

 

यापुढे ती लिहिते की, “मला खात्री आहे की, माझ्या व्हॉट्सअ‍ॅप डेटामधून माझी व्यावसायिक आणि वैयक्तिक माहिती लीक केली जात आहे. तो नेपो माफिया विदूषक, एकदा मी न बोलवता माझ्या दारात आला आणि मग त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. तो स्त्रियांना भुलवण्यात पटाईत असलेला कॅसाेनोवा आहे. पण आता तो नेपो माफियाचा उपाध्यक्ष सुद्धा आहे. ज्याने आपल्या पत्नीला निर्माती बनण्यास भाग पाडले आणि तिला महिलांना केंद्रित करणारे चित्रपट निर्मित करण्यास सांगितले. तो माझ्यासारखे कपडे घालतो, माझ्या घरासारखा इंटीरियर बनवतो. त्याने माझ्या हेअर स्टायलिस्ट आणि होम स्टायलिस्टलाही नेमले, त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला.”

इतकंच नाही तर ती पुढे म्हणते की, “त्याची पत्नी त्याच्या या वागण्याला प्रोत्साहन देत आहे, तिने तिच्या लग्नात तीच साडी घातली होती, जी मी आधी माझ्या भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी घातली होती, हे खूप विचित्र आहे… अलीकडेच एक फिल्म कॉस्च्युम डिझायनर मित्र (सर्वोत्तम मित्र) ज्याला मी एक दशकाहून अधिक काळ ओळखत होते, तो आता त्या जोडप्यासोबत काम करत आहे. माझे फायनान्सर्स आणि व्यावसायिक भागीदार शेवटच्या क्षणी कोणतेही कारण नसताना माझ्यासोबत असलेली डील नाकारतात. मला असे वाटते की, तो मला वेगळे करण्याचा आणि मानसिक तणावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.”

ते दोघे नवरा बायको एकाच इमारतीत पण वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. माझी त्याच्या पत्नीला अशी सूचना आहे की, तिने या सर्व घडणाऱ्या गोष्टींना नकार द्यावा आणि त्याच्यावर लक्ष ठेवावे. तसेच हा सगळा डेटा त्याला कसा मिळतोय आणि तो काय करतोय, हे पाहावे. कारण जर तो अडचणीत आला तर त्याच्यासोबत ती आणि तिचे बाळही अडचणीत येईल… तिने आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि तो काही बेकायदेशीर करत नाही ना… याबाबतची खात्री केली पाहिजे.

दरम्यान, कंगनाने तिच्या इंस्टग्रामला ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाव न घेता अप्रत्यक्षपणे रणबीर कपूर आणि आलियावर कंगनाकडून करण्यात आलेले हे कथित आरोप अत्यंत गंभीर आहेत. ज्यामुळे आता बॉलिवूडमध्ये याप्रकरणाची कुजबुज सुरू झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -