घरमनोरंजनकेदार शिंदेंचं लाडक्या लेकीस पत्रं...!

केदार शिंदेंचं लाडक्या लेकीस पत्रं…!

Subscribe

मुंबई (संतोष खामगांवकर)- सुप्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच आपल्या मुलीला म्हणजे ‘सना केदार शिंदे’ हिला सोशल मीडियाद्वारे तिच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छापत्र लिहिले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे केदारजींनी नुकताच शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट बनवायला घेतला आहे. त्यात सना प्रमुख भूमिकेत म्हणजे शाहिरांच्या पत्नी ‘सौ. भानुमती कृष्णराव साबळे’ हे पात्र साकारणार आहे. असे असले तरीही, ही भूमिका अतिशय सहजपणे तिच्या वाट्याला आलेली नाही. सनाने गेले ३ वर्षे केदारजींना असिस्ट केले आहे. केदारजींची ही लाडकी लेक असली तरी, हे काम करताना सेटवर इतरांना जी वागणूक मिळते तीच वागणूक त्यांच्याकडून सनाला मिळते. शाहिरांच्या पत्नीची भूमिका हे एक तिच्यासाठी फार मोठे आव्हान आहे. भानुमती साबळेंच्या वय वर्षे सोळा पासून ते चार मुलांची आई झालेली अठ्ठावीस वर्षांची स्त्री अश्या या भूमिकेला अनेक शेड्स आहेत. हे साकारताना वेळप्रसंगी तिला केदार शिंदेंचे कटू बोलही ऐकावे लागत आहेत. तरीही ठाम निश्चयी स्वभावाची सना बाबांच्या या चित्रपटावर खूप मेहेनत घेत आहे.

आज सना २४ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी सोशल मिडियावर तिला शुभेछांद्वारे वास्तवाची प्रेमपूर्वक जाणीवही करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ते या पत्रांत म्हणतात…

- Advertisement -

प्रिय सना…
तशी रोजच भेटतेस.. पण आज हे लिहिण्याचं कारण, तुझा वाढदिवस.. दरवर्षी प्रमाणे आजही तो आलाच!!! पण दरवर्षी पेक्षा यंदा त्याचं महत्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करते आहेस.. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खुप आव्हानात्मक असणार आहे. कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलस.. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस.. माझ्या शिव्या ओरडा हक्काने खाललास.. खुप वेळा डोळ्यात पाणी सुध्दा आलं असेल. पण तू, हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची ट्रिटमेंट कधीच मिळू नये याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही.. आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भूमिका करते आहेस. त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा excited आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..
सना.. कलाकाराचं आयुष्य हे ECG सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो… मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव!!!!!

तुझाच बाबा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -