घरमनोरंजनसदाबहार गीतांचा बादशाह.... किशोर कुमार!

सदाबहार गीतांचा बादशाह…. किशोर कुमार!

Subscribe

सिनेसृष्टीतील अवलिया कलाकार, सुरांचा बादशाह... किशोर कुमार यांची आज, ४ ऑगस्ट रोजी ८९ वी जयंती. गांगुली परिवारातील आभासकुमार ऊर्फ किशोर कुमार यांनी पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता तसेच पटकथालेखक अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. मस्तीभर्‍या उडत्या चालीच्या गाण्यांपासून, प्रेमगीत, विरहगीत सारख्या विविध ढंगांमध्ये त्यांनी गायलेली गाणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या ओठांवर आहेत. किशोरदांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत त्यांना आदरांजली वाहण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मध्य प्रदेशच्या खंडवा येथे ४ ऑगस्ट १९२९ रोजी कुंजीलाल गांगुली यांच्या घरी एका अवलियाचा जन्म झाला. आभासकुमार असे या चिमुकल्याचे नाव ठेवण्यात आले. हे आभासकुमार म्हणजेच किशोरदा!लहानपणापासूनच संगीताची आवड असलेले किशोरदा के. एल. सेहगल यांच्या गाण्यांचे चाहते होते आणि त्यातूनच प्रेरणा घेत त्यांनी गायक होण्याचे ठरवले. के. एल. सेहगल यांना भेटण्यासाठी किशोरदा मुंबईत आले आणि इथूनच सुरू झाला त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास.१९४८ साली ‘बॉम्बे टॉकीज’च्या ‘जिद्दी’ या सिनेमातून किशोर कुमार यांनी पार्श्वगायनाची सुरुवात केली.

यामधील ‘मरने की दुआएं क्यूं मांगू’ या गाण्याला आवाज देण्याची संधी त्यांना मिळाली. ‘आराधना’ चित्रपटातील गाण्यांनी त्यांना सुपरहिट गीतांना बादशाह बनवलं. किशोरकुमार यांनी हिंदी सिनेमांमध्ये ६०० हून अधिक गाण्यांना आवाज दिला. त्याशिवाय त्यांनी बांगला, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी आणि उडिया अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.किशोरदांनी अभिनयाची सुरुवात १९४६ साली ‘शिकारी’ या चित्रपटातून केली होती. मात्र १९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘लडकी’ हा त्यांचा पहिला हिट सिनेमा ठरला.

- Advertisement -

त्यांनी ‘बाप रे बाप’, ‘चलती का नाम गाडी’, ‘बेवकुफ’, ‘कठपुतली’, ‘पडोसन’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कामं केली. १९८७ साली किशोरदा यांनी सिनेमांमधून संन्यास घेण्याचा आणि खंडवा या आपल्या मूळ गावी परत जाण्याचा निर्यण घेतला होता. मात्र त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. ऑक्टोबर १९८७ साली किशोरदांचे निधन झाले. त्यांच्या गाण्यांना वेगळा साज चढवून ती सतत रिक्रिएट केली जातात. त्यांच्या गाण्यांची मेलडी वर्षांनुवर्षे प्रेक्षकांना आनंद देत आहेत आणि यापुढेही देत राहतील, यात शंका नाही.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -