घरमनोरंजनमुक्ता बर्वे यांना स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार जाहीर

मुक्ता बर्वे यांना स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार जाहीर

Subscribe

अभिनेत्री स्मिता पाटिल यांच्या ३२ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला तर ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१८’ हा अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटिल यांच्या ३२ व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ हा स्मिता पाटिल यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या आणि ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

दिग्गज मंडळी राहणार उपस्थित 

शनिवार, १५ डिसेंबर २०१८ रोजी रात्री ८:३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटिल यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.

- Advertisement -

गाण्यांचा कार्यक्रम होणार सादर 

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटिल यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे असणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -