घरमनोरंजनबरसात में...

बरसात में…

Subscribe

ऑगस्टमधला पाऊस बर्‍यापैकी शांत झालेला असतो. ऊन वार्‍यासोबत खेळणार्‍या सरी आता थकून शांत झालेल्या असतात. तरीही अधूनमधून एखादा डाव पुन्हा खेळण्याची लहर येतेच. पण, ही लहरच...उत्तम गायकीला वन्समोअरची दाद मिळाल्यावर जो गाण्याचा तुकडा गायकाकडून सादर केला जातो. तसंच या ऑगस्टमधल्या पावसाचं असतं,

ऑगस्टमधला पाऊस बर्‍यापैकी शांत झालेला असतो. ऊन वार्‍यासोबत खेळणार्‍या सरी आता थकून शांत झालेल्या असतात. तरीही अधूनमधून एखादा डाव पुन्हा खेळण्याची लहर येतेच. पण, ही लहरच…उत्तम गायकीला वन्समोअरची दाद मिळाल्यावर जो गाण्याचा तुकडा गायकाकडून सादर केला जातो. तसंच या ऑगस्टमधल्या पावसाचं असतं, थोडं थोडकं बरसणं…पण राज कपूरने पडद्यावर बरसवलेला पाऊस लक्षात राहतोच. राजच्या चित्रपटांत गाण्याचं टेकिंग उल्लेखनीय होतं. पावसाच्या गाण्याशी संबंधित त्यातले अनेक किस्से आजही दर्दी रसिकांकडून आणि राजच्या चाहत्यांकडून बॉलिवूडमध्ये चर्चेने सांगितले, ऐकले, लिहिले जातात. शैलेंद्र हे त्यातलं मानाचं पान होता.

त्याचं झालं असं की, ‘बरसात’ चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप गाणं शैलेंद्रनं लिहिलं होतं. आता हे गाणं कधी एकदाचं राजला दाखवतोय असं त्याला झालं. इतका तोही या गाण्यावर खूश होता. पण, शैलेंद्रचं नशीब असं की त्याला लगेचच राजला भेटता आलं नाही. कारण अर्थातच पावसाच्या धारा, अव्याहत कोसळणारा. शैलेंद्रची अधीरता वाढत होती. पण पावसाला त्याची फिकीर नव्हती. तो आपला कोसळतच होता. एक नाही, दोन नाही, तब्बल तीन दिवस त्यानं विश्रांतीचं नावच काढलं नाही. वीज नाही, जोडीला जोराचं वारं आणि सगळीकडे अंधारून आलेलं. बिच्चारा शैलेंद्र निमूट वाट बघत बसला पाऊस थांबायची. अखेर तीन दिवसांनंतर पाऊस थांबला आणि शैलेंद्र राजला भेटला. पुढं त्या गाण्यानं इतिहास घडवला.

- Advertisement -

पण हे नंतरचं झालं. त्याआधी शैलेंद्रच्या कवितांवर फिदा होऊन राज कपूरनं त्याला आपल्या चित्रपटांसाठी गीतं लिहायची विनंती केली होती. पण तेव्हा तो अँग्री मॅन होता. त्यामुळे तो कविच्याच मिजाशीत होता. त्याने स्पष्टपणे हे माझ्याच्यानं होणार नाही, असं सांगितलं. राजनं त्यावर ठीक आहे, पण तुला कधी वाटलं तर माझ्याकडं अवश्य ये, असंही सांगितलं होतं. असं म्हणतात की, अचानक एकदा पैशांची अडचण निर्माण झाल्यानं शैलेंद्र राजकडे गेला आणि त्याने मागितलेली रक्कम राजनं त्याला काहीही प्रश्न न करता, कोणतीही अट ना घालता, लगेच दिली. केवळ या कृतीनं राजनं शैलेंद्रला जिंकलं. हिंदी चित्रपटसृष्टीला (संगीत हा तिचा प्राण आहे, असं तेव्हा रास्तपणे म्हटलं जायचं)प्रज्ञावंत कवी मिळवून दिला. त्यानंतर शैलेंद्रनं मागे वळून पाहिलंच नाही.तसा तो लहरी होता आणि आपल्या भावनांना गीतांमधून वाट करून द्यायची त्याची सवय होती. एकदा त्यानं अशाच लहरीत ‘आवारा हूँ…’हे गीत लिहिलं. त्यावेळी ‘आवारा’ची कथाही त्याला माहीत नव्हती. पण ते गीत ‘आवारा’मध्ये फिट बसलं खरं. दुसर्‍या एका प्रसंगी त्याचं आणि संगीतकार जोडी शंकर आणि जयकिशन यांचं काही कारणावरून वाजलं. आणि त्याने लगेच लिहिलं…‘छोटीसी है दुनिया, पहचाने रास्ते, कभी तो मिलोगे तो पुछेंगे हाल…’शंकर जयकिशनही अशा तयारीचे की, त्यांनी किशोर कुमार-वैजयंतीमालाच्या रंगोलीमध्ये ते गाणं फिट बसवलं. एकदा एका प्रसंगाच्या गाण्याबाबत राज कपूर आणि त्यांच्यात काही वाद झाला. लगेच शैलेंद्रने तो व्यक्त केला. त्यानं काही केलं नाही. चक्क एक गीत लिहिलं. …‘हम भी है, तुम भी हो..दोनो हे आमने सामने,’ राजनं ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटांत त्याचा योग्य वापर करून घेतला. त्यावेळी खलनायक प्राणच्या तोंडी गीताचे शब्द (है आग हमारे सीनें में, हम आग से चलते आते है…) होते हे विशेष.

पण शैलेंद्रनं सर्वात धमाल केली ज्यावेळी संगीत म्हणून संगीतकार वाद्यांचा गदारोळ करून कान उठवू लागले. संगीतकार न राहता ते बँड मास्तर बनले. तेव्हा मनस्वी संतापानं त्याच्याकडून लिहिलं गेलं. ‘टीन कनिस्तर पीट पीट कर, गला फाडकर चिल्लाना, यार मेरे मत बुरा मान, यह गाना हे न बजाना है…’देव आनंद-माला सिन्हाच्या ‘लव्ह मॅरेज’मध्ये हे गाणं घेतलं गेलं. शैलेंद्रचं असं म्हणणं होतं की गीतकाराला संगीताची थोडी जाण असली तर तो अधिक चांगली गीतं लिहू शकतो. त्याला स्वतःला ती होती, म्हणून त्यानं लिहिलेली अनेक गीतं आजही अनेकांच्या ओठावर आहेत. ती त्यानं लिहिली हे माहीत नसलं तरीही. तसं त्याला अभिनय वगैरे काही करायचं नव्हतं. मुकेशला बनायचं होतं, तसं हिरोही त्याला बनायचं नव्हतं. तरीही एकदा तो पडद्यावर दिसला. राज कपूरनं त्याला ‘बूट पॉलिश’ या चित्रपटांत अंध गायक बनवला आणि खाटेवर बसवलं. त्याच्या तोंडी त्याचंच गीत दिलं…‘चली कौनसे देश गुजरिया तू सज धजके…’

- Advertisement -

आर. के. फिल्म्सचे शैलेंद्र, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन आणि मुकेश हे अविभाज्य भाग मानले जात. असं म्हटलं जातं की या सार्‍यांना एक केलं की राज कपूर बनतो. ज्यासाठी तो गाणं लिहायचा ते गाणं त्याच्यासाठीच असावं इतकं चपखल बसत होतं. ‘मेरा जुता है जपानी’, ‘सबकुछ सिखा हमने, न सिखी होशियारी’, ‘हम उस देश के वासी है…’ही गाणी इतर कुणाची वाटणार नाहीतच, इतकी चपखल राज कपूरसाठी बसली होती. इतरांसाठीही शैलेंद्रनं दर्जेदार आणि लोकप्रिय गाणी लिहिली. ‘बूट पॉलिश’मधलंच, तुम्हारे है तुमसे दुवा मांगते है, ‘दाग’मध्ये ‘ऐ मेरे दिल कही और चल’, ‘सीमा’मधलं ‘तू प्यार का सागर है’, ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ (बंदीनी), राजा की आऐगी बारात (आह), भैया मेरे राखी के बंधन को निभाना (छोटी बहन), हरियाला सावन ढोल बजाता आया (दो बिघा जमीन), चढ गयो रे पापी बिछुआ (मधुमती), जानू जानू रे काहे खनके है मोरे कंगना (इन्सान जाग उठा) ही काही त्यातली उदाहरणं. शैलेंद्रनं फणीश्वर नाथ रेणू यांच्या कादंबरीवर राष्ट्रपती पुरस्कार विजेता ‘तिसरी कसम’ हा उत्कृष्ट चित्रपट बनवला. पण त्यानंच त्याचा घात झाला. आर्थिक बाबींची त्याला जाण नव्हती. त्यामुळे चित्रपट रेंगाळला. राज कपूर आणि वहिदा रेहमान अशी जोडी असूनही प्रेक्षकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. यात शैलेंद्र खचला आणि सावरू शकला नाही. ३० ऑगस्ट रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी तो हे जग सोडून गेला. ‘मेरा नाम जोकर’मधलं त्याचं अपूर्ण गाणं पुढे त्याच्या मुलाने शैली शैलेंद्रनं पूर्ण केलं.


– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -