घरमनोरंजनभद्रकालीच्या 'संगीत देवबाभळी' ची ९ मार्चपासून 'देवबाभळी दिंडी'

भद्रकालीच्या ‘संगीत देवबाभळी’ ची ९ मार्चपासून ‘देवबाभळी दिंडी’

Subscribe

​’संगीत देवबाभळी’ ह्या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. राज्यपुरस्कार ते साहित्य अकादमी असे विक्रमी, सर्वाधिक ४४ पुरस्कार मिळालेलं हे एकमेव व्यावसायिक नाटक २२ डिसेंबर २०१७ ला रसिक प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा सादर झालं. जवळपास पाच वर्ष मराठी मनावर गारुड केल्यानंतर आम्ही ‘शेवटचे काही प्रयोग’ करीत असल्याचं जाहीर केलं. प्रत्येक कलाकृतीचा जसा आरंभबिंदू असतो तसाच एक विश्रामबिंदूही असतो.

​अभिजात मराठी भाषेचं लेणं, स्त्रीवाद, भक्तीरसातला द्वैताद्वैत , संत परंपरा, लोकपरंपरेतलं संगीत-अभंग आणि मराठमोळी संस्कृती ह्या सगळ्यांनी ओतप्रोत असलेलं हे नवं संगीत नाटक ताज्या दमाच्या कलावंतांनी रंगभूमीवर आणलं. स्व.मच्छिंद्र कांबळी आणि त्यांच्यानंतर प्रसाद कांबळी यांच्याद्वारे ‘भद्रकाली’ कडून मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगळ्या आशयाचे दर्जेदार नाटकं आणली गेली. ह्यामुळेच ‘देवबाभळी’सारखे एक अभिजात नाटक रंगभूमीवर येऊ शकले.

- Advertisement -

गेले पाच वर्षे आणि पाऊणे पाचशेहून अधिक प्रयोग झाल्यानंतर आम्ही एका बिंदूवर येऊन, एका उंचीवर असतांनाच हे नाटक थांबण्याचा निर्णय घेतला आहे.​परंतु हे जाहीर केले त्या दिवसापासून आम्हाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध भागातून संदेश येणं सुरु झाले. ‘तुम्ही आमच्या भागात न येताच हे नाटक असं बंद कसं करु शकतात?’ असा प्रेमळ सवाल त्यात होता. ह्या हक्काच्या प्रेमळ तक्रारीची दखल आम्हाला घेणं क्रमप्राप्त वाटतं. वास्तविक आम्ही आमच्यापरिने महाराष्ट्रात शक्य तिथे सगळीकडे प्रयोग केलेच. पण हे जरी खरं असलं तरी अनेक भाग मध्यंतरीच्या करोना संकटामुळे सुटले हेही खरंच. आणि म्हणूनच आम्ही आज जाहीर करीत आहोत ‘देवबाभळी दिंडी – धावा जनामनाचा…’

कशी असेल ‘देवबाभळी दिंडी’

​९ मार्च २०२३ तुकाराम बीज ह्यादिवशी आम्ही भारताचा शून्य किमी मैलाचा दगड असलेल्या केंद्रस्थानातून.. म्हणजेच नागपूर येथुन आमची दिंडी आरंभित आहोत. हा असेल आमचा ‘धावा जनामनाचा-विदर्भ दौरा’

- Advertisement -

आमच्या धाव्याचं हे पहिलं पर्व असेल. विदर्भ-मराठवाडा विभाग ९ मार्च ते १९ मार्च२०२३ . यात नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड , औरंगाबाद, जळगाव, नाशिक अशा पद्धतीने हा धावा जनामनाचा दौरा असेल.

​पुढचा धावा कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा इतर जिथे मराठी भाषा आणि मराठी मनं असतील तिथंही होईलच. त्याची माहिती आम्ही सोशलमिडीआ आणि प्रसारमाध्यमांमार्फत देत राहु.

​तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि अखेरीस कार्तिक एकादशीच्या दिवशी आम्ही आमची ही दिंडी थांबवण्याचा निर्धार केला आहे. ‘शेवटचे काही प्रयोग’ असं जाहीर करीत असतांना आम्ही हा धावा आयोजित केला आहे. यानिमित्ताने त्या त्या शहरातले हे शेवटचे प्रयोगच असतील. निरोप घेतल्याशिवाय जाऊ नये म्हणतात. आम्ही प्रत्येक मराठी मनाची पायधूळ अबीर-बुक्क्यासारखी माथी लावत निरोप घेणार आहोत.

​देवबाभळी नाटकाचे सर्वाधिक प्रयोग मुंबई,पुणे,नाशिक ह्या त्रिकोणात झाले. निरोपाच्या निमित्ताने जिथे जिथे मराठी भाषा आहे तिथं तिथं एक अखेरचा ‘भेटी लागी जीवा’ असा आमचा महाराष्ट्रासहित भारत दिंडी दौरा आम्ही रसिक मायबापाचरणी आयोजित करीत आहोत. ज्याची माहिती टप्प्याटप्याने येत राहील.

निरोप

​वारी जेव्हा पंढरपुराच्या अलिकडे कोसभर दूर पोचते तेव्हा वारक-यांना लांबूनच पहिल्यांदा कळस आणि चंद्रभागा दिसते. तत्क्षणी सगळे वारकरी शीणभाग विसरुन एक ‘धावा’ आरंभ करतात. ही त्यांची अखेरची धाव असते. ही धाव संपते ती थेट चंद्रभागेत उडी मारुनच.

​देवबाभळीवर रसिक मनांवर प्रेम केलं असं म्हणत असतांना हे जे संदेश आम्हाला आले ज्यात प्रेमळ तक्रारी आहेत. ते बोलावणं रसिकरुपानं रखुपांडुरंगाचं बोलावणं आहे असं मानून आम्हाला शिरसावंद्य आहे. वारी संपत आल्यावर शेवटच्या मैलाचा हा अखेरचा धावा आहे.


‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पार्टनरला द्या ‘ही’ भेटवस्तू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -