घरमनोरंजनफिल्ममेकर नागराज मंजुळेंचे हिरे 'झुंड' चित्रपटात एकत्र

फिल्ममेकर नागराज मंजुळेंचे हिरे ‘झुंड’ चित्रपटात एकत्र

Subscribe

पिस्तुल्या, फँड्री, सैराट, नाळ सारख्या अप्रतिम कलाकृतीतून नव्या चेहऱ्यांना प्रकाश झोतात आणणाऱ्या लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पिस्तुल्या, फँड्री, सैराट, नाळ सारख्या अप्रतिम कलाकृतीतून नव्या चेहऱ्यांना प्रकाश झोतात आणणाऱ्या लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित झुंड चित्रपट पुढील महिन्यातील ४ तारखेला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर रिजील केला आहे. पावणे चार मिनिटांच्या या ट्रेलरमधून झुंड चित्रपटाच्या एकंदर कथेचा अंदाज आपल्याला येतो. विशेष म्हणजे नवोदीत चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून देणाऱ्या मंजुळे यांनी आपले तेच हिरे महत्त्वाकांक्षी झुंड चित्रपटातही घेतले आहेत. फँड्री चित्रपटातील जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे, सैराटमधील कलाकार जोडी आर्ची – परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कलाकार पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत आहेत. शिवाय अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री छाया कदम यांसारखे अनुभवी कलाकारदेखील झुंडमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील. मात्र चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहेत ते म्हणजे मिलेनिअम स्टार अमिताभ बच्चन. बिग बी यांच्या चित्रपटात घेण्यासाठी नागराज मंजुळे यांना खुप वाट पहावी लागली होती. हो नाही म्हणत अखेर बिग बींनी झुंड चित्रपट करण्यास होकार दिला. चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. मात्र कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले. अखेर ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

नागराज मंजुळे यांनी आपल्या कलाकृतीतून नेहमीच समाजातील गंभीर विषयांवर भाष्य केले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून झाले आहे. झुंडदेखील अशाच पठडीचा चित्रपट असून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा आहे. आतापर्यंत जब्या, आर्ची, परशा, सल्या, लंगड्या या व्यक्तिरेखा चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झाले. तसेच झुंड चित्रपटातील मुलांची टोळकीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात विशेष छाप सोडेल, अशी शक्यता ट्रेलर पाहिल्यावर निर्माण होते. काही नवे-जुने चेहरे या झुंडमध्ये दिसतात. मात्र त्या झोपडपट्टीतील मुलांना घेऊन राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल टीम बनवण्याची बिग बी यांच्या व्यक्तिरेखेची धडपडही ट्रेलरमधून पाहायला मिळते. एकंदर झुंड चित्रपटदेखील नागराज मंजुळे यांच्या आधीच्या कलाकृतींसारखाच समाजातील एका विशिष्ट घटकाकडे प्रेक्षकांचे लक्ष वळवणारा असल्याचे दिसते. ट्रेलरपासून चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांमध्ये वाढेल, यात शंका नाही. मात्र सोमनाथ, रिंकू आणि आकाश हे नागराज मंजुळे यांनी शोधलेले हिरे पुन्हा एकदा झुंड चित्रपटात एकत्र आल्याने प्रेक्षकांना त्यांच्याही अभिनयाची मेजवानी चित्रपट पाहून मिळणार आहे.

हेही वाचा –

पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी,आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -